राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निष्काम कर्माचे धोरण स्पष्ट करताना म्हणतात, मनुष्य प्रथमावस्थेत इतका स्वार्थी असतो की त्याला स्वत:च्यापुढे दुनियेचे काहीच महत्त्व नसते. त्यास वाटते ‘‘आपलेच बरे पाहून मोकळे व्हावे. दुसरा दुखवला गेला तरी चालेल,’’ या विचारात क्रांती घडली की, तो ते सर्व कार्य आपल्या कुटुंबाकरिता करतो आणि असे समजतो की, ‘‘मला एवढय़ाचे काय करावयाचे आहे? पण जो कुटुंबीयांचा बोजा पडला आहे त्याच्याकरिता हे करावे लागते.’’ त्याच्या या म्हणण्यात, तो कुटुंबाच्या स्वार्थाकरिता स्वत:स निष्काम समजून वाटेल तसे कर्म करत राहतो.

bacchu kadu reaction on mahayuti
प्रहार पक्ष महायुतीबरोबर की विरोधात? बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”
bharat gogawale, sunil Tatkare
रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

पुढे त्याच्या बुद्धीत संगतीने क्रांती घडली की, तो आपल्या इष्टमित्रांची काळजी वाहतो व त्यांच्या व्यवस्थेसाठी वाटेल तसे कष्ट सहन करून मनाने त्यांचे सुख इच्छितो. प्रतिपक्षातील लोकांस त्याचे हेच उत्तर असते की, ‘‘अहो! माझ्याकरिता मला नाही काही करावयाचे, पण माझे आश्रित असलेले जे इष्टमित्र आहेत, त्यांचे बरे पाहणे माझे कर्तव्य आहे. यात माझा काही स्वार्थ नाही.’’ पुढे त्याच्या आयुष्यात जरा पुढच्या प्रगत लोकांची संगती घडली की, त्यात क्रांती घडून तो समाज ‘आपला’ समजून त्याच्या सुखदु:खांचा भागीदार होतो व त्याच्याकरिता काय करावयाचे ते करतो, की जेणेकरून आपल्या समाजाचे वर्चस्व वाढेल. कुणी विचारले की, ‘‘हा उपक्रम आहे तुमचा?’’ तेव्हा तो म्हणतो की, ‘‘अहो! माझ्याकरिता काय आहे? पण माझ्यावर अवलंबून असलेल्या समाजाची हानी व दु:खे मी कसा पाहू?’’ पुढे त्याच्या विचाराला चालना मिळाली की तो धर्माकरिता काय वाटेल ते करावयास तयार होतो, की जेणेकरून आपल्या धर्मातील लोकांना अधार्मिक लोकांकडून त्रास होणार नाही. कुणी त्याला म्हटले की, ‘‘तुम्हाला याची एवढी तडफ का?’’ तेव्हा तो म्हणतो, ‘‘अहो! मी अनासक्त आहे. पण माझ्या धर्माला कोणी छळावे, हे माझ्याने मुळीच पाहवत नाही.’’

पुढे त्याच्या विचारात अधिक क्रांती घडली की, तो आपल्या देशाकरिता झगडावयास तयार होतो आणि देशाच्या दृष्टीने जे लोक त्याच्या ऱ्हासाचा विचार करतात, त्यांच्या प्रतिकारार्थ आपल्या सर्वस्वाची बाजी लावतो. देशद्रोह्यांच्या विरुद्ध उभा ठाकतो व त्याला हवा तसा प्रयोग करण्यात आयुष्य वेचू लागतो. त्याला काही सज्जन पण भेकाड असे लोक विचारतात की, ‘‘तुम्हाला हे कोणी सांगितलं आहे? तुमचं याच्याशिवाय नडतंच काय?’’ तेव्हा तो आपल्या ओजस्वी वाणीने उत्तर देतो, ‘‘अहो! मी यापासून माझ्याकरिता काही इच्छित नाही. पण न्याय- निर्णयाच्या दृष्टीने एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर अन्याय करून आपले वर्चस्व चालवावे, हा ईश्वराचा नियम नाही. माझी बुद्धी हे सहन करू शकत नाही. वास्तविक मी यात कोणताही लोभ किंवा हेतु धरीत नाही, पण माझ्या बुद्धीने जाणलेल्या कर्माचे धोरण आखणे हे माझे मी कर्तव्य समजतो.’’ महाराज म्हणतात, माझे कर्म माझ्याकरिता नसून ते विश्वाकरिता आहे. आणि हाच माझा ‘निष्काम कर्मयोग’ आहे.