‘अलीकडे ज्ञान वाढतेय, म्हणून माझे म्हणणे असे की, तत्त्वज्ञानापासून मी बाहेर पडलो आहे. तत्त्वज्ञानाने मला विचार दिला आहे. तत्त्वज्ञान मी सोडत नाही. मात्र, तत्त्वज्ञान हे जे जे ज्ञान मिळेल त्यावर उभे राहतेच. आजचे जे ज्ञान आहे, त्याच्यावरही तत्त्वज्ञान होतेच. परंतु, विज्ञान वाढतेय, ते थांबणार नाही असे नाही. मध्ययुगात जसे शेकडो वर्षे ज्ञान थांबले, तसे ते आता थांबणार नाही.’’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपले हे विचार महाराष्ट्रातील तीन तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी घेतलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्याने महत्त्वाचे ठरतात. डॉ. प्रदीप गोखले, डॉ. राजेंद्र व्होरा, डॉ. सदानंद मोरे यांनी घेतलेली ही प्रदीर्घ मुलाखत ‘अक्षरदीप’ (दिवाळी अंक, १९८६)मध्ये प्रसिद्ध झाली होती. तिचा सर्व आढावा इथे इतक्या कमी जागेत अशक्य. म्हणून हा सारसंक्षेप!

भारतीय दर्शने मोक्षाधारित असल्याने ती दु:खवादी ठरतात. मग जीवन जगायचे कशासाठी, असा प्रश्न उरतो. माझ्या मते, जीवनाकडे आनंदी दृष्टीने पाहणे सकारात्मकतेच्या दृष्टींनी महत्त्वाचे आहे. सत्, चित् आणि आनंद हे तीन शब्द, वृत्ती एकत्र करून निर्माण होणारे अखंड ब्रह्म व जीवन अधिक स्वागतार्ह मानले पाहिजे. त्याकडे संशय, माया म्हणून पाहता कामा नये. विश्वाचे माणसाला जे दर्शन होते, प्रत्यक्ष इंद्रियांना जो अनुभव येतो, तो साक्षेप आहे. माणसाच्या देहात जी अनेक इंद्रिये आहेत, ती बहुविध अनुभव देतात. आरशांचे जसे अनेक प्रकार आहेत (अंतर्गोल, बहिर्गोल), ज्यात एकच चेहरा वेगवेगळ्या आरशात वेगवेगळा दिसतो, तो नि मूळ चेहरा यात फरक असतो, तसेच तत्त्वज्ञानाच्या ज्या विविध विचारसरणी आहेत, त्यांचे असते. या विचारसरणी अनुभवांवर आधारित असून, त्या विविध ज्ञानांची जाणीव करून देतात. तरी माणसाचे सर्व प्रश्न सुटत नाहीत. कारण, प्रश्न साक्षेपी आहेत.

भौतिक विज्ञानामुळे साक्षेप असलेले जग अधिक विस्ताराने समजू लागलेले आहे. जीवविज्ञानात अलीकडे जी क्रांती झाली आहे, त्यायोगे मनुष्याची जग ओळखण्याची जन्मजात पात्रता त्याच्या जीव स्वरूपाच्या मूळच्या कणापासून आली आहे, असे सिद्ध होते. म्हणजे पूर्वानुभव धरून पात्रता येते. ही पात्रता तपासली तरी ती आपणास निर्माण करता येत नाही असे दिसते. कारण, बीजकण निर्मिती पूर्वापार अनुभवांचे अपत्य होय, तसेच पूर्वापार कालाचेही! एकपेशीय जीवापासूनचा जो बहुपेशीय जीव विकास झाला, यात जीवात्म्याचा अनुभव सामावलेला आहे.

तर्कतीर्थ एकाच वेळी ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञानाची सांगड घालत जे सांगतात, त्यात मानसशास्त्र, तर्कशास्त्र, आध्यात्म, जीव-जगत संबंध सारे सारभूत होऊन येत असते. म्हणून मग मुलाखतकार त्यांना त्यांच्या सतत बदलत जाणाऱ्या विचार, भूमिकांबद्दल प्रश्न करतात, तेव्हा तर्कतीर्थ स्पष्ट करतात की, मी धर्मनिरपेक्ष दृष्टीचा मनुष्य आहे. यापुढे समाजनियंत्रण बुद्धिप्रामाण्यवादाच्या आधारे चालले पाहिजे. प्रातिनिधिक लोकशाहीच्या पद्धतीने नियम घडले पाहिजेत. अनुभवाने ते बदलत गेले पाहिजेत. विज्ञान सारखे बदलत आहे. या विज्ञानाच्या आधाराने सामाजिक जीवनाचे प्रशासन व्हायला पाहिजे. धर्मसहिष्णुता हवी. सगळ्या धर्मांनी सहिष्णुतेने एकत्र राहिले पाहिजे. कारण, भिन्न भिन्न धर्मांनी एकत्र राहण्याचे युग आले आहे.

जग इतके जवळ आले आहे की, मानव समाज हा आता भिन्न राष्ट्रीय समाज राहिला नाही. यामुळे माणसे मनाने एक झाली पाहिजेत. धर्मभेद सहन व स्वीकार केले पाहिजेत. जे धार्मिक मूलतत्त्ववादी (फन्डामेंटॅलिस्ट) लोक आहेत, ते नव्या व आधुनिक तत्त्वज्ञानावर आधारित जगाकडे दुर्लक्ष करीत आहेत. हिंदू धर्म हा महासमन्वय आहे. तो अनेक धर्मांचा एक संघ (फेडरेशन ऑफ रिलिजन्स) आहे. इस्लाम, ख्रिाश्चन धर्मांपेक्षा हिंदू धर्माचे स्वरूप व तत्त्वज्ञान भिन्न आहे. हिंदू धर्म इतर धर्मांना कमी लेखत नाही. ती अनेक धर्म एकत्र येण्या-करण्याची प्रक्रिया आहे. तिच्यामागे एक तत्त्वज्ञान आहे. ‘नृणामेको गम्य:’ माणसाला एकाच तत्त्वाकडे जायचे आहे. मानवी कल्याणाचे तत्त्व अंतिम हिताचे सुसंगत तत्त्वज्ञान आहे. ते कल्याणाचे रूप आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com