निष्काम कर्माचे यथार्थ स्वरूप स्पष्ट करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘निष्काम कर्माविषयीची जी श्रीकृष्णापासून ते ऋषीमहर्षी नि संतमहंतापर्यंत सर्वाची समजूत असावी ती हीच असावी की, जो जे कार्य स्वत:साठी करत नसून, आपल्या ज्ञानानुसार, भूमिकेनुसार धर्माकरिता, देशाकरिता व विश्वाकरिता करतो, तोच पुरुष निष्काम समजला जातो. कुणी असे म्हणतील की – मनुष्याची बुद्धी जसजशी मोठय़ा प्रमाणात जबाबदारी घेत विकास पावते, तसतसे त्याची सुखदु:खेही वाढण्याचे प्रमाण नाही काय? होय, पण त्याच्या विकासरहितदशेतील बुद्धीवर होणारे परिणाम विकसित स्थितीत निघून जाऊन तो तेवढय़ा मोठय़ा कोटीत, तितकाच खंबीर झालेला असतो. मनुष्याची जी क्षुद्र स्वार्थाची भावना असते ती त्याने कर्मानेच कृष्णार्पण केलेली असते. त्यामुळे अध्यात्मशास्त्राच्या वाच्यांशिक परिणामांपेक्षा तो त्याचा प्रत्यक्षच अनुभव घेऊ लागतो व एवढे करूनही ‘हे माझ्याकरिता नाही, तर देवाच्या निसर्गमय इच्छेकरिताच आहे, असे समजण्याचे तो सक्रिय धाडस करतो; हा निष्काम कर्मयोगच म्हटला पाहिजे.’
महाराज तर असेही म्हणतात की, ‘मनुष्यमात्राच्या स्थिर अशा सुखाची काळजी घेणाऱ्या सज्जनाला ब्रह्म सर्व ठिकाणी आहे असा जप करण्याचे काहीही कारण नाही. तो तीच गोष्ट प्रत्यक्ष करत आहे, जिचा शास्त्राभ्यासी लोक केवळ अनुवाद व शब्दाने जप करीत राहतात. असे जर नसते तर श्रीकृष्णाने अर्जुनाला खुशाल म्हटले असते की, बाबा! जपतप, स्नानसंध्या, ध्यान, समाधि वगैरे करून नेहमी ती कर्मे कृष्णार्पण करीत जा आणि आपल्याच घरी सर्व काही कर्मे होतात, असे समजून स्वस्थ राहा. यातच तुला मोक्ष आहे. पण उलट त्यांनी असे समजणे हे चूक आहे असा जोरदार इशारा केला. कर्म म्हणजे घरातील व्यक्तीकरिता केलेले कार्य, ही व्याख्या अज्ञानी लोकांची असते. ज्यामुळे राष्ट्राचे धोरण साध्य होते तेच खरे कर्म आहे. असा बोध देऊन भर रणांगणांत अर्जुनास उभे केले. जे कर्म स्वत:च्या दैहिक स्वार्थाकरिता असते तेच कर्म सकाम असते. तू जे करतोस ते तुझ्याकरिता नसून माझ्या (ईश्वरी) इच्छेकरिता करतोस, असे समजून तरी तुला हे कर्म केलेच पाहिजे. अर्जुना! माझी इच्छा जगात न्याय व सत्यधर्माची स्थापना करणे हीच सदैव असते व या माझ्या ज्ञानाला जे समजत नाहीत, त्यांना वाटेल तसे जपतप करूनही शांती मिळत नाही, असा भगवान् श्रीकृष्णाच्या सांगण्याचा आशय आहे, असे मला वाटते आणि हीच माझ्या मते खरी निष्काम कर्माची धारणा आहे,’ असे महाराज म्हणतात.