I lived like a true werewolf.

– Rousseau

पाश्चात्त्य लोकसाहित्यातला werewolf हा मिथकीय प्राणी म्हणजे पोर्णिमेच्या रात्री लांडग्याचं रूप घेणारा शापित मनुष्य. रूसोसुद्धा त्याच्या आत्मकथनात स्वत:चं वर्णन a true werewolf म्हणून करतो. तत्कालीन समाजात रूसोचं दुय्यम स्थान werewolf सारखं शापित असलं तरी, तो शाप दैवी नसून इतिहासानं दिलेला आहे. त्यामुळे रूसो नाइलाजानं समाजाबाहेर पडत नसून स्वखुशीनं इतिहासदत्त बेगडी आवरणं फेकून देतो. त्याअर्थी, रूसोच्या लिखाणात werewolf म्हणजे इतिहासाच्या असंख्य पुटांखाली दडलेल्या निसर्गावस्थेतल्या आदिम प्रकृतीची प्रखर जाणीव असलेला मनुष्य असा अर्थ होतो. फ्रेंच विचारवंत जॅक देरिदा रूसोच्या या मिथकाचा अर्थ ‘समाजाच्या परिघावर प्रस्थापित मोरॅलिटी आणि धार्मिक चौकटीबाहेर जगणारा समाजबाह्य, नियमबाह्य अर्थात outlaw’ असा करतो. तर रूसोच्या चिंतनात, त्याच्या काळातली १८व्या शतकातली सामाजिक रचना किती लोकांमध्ये समाजात असूनदेखील समाजबाह्य असल्याची भावना निर्माण करते, हा प्रश्न केंद्रस्थानी राहिला आहे. खरं तर, रूसोला ही भावना नेहमी भेडसावत असे.

प्रबोधनपर्वाचा प्रसिद्ध अभ्यासक अर्न्स कासिरे नमूद करतो की रूसोच्या वैचारिक प्रक्रियेचा उगम त्याच्या खासगी भावनांतून होतो. पण त्याचं वैयक्तिक जीवन त्याच्या विचारांना वेसण घालत नसून त्याच्या विचारांना वस्तुनिष्ठता आणि वैश्विकतेचं परिमाण देतं. इतिहासानं लादलेल्या समाजबाह्यत्वालाच रूसो स्वत:च्या लिखाणाचा संदर्भबिंदू बनवून प्रस्थापित समाजाची चिकित्सा करतो. त्यामुळे त्याच्या विचारविश्वाची वैश्विकता समजून घेण्यासाठी प्रस्तुत लेखात त्याच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटनांचा परामर्श घेणं आवश्यक आहे. रूसो जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न थांबवून जाणीवपूर्वक werewolf होण्याचा निर्णय घेतो?

जाँ-जॅक रूसोचा जन्म १७१२ मध्ये जिनेव्हा शहरात साध्याशा प्रोटेस्टंट कुटुंबातला. जाँ-जॅकचं जगात येणं त्याच्या आईचं जगातून जाणं ठरल्याने त्याला सतत अपराधगंड वाटत असे. त्याचे वडील घड्याळ दुरुस्त करणारे साधारण कारागीर. छोट्या जाँ-जॅकवर वडिलांचं विशेष प्रेम होतं. रोज कामावरून आल्यावर आणि रात्री जेवणानंतर वडील नियमितपणे जाँ-जॅकसाठी अभिवाचन करून गप्पा मारत असे. मात्र जाँ-जॅक दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं एका उमरावाशी भांडण झाल्यानं त्यांना जिनेव्हातून पलायन करावं लागलं. त्यामुळे अनाथ जाँ-जॅकची व्यवस्था नातलगांनी बोर्डिंगात केली. तिथलं जाचक आणि अन्यायी वातावरण संवेदनशील आणि नाजूक जाँ-जॅकला असह्य वाटल्यानं तो वयाच्या बाराव्या वर्षी शाळा सोडून छोटीमोठी कामं करायला शिकला.

वयाच्या १६व्या वर्षी जाँ-जॅक कुणालाही न सांगता जिनेव्हातून पलायन करतो. जिनेव्हा या प्रोटेस्टंट रिपब्लिकच्या अवतीभोवती कॅथोलिक राज्यं असल्यानं जिनेव्हातल्या प्रोटेस्टंटांची घरवापसी करण्यासाठी तिथं विशेष मोहीम राबवली जात असे. सॅव्हॉए प्रांतात अशाच प्रकारे धर्मांतराचं अभियान चालवणारी तिशीतली महिला मादाम द वॉरेन्स हिच्या हाती अनाथ उनाड जाँ-जॅक लागतो. प्रेमळ, दयाळू, सुंदर मादाम द वॉरेन्स जाँ-जॅकच्या धर्मांतराची काळजी घेते. तिला या मनस्वी मुलात विशेष क्षमता जाणवतात. त्याला अस्सल जेंटलमॅन बनवण्यासाठी ती त्याच्या यथोचित शिक्षणाची व्यवस्था करते. पहिल्या क्षणापासूनच छोट्या जाँ-जॅकला मादाम द वॉरेन्सप्रति विशेष आकर्षण आणि प्रेम वाटते. ती त्याला लाडाने छोटू ( petit) म्हणून हाक मारत असे. तो तिला ममी म्हणून संबोधत असे. काही वर्षांनंतर मादाम द वॉरेन्स एकवीस वर्षीय जाँ-जॅकला प्रेमाच्या जगाचीही दीक्षा देते. रूसो त्याच्या आत्मकथनात मादाम द वॉरेन्ससह प्रेमाच्या जगात घालवलेल्या काळाचं वर्णन आयुष्यातील सगळ्यात सुखी काळ असा करतो. पण नंतर तरुण जाँ-जॅकला लक्षात येतं की त्याची जागा कुणा दुसऱ्या तरुणानं घेतल्यामुळे त्याच्या स्वर्गसुखाचा शेवट झालाय.

नव्या जीवनाच्या शोधात वयाच्या तिसाव्या वर्षी १७४२ मध्ये जाँ-जॅक पॅरिसला येतो. त्याला संगीतक्षेत्रात रुची असूनही, उपजीविकेसाठी छोटीमोठी कामं करावी लागतात. यापैकी एक काम म्हणजे व्हेनिसच्या फ्रेंच दूतावासात अॅम्बेसॅडरचा सचिव म्हणून नोकरी. तिथं मात्र जाँ-जॅकला पावलोपावली अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागतो. त्याला जाणवतं की तो दूतावासाचा नोकर असूनही, पण उमराव अॅम्बेसॅडर त्याला स्वत:चा खासगी नोकर समजतो आहे. जाँ-जॅक अॅम्बेसॅडरपेक्षा बुद्धिमान असला तरी त्याला त्याचं सामाजिक स्थान विसरता येत नसे. फ्रेंच अॅम्बेसॅडरला जाँ-जॅकमध्ये वरच्या वर्गाशी बरोबरी करू पाहणारा खालच्या वर्गातला उद्धट तरुण दिसत असे. वर्षभरातच जाँ-जॅकला अपमानित करून नोकरीवरून काढण्यात येतं. या अन्यायाची प्रचंड चीड येऊन, व्हेनिस ते पॅरिस हा दीर्घ प्रवास जाँ-जॅक पायी करतो. त्या दरम्यान त्याच्यावर झालेल्या अन्यायावर चिंतन करतो.

पॅरिसमध्ये जाँ-जॅक रूसो दनी दिदरो या प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञाच्या संपर्कात आला. त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. आधीच्या लेखात आपण पाहिलं की दिदरोला व्हॅन्सेनच्या तुरुंगात भेट देण्यासाठी पायी जात असताना दिजोंच्या अकादमीनं योजलेल्या निबंधस्पर्धेची जाहिरात वाचतो. ‘ज्ञान, विज्ञान, कला क्षेत्रातील प्रगती मानवासाठी उपकारक की अपकारक’, या प्रश्नावर घेण्यात आलेल्या त्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या लेखामुळे जाँ-जॅक रूसोचं आडनाव कुठल्याही आडनावापेक्षा कमी नाही, याची कल्पना जगाला येते. ‘बुद्धीप्रामाण्यवाद’, ‘प्रगती’, ‘नागरी सभ्यता’सारख्या प्रबोधनपर्वाच्या प्रिय संकल्पनांना मुळापासून प्रश्नांकित करणाऱ्या ‘डिस्कोर्स ऑन द आर्ट्स अँड सायन्सेस’ या लेखासाठी दिजोंच्या अकादमीनं प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित केल्यामुळे, १७५० मध्ये रूसोला सार्वजनिक चर्चाविश्वात मध्यवर्ती स्थान प्राप्त होऊन ऐतिहासिक प्रसिद्धी मिळाली. पण या काळात रूसोला त्याची आतापर्यंतची प्रस्थापित समाजाशी एकरूप होण्याची धडपड निरर्थक वाटून तो तत्कालीन समाजाशी फारकत घेतो. नंतर रूसो खंत व्यक्त करतो की ‘त्रासदायक प्रसिद्धी’ मिळवून देणारा निबंध वास्तवात असमाधानकारक आणि सुमारच म्हणावा लागेल. कारण मुळात, व्हॅन्सेन तुरुंगाच्या वाटेवर झालेल्या वैचारिक स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याचं शब्दांकन करणं अशक्यप्राय होतं. दिजोंच्या अकादमीसाठी लिहिलेल्या निबंधात त्या शब्दातीत अनुभवाची फक्त पुसटशी पडछाया दिसते.

त्याच दरम्यान रूसोनं Le devin du village हा एकांकी ऑपेरा लिहून संगीतबद्ध केला. ही त्याची दुसरी महत्त्वाची साहित्यकृती समजली जाते. त्याला भरपूर प्रसिद्धी आणि पॅरिसच्या अभिजनवर्गात प्रवेश मिळाला. रूसोचा ओपेरा फोन्तेनब्ल येथे साक्षात फ्रेंच राजा १५व्या लुईपुढं सादर करण्यात आला. राजाला रूसोचा ओपेरा इतका आवडला की त्यानं सरळ रूसोलो आमंत्रित करून आजीवन पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. फ्रेंच राजाकडून असा सन्मान मिळणं हा त्या काळात कुठल्याही साहित्यिक वा कलावंतांसाठी यशाचा परमोच्च बिंदूच. त्या पेन्शनमुळे रूसोचं जीवन नक्कीच सुरक्षित आणि प्रतिष्ठित होणार होतं. रूसोच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. आतापर्यंत उपरा म्हणून जगत आलेला रूसो पारंपरिक चौकटीतला विचारवंत साहित्यिक नव्हता. राजाकडून अशा प्रकारे उपकृत होण्यात रूसोला त्याच्या लेखणीची गुलामी दिसत होती. लेखणीनं गुलाम होणं त्याला अनैतिकच नव्हे तर आत्मद्रोह केल्यासारखं वाटत होतं. त्याला पेन्शन स्वीकारून ‘दरबारी’होणं अमान्य होतं.

दुसऱ्या बाजूला व्हॅन्सेन तुरुंगाच्या वाटेवरल्या तत्त्वज्ञानात्मक क्षणापासून त्याच्या डोक्यात वैचारिक वादळ घोंघावत होतं. पहिल्या निबंधात त्याला समाधानकारकपणे त्या वादळाला जागा करून देता आली नव्हती. फ्रेंच राजाकडून आजीवन पेन्शन स्वीकारल्यानं त्याला त्याच्या विचारांवर आणि एकूणच जगण्यावर गदा आणावी लागणार याची कल्पना होती. त्यामुळे रूसोनं फ्रेंच राजाचं आजीवन पेन्शन नाकारण्याचा निर्णय घेतला. पण त्या काळात साक्षात फ्रेंच राजाचं निमंत्रण स्वीकारणं हा सन्मान, तसंच ते नाकारणं हा घोर अपराध! हे दुधारी निमंत्रण कसं नाकारायचं? शेवटी रूसो आजारी असल्याचं कळवून पंधराव्या लुईला भेटणं टाळतो. लुईदेखील या ‘वेड्या’ तत्त्वज्ञाच्या अक्षम्य अपराधाकडे कानाडोळा करतो. थोडक्यात, व्हॅन्सेन तुरुंगाच्या वाटेवर झालेला साक्षात्कार रूसोच्या जीवनाला आणि लिखाणाला निर्णायक वळण देणारा क्षण ठरतो. त्या क्षणी झालेल्या साक्षात्कारानुसार रूसो त्याच्या जगण्यात मूलभूत ‘रिफॉर्म’ करण्याचा निर्णय घेतो.

खरं तर, ‘डिस्कोर्स ऑन द आर्ट्स अँड सायन्सेस’ या १७५० मधल्या निबंधातही सुरुवातीलाच रूसो प्राचीन रोमन लेखक वोव्हिडचं अवतरण उदधृत करतो: Barbarus hic ego sum quia non intelligor illis. या अवतरणाचा ‘मी त्यांना कळलो नाही म्हणून इथं मी बार्बेरियन ठरलो’ असा मुक्त अनुवाद करता येईल. ‘बार्बेरियन’ शब्दाचा आजच्या भाषेत ‘रानटी’ असा अर्थ होत असला तरी मूळ अवतरणात ‘अनाकलनीय बडबड करणारा’, ‘उपरा’, ‘बाहेरचा’ असा अर्थ अभिप्रेत आहे. त्याअर्थी रूसो त्याच्या पहिल्याच महत्त्वाच्या लिखाणात वाचकांना कल्पना देतो की प्रबोधनपर्वाच्या जगात तो उपरा,अनाकलनीय बडबड करणारा वेडा माणूस ठरणार आहे.

‘रूसो तत्त्वज्ञ नसूनही तत्त्वज्ञानाविषयी बोलतो’ असा आरोप प्रबोधनपर्वाच्या प्रस्थापित वर्तुळात नेहमीच झाला! त्यासंदर्भात १७६३ मध्ये रूसो ‘फिलॉसफीविषयी बोलण्याचा अधिकार कुणाला आहे?’ हा मूलभूत प्रश्न एका पत्रात उपस्थित करतो. तो लिहितो की, माझी कधीही तत्त्वज्ञ बनण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यामुळे मी कधी फिलॉसफर नव्हतो, आजही नाही आणि बनण्याची इच्छासुद्धा नाही. खरं तर, ज्या उपाधीची मला इच्छाच नाही ती माझ्यावर का आरोपित केली जाते? मला माहीत आहे की फक्त फिलॉसफरलाच फिलॉसफीविषयी बोलण्याचा अधिकार आहे. पण प्रत्येक मनुष्याला काहीतरी फिलॉसफी मांडण्याचा अधिकार आहे आणि मी त्यापलीकडे काहीही केलं नाही. इथं रूसो फिलॉसफी म्हणजे ‘ज्ञानाच्या व्यवहारातलं प्रस्थापित क्षेत्र ज्याची भाषा मोजक्यांनाच अवगत असते’ अशा व्याख्येपासून फारकत घेऊन, ‘प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अनुभवांशी प्रामाणिक असली तर काहीतरी लभूत आकलन हाती लागतं’ या व्याख्येचा पुरस्कार करताना दिसतो. थोडक्यात, फिलॉसफी म्हणजे फक्त मोजक्यांनाच अवगत अशी पांडित्यपूर्ण आणि मोजक्यांनी प्रमाणित केलेली मोजक्यांसाठीची भाषा असेल तर मी कधीही त्यांची भाषा बोललो नाही. बोलत नाही आणि बोलायची इच्छाही नाही, असं तो म्हणतो.

रूसोच्या ‘रिफॉर्म्स’बद्दल पुढल्या लेखात.