विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळाचा विचार करत असताना लक्षात येते की, धर्म नि समाज सुधारणांचा तो कालखंड होता. विशेषत: सांस्कृतिक जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या संस्था त्यावेळी समाजाच्या केंद्रस्थानी होत्या आणि आपल्या उपक्रमशीलतेने त्या महाराष्ट्राची घडण आधुनिक व्हावी म्हणून धडपडत होत्या. अशा संस्थांत प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे, प्रार्थना समाज, मुंबई, राजवाडे संशोधन संस्था, धुळे यांचा व तादृश संस्थांचा अंतर्भाव होता. या संस्थांची स्थापना, कार्यकर्ते, कार्यपद्धती, त्यांचे सांस्कृतिक योगदान या विषयांवर प्रा. मे पुं. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत घेतली होती. ती ‘नवभारत’ मासिकाच्या मे-जून, १९८४ च्या जोड अंकात प्रसिद्ध झाली होती.

ती वाचताना लक्षात येते की, या संस्था परंपरागत देश, काल नि परिस्थितीला नवा आकार देण्याच्या उद्देशाने तत्कालीन समाजधुरीणांनी स्थापन केल्या होत्या. अशा व्यक्तित्वांना भारतमंत्री गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर प्रभृती मान्यवरांची प्रेरणा होती. या सर्व संस्था लोकाश्रयावर चालत. या चालवणारे कार्यकर्ते ध्येयवादी, नैतिक प्रेरणा असलेले, समर्पित कार्यकर्ते होते. सर्व सेवा संघ, सर्व्हण्टस् ऑफ इंडिया सोसायटी, हरिजन सेवक संघ, सर्वोदय मंडळ, प्राच्यविद्या संस्था, ग्रंथोत्तेजक मंडळ, वत्कृत्वोत्तेजक मंडळ, वेदोत्तेजक सभा, राष्ट्रभाषा प्रचार सभा, सार्वजनिक ग्रंथालये, व्याख्यानमाला अशा संस्था नावांवरूनही या सार्वजनिक सभा-संस्था समाज सर्वांगस्पर्शी होत्या, असे लक्षात येते. सत्यशोधन, नैतिकतेची कास, बुद्धिप्रामाण्यवाद, स्वावलंबन, स्वायत्तता, ज्ञान प्रसार व विस्तार, मानवी सुसंस्कृत घडण या संस्थांचे अविचल ध्येय होते. यामागे पश्चिमी आधुनिकता कारण होती. ‘नित्य दारिद्र्यात रममाण होणारे कार्यकर्ते व धर्मसेवक (मानवधर्म) संस्था चालवत. ते यतिधर्मी (कर्मशील) होते,’ असे ही मुलाखत वाचताना लक्षात येते.

असे असतानाही, स्वातंत्र्योत्तर काळात या संस्थांना ऊर्जितावस्था आली. असे दिसत नाही. ‘बौद्धिक उपासनानिष्ठा’ तोकडी होत गेली. अशा संस्थांसाठी आवश्यक चिकाटी व उपक्रम सातत्य जे पश्चिमी देशांत दिसते, ते आपल्याकडे दिसत नाही. कारण, या संस्थांच्या विकासासाठी आवश्यक उदार लोकाश्रयास समाज जीवनात लागलेली ओहोटी एक कारण म्हणून अन्वयाने सांगता येईल. आपली संस्कृती अजून परावलंबी व अनुकरणशील असणे हे त्याचे कारण होय. आपण आपली उमेद अजून उभारलेली नाही. म्हणजे असे की, आपले असे समाज प्रगतीस आवश्यक अनुदान-जग विकसित केले नाही. यासाठी आवश्यक आत्मशक्तीचा विकास आपल्या व्यक्ती व समाज मानसात झाला नाही. नव्या संस्था आल्या, नवी संस्कृती आली; पण नवा आत्मविश्वास आला नाही. त्यामुळे वरील संस्थांत यांत्रिकता आली.

धनंजयराव गाडगीळांसारखा माणूस सहकारामागे उभा होता म्हणून महाराष्ट्राची आर्थिक प्रगती झाली. तसे सांस्कृतिक संस्थांचे झाले नाही. यावर उपाय काय, अशी विचारणा प्रा. मे. पुं. रेगे तर्कतीर्थांना करतात तेव्हा ते म्हणतात, ‘मी फारच कुंठित आहे. मला काही मार्ग दिसत नाही.’ या उत्तरातच खरे तर महाराष्ट्राचा सारा सांस्कृतिक पराभव प्रतिबिंबित झालेला दिसतो.

ही मुलाखत सांगते की, वर्तमानात या संस्थांच्या कार्याचा वारसा पेलणारी (क्लेम करणारी) माणसे मिळत नाहीत. तरुण पिढी आत्मरत आहे. राजकीय पक्षांना या संस्थांशी काही देणे नाही. लोकसेवक, त्यागी, सुधारक, प्रचारक, सत्याग्रही, स्वयंसेवक, लोक शिक्षक, संशोधक शब्द आपल्या संस्कृतीत न राहिल्याची खंत या मुलाखतीत सर्वत्र पसरलेली असल्याचे वाचताना लक्षात येत राहते.

सहज आठवले म्हणून सांगतो, ‘नवभारत’ मासिक सुलभ राष्ट्रीय ग्रंथमालातर्फे शंकरराव देव चालवत. ते चालेना म्हणून तर्कतीर्थांनी हात पुढे केला; पण ते चालवू इच्छिणाऱ्या प्राज्ञपाठशाळा मंडळास तर्कतीर्थांनी आश्वासन दिले होते की, ‘मी यासाठी मंडळाच्या निधीस व उत्पन्नास धक्का न लावता, यातील अंश न उचलता मासिक चालवीन,’ असे आश्वासन पाळल्यामुळे ‘नवभारत’ आजही प्रकाशित होत राहाते आहे.