मराठी भाषेत लिहिलेला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता लाभावी असा ग्रंथ म्हणजे ‘आधुनिक भारत’. या ग्रंथकर्त्यांच्या, म्हणजे आचार्य जावडेकर यांच्या लेखणीचा, विनोबा आणि भूदान आंदोलनाला स्पर्श झाला. आचार्य जावडेकर यांनी भूदान आंदोलनावर एकूण तीन आणि विनोबांवर एक लेख लिहिल्याचे आढळते. यातील विनोबांवरील लेख त्यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती निमित्ताने लिहिला होता. ‘साधना’मध्ये १० सप्टेंबर १९५५ रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचे शीर्षक होते ‘ब्रह्मर्षी विनोबा’.

विनोबांनी गीताई चिंतनिकेत देवर्षी, ब्रह्मर्षी आणि राजर्षी यांची लक्षणे असणाऱ्या तीन महानुभावांची निवड केली आहे. हे तीन महान नेते अनुक्रमे रवींद्रनाथ, अरिवद आणि गांधीजी होते. विनोबांना ब्रह्मर्षी हे विशेषण देऊन आचार्य जावडेकरांनी त्यांना अरिवदांच्या समतुल्य स्थान दिले, ते उचितच आहे. कारण विनोबांमध्ये अरिवदांची साधना आणि गांधीजींचे राजकारण यांचा मिलाफ दिसतो.

लेखाच्या आरंभीच जावडेकर विनोबांची महती सांगतात. ‘‘भारताच्या महत्भाग्याने आचार्य विनोबा हे एक फार मोठे ब्रह्मर्षी निर्माण झाले आहेत. ब्रह्मर्षीचे समाजधारणेत व समाजक्रांतीत कोणते विशिष्ट कार्य आहे ते आपण प्रथम समजून घेतले पाहिजे. ब्रह्मर्षी हा फार प्राचीन शब्द कोणास पसंत नसेल, अथवा समजत नसेल तर संत हा शब्द योजावा. पण ब्रह्मर्षी हा शब्द जसा प्राचीन तसा ‘संत’ हा शब्द मध्ययुगीन म्हणून कोणास रुचणार नाही.

प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ व आधुनिक काळ या सर्वाना पूज्य अशी काही जीवनमूल्ये आहेत, हे ज्यांना मान्यच करवत नाही, त्यांना विनोबा हे आधुनिक जगात महत्कार्य करू शकतील किंबहुना ते तसे आजही करीत आहेत हे पटवून देणे फार कठीण आहे. पण ते त्यांना पटले नाही, तरी भारतीय जनतेला विनोबांचे महत्कार्य पटू लागले आहे, यात शंका नाही.’’

गांधीजींच्या निर्वाणानंतर अशा एका संताची भारताला गरज होती. जनतेच्या हृदयावर आत्मबलाने राज्य करणारा संत असे जावडेकर विनोबांचे वर्णन करतात. गांधीजींच्या प्रमाणेच विनोबाही संत आणि क्रांतिकारक होते. जावडेकरांना जाणवलेला विनोबांच्या व्यक्तित्वाचा विशेष म्हणजे सामान्य जनता आणि जय प्रकाश नारायण यांच्यासारखा बुद्धिनिष्ठ क्रांतिकारक या दोन्ही गटांना विनोबांविषयी आदर वाटतो.

गांधीजी आणि विनोबा हे दोघेही अंतर्बाह्य क्रांतिकारक होते याविषयी जावडेकरांच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे ऋषी किंवा संत क्रांतिकारक असूच शकत नाहीत, हे मत असणाऱ्या वर्गाला जावडेकर फार किंमत देत नाहीत. अगदी सुरुवातीपासून भूदान आंदोलन हा टीकेचा आणि चेष्टेचा विषय होता. अगदी मान्यवर नेत्यांनी अत्यंत अशोभनीय भाषेत विनोबांची नालस्ती केल्याचे दिसते. अशा गंभीर आणि उथळ टीकाकारांना आचार्य जावडेकरांचे लिखाण सडेतोड उत्तर देते. भूदानामागच्या आध्यात्मिक आणि लौकिक अधिष्ठानांबद्दल आचार्याना आदर होता. भूदान यज्ञ आणि त्याचा प्रवर्तक यांच्याविषयी ‘आधुनिक भारता’ चा आढावा घेणाऱ्या जावडेकरांना आदर वाटावा, ही बाब बरेच काही सांगणारी आहे.