एक गोष्ट… जी स्वत:च स्वत:ला रचत जाणारी असेल. गोष्ट परिपूर्ण आहे आणि अर्धवटही. एक चित्ताकर्षक गोष्ट, जिच्यात सीमारेषा आहे आणि स्त्रियाही. ज्या जात, येत असतात निरंतर… मग जी हवा खेळती आहे तिच्यातही गोष्ट उडत असेल आणि जे गवत उगवतं त्यातही. मावळता सूर्य जणू गोष्टींचे तेवणारे असंख्य कंदील ढगांना टांगते ठेवून जातो… डाव्या- उजव्या बाजूने वळणं घेणारी वाट अशी पुढे झेपावते की कुठे थांबावं याची तिला शुद्धच नाही… आणि सगळेच गोष्टी सांगू लागतात. ज्वालामुखीच्या पोटातून निघालेला, जाळ आणि धुरासकट बाहेर पडणारा भूतकाळ… अशी गीतांजली श्री यांच्या ‘रेतसमाधि’ या कादंबरीची सुरुवात होते. या बिंदूपासून पुढे सुरू होतं ४०० पानांचं एक दीर्घ आख्यान.
कुटुंबाकडे पाठ फिरवून खाटेला जखडून असलेली घरातली एक विधवा आजी. तिला आपल्यात आणण्यासाठी मग साऱ्या कुटुंबाचाच आटापिटा सुरू होतो. ‘आता मी अजिबात उठणारच नाही’, अशा निग्रहाने पडून असलेली जिद्दी आजी मग पुन्हा नव्या उमेदीने उठते. अगदी सर्वार्थानं नव्या रूपात. तिचा मितभाषी मुलगा, मनस्वी मुलगी, कुरकुरत सेवा करणारी सून या सर्वांचे आपापसातले संबंध, नात्यांची गुंफण असंख्य घटना प्रसंगांमधून केली जाते. कुटुंबाच्या या कथेला अगदी थेट महाभारताचं परिमाणही लावलं जातं. ‘रेतसमाधि’ कादंबरीतून जी कथा रचली जाते ती अगदी अद्भुत. एकाच वेळी वास्तवाला धरून असलेली, त्याच वेळी चमत्कृतीपूर्ण. ‘जादूई वास्तववाद’च पण खास भारतीय कथन परंपरेतला. या कादंबरीत भिंतीही बोलतात आणि घराचा दरवाजाही. कल्पतरूसारखं सगळंच पुढ्यात आणून स्तीमित करायला लावणारं हे जग. पीठ, धूप, हद सरहद असे या कादंबरीचे तीन भाग आहेत. लहान, मोठी कितीतरी प्रकरणं. त्यातलं एखादं प्रकरण एखाद्याच वाक्याचं तर कधी कधी, दोन- दोन पानं चाललेलं एकच विधान. पंचतंत्रातल्यासारखं एका गोष्टीच्या पोटातून निघणारी दुसरी गोष्ट. स्मृतींचा कोलाज. आजच्या काळात वावरताना मधूनच फाळणीची आठवण. कादंबरीभर काल आणि आज यांच्यातल्या लपाछपीचा खेळ.
सुरुवातीला सीमारेषांचा जो उल्लेख आलेला आहे तो केवळ भौगोलिक या अर्थाने नाही. प्रेम आणि द्वेष, एकटेपणा आणि संयुक्त कुटुंबातील जीवन, माणूस आणि असंख्य पशुपक्षी, स्त्री आणि पुरुष अशा कितीतरी सीमारेषा ओलांडून ही कादंबरी एका गोष्टीतून दुसरी गोष्ट विणत जाते. भारतीय कथन परंपरेचा आविष्कार म्हणूनही या कादंबरीकडे पाहता येईल. गोष्ट सरधोपटपणे सांगण्याची रीत आपल्याकडे कधीही नव्हती. अक्षरांची ओळख नसणाऱ्याही अनेक माणसांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अफाट असं कथन आपल्या भाषेत रचून ठेवलेलं आहे.
कादंबरी अगदी शेवटच्या बिंदूवर येते. गाणं समेवर यावं तशी. सुरुवात गोष्टीपासून झाली होती. शेवटही गोष्टीवरच होतो. ‘गोष्टीची काय कमी… कदाचित एखाद्या गोष्टीत आपणही असू. आकाशात चंद्र आहे. त्याचा अनोखा प्रकाश सांडतोय. रात्र किती सुंदर आहे. मंदशी शीळ वाजावी तसा वाहत्या वाऱ्याचा आवाज. चांदण्याच्या उजेडात न्हाऊन निघालेली रात्र. अशा रात्री कुणावर आपलं जाळ टाकावं याचा विचार करत जणू गोष्टीच भटकत आहेत.’ ही कादंबरी वाचताना आपण ती ‘ऐकत’ आहोत असा अनुभव वाचकाला येतो, तो तिच्या कथनशैलीमुळे.
आता बानू मुश्ताक यांनी लिहिलेली गोष्ट. नवऱ्याच्या बाहेरख्याली वागण्याला कंटाळून मेहरून तीन तासांचं अंतर पार करत माहेरी आलेली आहे. बगलेत नऊ महिन्यांची मुलगी. आई-वडील, तिचे भाऊ, भावजया हे सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. तिला पाहताच जणू अख्खं घर थिजून गेलंय. तिच्या स्वागतासाठी वडिलांच्या चेहऱ्यावर किंचितही हसू उमलत नाही. भावाच्या चेहऱ्यावरही तसेच नाखुशीचे भाव. मोठा भाऊ विचारतो, ‘इनायत कुठंय?’… इनायत म्हणजे मेहरूनचा नवरा. ती म्हणते, ‘तो आता शहरात नाही. मी एकटीच आले आहे.’ माहेरच्या सर्वांच्याच चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य! ‘एकटी?’ असा सर्वांच्या तोंडून एकाच वेळी आलेला प्रश्न. खरंतर नवरा एका नर्सबरोबर निघून गेला आहे हे मेहरूनने माहेरच्यांना लिहून कळवलं होतं. तरीही आई-वडील, भावांचं म्हणणं असं की यात आम्ही काय करणार? त्यानं जर तुला तलाक दिला तर मग तुझं कसं व्हायचं?
‘म्हणजे तुम्ही काहीही करू शकत नाहीत असंच ना. माझं कॉलेज बंद करून तुम्ही माझं लग्न लावून दिलं. आज मी या लेकरांचं ओझं वाहतेय अन् तो उडाणटप्पूसारखा उंडारतोय. जेव्हा एखादा पुरुष असं वागतो तेव्हा तुम्ही त्याला जाब नाही विचारू शकत? तो असं वागत असेल तर त्याच्याविषयी माझ्या मनात आज घडीला घृणाच आहे. देऊ द्या तलाक त्यानं. आता मी परत त्या घरात जाणार नाही. त्याला सहन करावं असं जर तुम्हालाही वाटत असेल तर मी मोलमजुरी करून माझी मुलं जगवीन. तुम्हाला ओझं वाटू देणार नाही.’ मेहरून तळतळून बोलत असते. इकडच्यांना काही पाझर फुटत नाही. अखेर गल्लीतल्या एका टॅक्सीवाल्याला बोलावलं जातं. मेहरूनचे दोन्ही भाऊ तिला पुन्हा नवऱ्याच्या गावी नेऊन सोडतात.
टॅक्सीवाला गल्लीतलाच असतो. विनाकारण बोभाटा नको म्हणून प्रवासात या विषयावर कोणीच काही बोलत नाही. हे घरी पोहोचतात. तेवढ्यात मेहरूनचा नवरा इनायतही घरी पोहोचतो. तिच्या दोन्ही भावांशी त्याच्या गप्पा सुरू होतात. राजकारण, क्रिकेट अशा विषयांवर त्या रंगत जातात. त्यानंतर सामिष जेवण. या दोन्ही भावांच्या बोलण्यात मेहरूनचा विषयसुद्धा निघत नाही. मेहरून कधीकाळी याच भावांबद्दल नवऱ्याशी बोलताना ते माझ्या पाठीशी वाघासारखे आहेत तुला एखाद्या वेळी चोपून काढतील असंही म्हणालेली असते. भरपेट जेवण झाल्यानंतर हे दोन्ही भाऊ गावी परततात. इनायतही बाहेर पडतो.
मेहरून मात्र अस्वस्थ आहे. १५ वर्षांची सलमा ही मेहरूनची मोठी मुलगी. आपल्या आईच्या दु:खाला ती पुरती ओळखून आहे. तिला आईची वेदना कळते. अंधार गडद होतो. मेहरूनच्या अंत:करणातला दिवा कधीचाच विझला आहे. तगमग असह्य होते. नवरा अजिबातच समजून घेत नाहीये आणि माहेरचे दोर कापलेले. अशा वेळी तिची अस्वस्थता टोकाला जाते. जणू जगाचे सगळे दरवाजे ती बंद करून टाकते. स्वयंपाकघरात जाते. स्वत:वर केरोसिन ओतून घेते. काडेपेटी हातात घेतलेली असते. दार उघडून अंगणात येते. आत सलमा अभ्यास करता करताच झोपी गेलेली असते. तेवढ्यात लहानग्या बाळाने टाहो फोडलेला. तो आवाज ऐकून सलमा जागी होते. बाळाला छातीशी कवटाळते आणि अम्मी, अम्मी अशी हाक मारते. घराचं दार उघड दिसतं. क्षणात अंधारात आईची आकृती दिसते. जवळ येते तर केरोसिनचा वास. ती हातातल्या बाळाला खाली ठेवून आईला घट्ट बिलगते. ‘आई तुला आमच्यासाठी जगावं लागेल. तू आम्हाला हवी आहेस.’ असं म्हणत ती हमसून रडायला लागते. सलमाच्या स्पर्शाने मेहरूनचा विचार कुठल्या कुठे पळून जातो. जणू एखादी मैत्रीणच आपल्याला समजून घेत आहे असं तिला वाटू लागतं. ‘पोरी माफ कर मला.’ असं ती म्हणते. बाहेरचा अंधार पातळ होत जातो. अशी ही ‘हार्ट लॅम्प’ या नावाची संग्रहातील शीर्षक कथा. म्हटलं तर अंत:करणातला दीप, म्हटलं तर काळजातला दिवा.
दक्षिण भारतातल्या मुस्लीम कुटुंब व्यवस्थेतल्या अनेक गोष्टी या संग्रहात आहेत. कट्टरपंथीय रूढीद्वारे महिलांचे होणारे दमन हा बानू मुश्ताक यांच्या कथेचा ठळक असा विशेष आहे. कर्नाटकातल्या बोलीचा प्रभाव त्यांच्या लेखनावर आहे. त्यांच्या कथा प्रमाणभाषेत नाहीत. कन्नड, उर्दू, दखनी आणि बानू मुश्ताक यांचं वास्तव्य ज्या भागात आहे त्या भागातली बोली असं एक अनोखं मिश्रण त्यांच्या भाषेत आहे. खेरीज कथेची मौखिक परंपरा पचवून त्यांची कथनशैली निर्माण झाली आहे. नाही तरी कथा हा याच मातीत जन्माला आलेला खास भारतीय वाङ्मय प्रकार. बानू मुश्ताक यांच्या कथेत काळाचा लंबक सदैव हलता राहतो.
‘रेतसमाधि’चं कथानक साधारण उत्तर भारतातलं तर ‘हार्ट लॅम्प’चं दक्षिण भारतातलं. हिंदी कादंबरीच्या अनुवादाला २०२२ साली आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि कन्नड कथासंग्रहाच्या अनुवादाला या वर्षी. भारतीय भाषांमधला हा ऐवज या निमित्ताने एका मोठ्या पटलावर आला. भारतीय भाषेतील लेखिकांच्या या दोन्ही कलाकृतींनी हे दाखवून दिलंय की गोष्ट ही स्थळ- काळाला बांधून ठेवणारी कला आहे.