राजेश बोबडे

जिवंत राष्ट्रधर्माचे उदाहरण देऊन धर्माचे ध्येय व देवाचे कार्य याबद्दल चिंतन व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘धर्मच विचारवंताकरिता राष्ट्राचे रक्षण व सत्याचे जीवन होतो. अविचारी आणि भेकड माणसांना लपण्याकरिता एक विशाल धोंडा होतो तसंच अत्याचारी व ऐतखाऊ लोकांकरिता एक सुरक्षित कुरणही होतो. ईश्वराचे नाव नीतिवंतांना विश्वव्यापी प्रेमाने कर्तव्यशूर होण्याला मदत करते आणि त्याच नावाने ढोंगी लोक हवे ते पाप करून सफाईने घरे भरण्याची साधनाही करतात. आपण मात्र महत्त्व वर्णन करताना त्यांच्या तात्त्विकतेकडेच प्रामुख्याने लक्ष देतो, पण त्यांच्या नावांच्या रंगीत पडद्यामागे काय काळा व्यवहार राजरोस सुरू आहे, याकडे पाहायलाही तयार होत नाही. हे कितपत बरोबर आहे?’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: श्रीगुरुदेव सेवामंडळाची खरी कसोटी

‘‘याच कारणामुळे मी म्हणतो की धर्म अन् देवभक्ती ठीक आहे; पण हे जर देशसेवेत अडथळा ठरत असतील तर? तर ती भक्तीच नव्हे व धर्मही नव्हे, असे म्हणण्यास काय हरकत आहे? प्राथमिकता सामुदायिक प्रार्थनेला द्यावी की देशसेवेला?’’ सेवकाने विचारले की, ‘‘तुम्ही सामुदायिक प्रार्थना करा, धर्माने वागा, असे का हो सांगता?’’ त्यावर महाराज म्हणतात, ‘‘तू श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेस गेलास, तर प्रार्थनेच्या तत्त्वात म्हटल्याप्रमाणे, प्रार्थना करताना एखाद्याच्या घराला आग लागली, तर सर्वांनी जाऊन आधी आग विझवली पाहिजे. मतभिन्नता कितीही असली तरी त्यामुळे बंधुत्वात बाधा न येऊ देता सर्वांनी प्रार्थनेला एकत्र बसलेच पाहिजे. श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकाने आपल्या देहाच्या रक्षणाकरिता प्राणांची पर्वा सोडून धावून गेलेच पाहिजे. प्रसंगी प्रार्थनाही केली पाहिजे व राष्ट्र हाक देईल तेव्हा देशाचे शिपाई होऊन लढलेही पाहिजे. माणसासारखे सुखाने राहताही आले पाहिजे आणि कामगारासारखे प्रत्येकाला राबताही आले पाहिजे. थोरांना अभिवादनही करता आले पाहिजे आणि केवळ बाता मारणाऱ्यांना गप्प बसवताही आले पाहिजे. आवश्यक तेव्हा सोवळय़ातही राहता आले पाहिजे आणि गावांतील गटारे उपसता आली पाहिजेत. बादशाही मिरवता आली पाहिजे व घोळ खोचून शेतात नांगरही चालवता आला पाहिजे.’’ महाराज स्पष्ट म्हणतात, ‘‘माझ्या सर्व प्रार्थनेतून मीसुद्धा हेच सांगत आलो आहे आणि माझा धर्मही मला हेच शिकवून स्थिर झाला आहे. माझ्या परीने कोणाच्याही मार्गाआड न येता आजवर मी हाच मार्ग आक्रमित आलो आहे.’’

है प्रार्थना गुरुदेवसे,

यह स्वर्गसम संसार हो।

अति उच्चतम जीवन बने,

परमार्थमय व्यवहार हो।।

या श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारे नित्य होणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेतून धर्म व देशसेवेचे पाठ महाराजांनी जगाला दिले. महाराज ग्रामगीतेत म्हणतात,

म्हणोनि धरिली ही साधना।

साधा सामुदायिक प्रार्थना।

सामुदायिक होण्याचीच धारणा।

आरंभिली सात्विक प्रार्थना।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com