लेखक समाजाला नेमके काय देत असतो, या प्रश्नाचे उत्तर उषाकिरण खान यांच्या मृत्यूमधून समजते. बिहारच्या तसेच नेपाळच्या काही भागात बोलली जाणारी भारतातल्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असलेली, जवळपास साडेतीन कोटी लोकांची भाषा मैथिली. या भाषेतून प्रामुख्याने उषाकिरण खान यांनी साहित्यनिर्मिती केली, हेच खरे तर लेखिका म्हणून त्यांचे स्टेटमेंट होते. पुढे प्रसंगोपात्त त्या हिंदीतूनही लिखाण करू लागल्या. पण त्यांचे पहिले प्रेम त्यांच्या मातृभाषेवर, मैथिलीवरच होते आणि या भाषेत लिहिलेल्या ‘भामति एक प्रेम कथा’ या कादंबरीसाठी त्यांना २०११ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रांवर भाष्य करू पाहणाऱ्या वाचस्पती मिश्रा या पंडिताच्या पत्नीची, भामतीची गोष्ट या कादंबरीत सांगितली आहे. एका विद्वान पुरुषाचा संसार करताना, त्याच्याबरोबर समरस होताना स्वत्व न विसरणारी, तेजस्वी स्त्री हा या कादंबरीचा विषय होता. एका बुद्धिमान स्त्रीचा जगण्याविषयीचा हा दृष्टिकोन उषाकिरण खान यांनी अतिशय आत्मीयतने चितारला होता. त्यांच्या डोळ्यांसमोर असलेली भारतीय स्त्री ही अशी होती, हे लक्षात घेतले की समर्थ लेखक किंवा लेखिका जाते, तेव्हा समाजाचा नेमका काय तोटा होतो, हे आपोआप उमगते. त्याशिवाय त्याच्या किंवा तिच्या भाषेने एक प्रकारे एक शरीरच गमावलेले असते, ही गोष्ट आणखी वेगळी.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : ट्रम्प यांच्या अज्ञानातील धोका!
लखलखत्या स्त्रीवादी जाणिवेचा आपल्या कथा, कादंबऱ्या आणि नाटकांमधून आविष्कार करतानाच उषा किरण खान यांनी ग्रामीण जीवन, शेती, त्यातले ताणेबाणेही आपुलकीने मांडले. बालसाहित्य हादेखील त्यांच्या आस्थेचा विषय होता. त्यातूनच त्यांनी लहान मुलांसाठी भरपूर लिखाण केले. अब पानी पर लकीर, फागुन के बाद, सीमांत कथा, अंगन हिंडोला, अनुत्तरित प्रश्न, हसीना मंजिल, भामती, सिरजनहार या त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. २०१५ मध्ये त्यांना पद्माश्री पुरस्कारही देण्यात आला होता. नुकताच वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असला तरी, अखेरपर्यंत त्या समाजामधल्या विविध प्रवाहांशी जोडलेल्या होत्या. आयपीएस अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या त्यांच्या पतीच्या, रामचंद्र खान यांच्या मृत्यूनंतर त्यांनाही जणू पैलतीराचे वेध लागले. जगाची खिडकी मानल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असेल तरच लेखक जगापर्यंत पोहोचतो, या बाजारू समजुतीला उषाकिरण खान यांच्यासारख्या अनेक भारतीय, प्रादेशिक लेखकांनी एक प्रकारे आपल्या लिखाणातून, आपल्या भाषेचा बुरुज बनून उत्तर दिले आहे. उषा किरण यांनी तर मैथिली आणि नंतर हिंदी भाषेच्या माध्यमातून फक्त मिथिला आणि बिहारचीच नाही तर भारतीय संस्कृती जगापुढे मांडली. नागार्जुन हे टोपणनाव घेऊन लिहिणारे वैद्यानाथ मिश्रा हे मैथिली भाषेतील लेखक हे भाषेच्या बाबतीत उषाकिरण खान यांचे आदर्श होते. त्यांचा आपल्यावर प्रभाव आहे, त्यांनी आपल्याला भाषेविषयी सजग केले हे त्या नेहमी कृतज्ञतापूर्वक नमूद करत. दरभंगा जिल्ह्यातील हायाघाट तालुक्यातील मझौलिया गावात १९४५ चा जन्म, वडील जगदीश चौधरी हे स्वातंत्र्य सैनिक वगैरे सगळ्यांचेच असतात तसे तपशील उषाकिरण खान यांचेही होते. पण त्यांनी केलेले ‘पांढऱ्यावरचे जरा काळे’ त्यांना हे तपशील ओलांडून प्रादेशिक अस्मितेच्या पलीकडे घेऊन गेले, हे अधिक महत्त्वाचे.