राजेश बोबडे

मजूर, मालक व मुनिमांच्या अधिकारांच्या दुरुपयोगातून एकमेकांच्या शोषणाची मनोवृत्ती कशी तयार होते व राष्ट्राचा विनाश कसा होतो याचे विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘मालक म्हणतो, ‘मी न सांगता नोकराने आयते काम करून द्यावे;’ नोकर म्हणतो, ‘मी घरी बसलो असलो, तरी मजुरांनी बरोबर काम करावे’ आणि मजूर म्हणतो, ‘या ऐतखाऊ लोकांचे काम मन लावून करण्याची मला काय गरज? यांचा पैसा हरामाचा आहे; नियत फुकटात चैन भोगण्याची आहे.’ राष्ट्राची शेती सांभाळणाऱ्या मोठमोठय़ा लोकांतदेखील असेच त्रांगडे झाले आहे. मोठमोठय़ा कारभाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पैसा, चैन आणि आपले जीवन इतके प्यारे झाले आहे की त्यापुढे त्यांना नेमून दिलेले काम शत्रू वाटू लागले आहे. स्वत: न झटता व दुसऱ्याला न शिकविता पैसे उधळून कुणाकडून तरी काम करून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे राष्ट्राचे जीवन ‘बारभाईकी खेती आणि तिनका न लागे हाती’ असे होत जाणे साहजिकच आहे.

एकीकडे सक्तीने उपाशीपोटी काम करूनही लोकांना दोन पैसे मिळू नयेत आणि दुसरीकडे केवळ बेजबाबदारपणे हेळसांड केल्यामुळे लाखो रुपये चुकणाऱ्या योजनांवर बरबाद केले जावेत, अशा अव्यवस्थितपणाचे लोण वरून खाली येत-येत ते सर्वाच्या अंगी भिनले तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न करून महाराज म्हणतात सत्यशोधनाच्या दृष्टीने याबाबत मजुरांना जेव्हा त्यांच्या चुकारपणाचा जबाब विचारावा, तेव्हा ते म्हणतात – ‘दिवाणजीच आम्हाला बरोबर समजावून देत नाहीत’ व दिवाणजी म्हणतो – ‘मला त्याची कल्पना मालकांनीच दिलेली नाही.’ आपल्या मर्जीतले लोक सोडून बाकी प्रत्येकाच्याच ‘रिपोर्टवर’ खालपासून वपर्यंत वाईट शेरे दिसून येतात आणि प्रवृत्ति पाहावी तर प्रत्येकाचीच दुसऱ्याला दोष देऊन मोकळे होण्याची असते. चूक दुरुस्त करून व स्वत: समजावून देऊन काळजीने काम करवून घ्यावे व मग त्यावर आपले विचार लिहावेत, ही प्रथा बहुधा कोठेच आढळत नाही.

कसे तरी आपले लोक भराभर योजावेत, त्यांना चैन करता येईल व चरता येईल अशी कामे द्यावी आणि सर्वानी मिळून आपला ‘लुबाडू गट’ मजबूत करून ठेवावा, हा जणू आजकालचा धर्म झाला आहे! अर्थात् यामुळे भयंकर घोटाळे माजून राष्ट्राचा नाश होणार हे उघड आहे. पण अशा गटबाजी वाढविणाऱ्या स्वार्थशूर मुनिमांना लोकांनी तरी का नेमावे, का निवडावे आणि मग कुरकुरत का बसावे? आपल्या अधिकारांचा योग्य उपयोग करून योग्य लोकांनाच का नेमू नये? आणि कुणालाही नेमले तरी त्याचेकडून योग्य काम जागरूकपणे का करून घेऊ नये? तसे जर झाले तर मग मालकावर भिकारी होण्याची पाळी तरी कशाला येईल? आपण जर न्यायनीतीने व कर्तव्यदक्षतेने आपली मालकी चालवू तर दिवाणजींना घोटाळा करता येणार नाही; नोकरात गटबाजी व खाऊपणा वाढणार नाही आणि गरीब मजुरांवर अन्याय होणार नाहीत. प्रत्येकजण अशा रीतीने जर आपापल्या कामात दक्ष राहिला तर सारे राष्ट्र आनंदाने नांदू लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com