राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘ग्रामोत्थानाचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी इच्छा माझ्या मनात अनेक वर्षांपासून होती. आपली जात किंवा कुटुंबाचे उत्थान व्हावे म्हणून अनेकजण सेवा करीत असतात; पण मानवमात्राचे उत्थान करणारी देवता मी शोधत होतो. मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने ग्रामदेवता मला योग्य वाटली. त्या देवतेची पूजा जनतेची सेवा करण्यानेच करता येईल. आपण देवतेला फुले वाहून पूजा करतो, त्याने काहीही लाभ होणार नाही. ज्या देवतेची तुम्हाला सेवा करावयाची आहे त्या देवतेच्या सांगण्याप्रमाणे आपण वागले पाहिजे. हनुमानाची पूजा करताना आखाडा चालविला नाही तर खरी सेवा होऊच शकत नाही. देवतेला जे अपेक्षित असेल ते काम केले पाहिजे. मानवतेची सेवा करणाऱ्यासाठी ग्रामदेवता हे उत्तम कार्यक्षेत्र आहे.
सेवकांनी गावात जाऊन त्या गावातील गरजेचा विचार केला पाहिजे. सेवा करताना पंथ, जाती, धर्म किंवा पक्ष अशी भावना न ठेवता नि:स्वार्थपणे गावाची सेवा केली पाहिजे, याच दृष्टीने देव आणि देवता यांनी मानवतेच्या उद्धाराचे कार्य केले. परंतु आज आपल्याला त्यांच्या कार्याचा विसर पडला असून आपण केवळ देवपूजाच करू लागलो आहोत. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले किंवा देवाला टिळा लावला म्हणजे इतिकर्तव्यता संपली! जणू काही त्यानंतर कोणतेही पाप करण्यास हरकत नाही; अशीच समजूत आज सर्वत्र रूढ झालेली दिसते, परंतु हे योग्य नाही. वास्तविक कार्यकर्त्यांत भाषाभेद, मतभेद, धर्मभेद नसावा. शेती चांगली व्हावी, जनता सुशिक्षित व्हावी, गावात स्वच्छता असावी, उद्योगधंदे, शिक्षण, औषधपाण्याची सोय व्हावी याकडे लक्ष दिले म्हणजेच भगवंताकडे लक्ष दिल्यासारखे होईल. देव आता मंदिरात राहिलेला नसून तो घराघरांतून व झोपडय़ा झोपडय़ांतून काय घडत आहे, हे पाहण्यासाठी निघाला आहे.
महाराष्ट्रातील संतांनी ग्रामसेवेतच भगवंताची सेवा मानली आहे. सावता माळय़ाने शेतात उत्तम कांदा होण्यातच पांडुरंग भक्ती मानली आहे. कबीर, गोरा कुंभार, सजनकसाई, दादू िपजारी हे सर्व संत ग्रामीण उद्योग-व्यवसाय प्रामाणिकपणे करण्यातच आपण भगवतांची सेवा करीत आहोत, असे मानत असत. त्यांना शेतात काम करणे म्हणजे पांडुरंगाची खरी सेवा करणे वाटे. करायचीच असेल तर याच दृष्टीने ग्रामजयंती साजरी करावी असे मला वाटते. सेवेनेच देश वर उठेल अशी माझी भावना आहे. निव्वळ कायदे केल्याने देशाची उन्नती होणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. कायदा व सेवा या दोघांचा उद्देश एक आहे. व या दोहोंमध्ये स्पर्धा चाललेली दिसते. पण भरीव काम सेवेनेच होईल. कोणत्याही देशाची उन्नती निव्वळ कायद्याने झालेली मला तरी आठवत नाही. तरी आपण सर्वानी नि:स्वार्थपणे ग्रामाची सेवा करण्याचे व्रत चालवावे. आपल्याला खात्रीने यश येईल.
सेवा नसावी प्रतिष्ठेपुरती।
सेवक नव्हे तो जो आपस्वार्थि।
बिघडविल जनजीवनाची शांती।
दुष्परिणामी सेवेने।।
rajesh772@gmail.com