scorecardresearch

साम्ययोग : मी ब्रह्मपुत्र आहे..

‘मी रिकाम्या हाताने या देशात आलो आहे आणि रिकाम्या हातानेच परतेन. पण पाकिस्तानात भूदानाचे कार्य सुरू झाले, तर लाखो लोकांचे हृदय जोडण्याचे कार्य होईल.

साम्ययोग : मी ब्रह्मपुत्र आहे..
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अतुल सुलाखे

‘मी रिकाम्या हाताने या देशात आलो आहे आणि रिकाम्या हातानेच परतेन. पण पाकिस्तानात भूदानाचे कार्य सुरू झाले, तर लाखो लोकांचे हृदय जोडण्याचे कार्य होईल. मैत्री, प्रेम, करुणा, दु:खितांची सेवा हे धर्माचे सार आहे. कुराणात म्हटले आहे- मिम्मा रजक्ना, हुम् युन्फिकून.. म्हणजे आपल्या उत्पन्नातील थोडे इतरांना द्या..

अल्लाहून् नुरुस् समावति वाल् अरद्.. म्हणजे अल्ला धरित्री- आकाशाचा प्रकाश आहे. लहानसा दीप, घराच्या एका कोपऱ्यात असतो, पण सारे घर आलोकित करतो. त्याचप्रमाणे ईश्वर लहानशा हृदयात वास करतो. परंतु त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो. ईश्वरावर अशा प्रकारे श्रद्धा ठेवून मी येथे आलो आहे.

आपण सारे एक आहोत; ज्याप्रमाणे अल्ला एक आहे, मानव एक आहे. जातिभेद, धर्मभेद, देशा-देशांतील भेद, मालिक-मजूर भेद, जोपर्यंत मिटत नाहीत, ग्राम-परिवार होत नाही तोपर्यंत ग्राम-निर्माण होणार नाही. त्याची उन्नती होणार नाही. म्हणून मी पहिल्या दिवसापासून भूदान मागत आहे.

पत्रकार विचारतात की भूदानासाठी अशी संस्था उभी करणार का? मी उत्तर देतो, माझा संस्थेवर विश्वास नाही. माझा विश्वास मनुष्याच्या हृदयावर आहे. मला विचारण्यात आले की भारतातील तुमचे कार्य पूर्ण झाले का? मी म्हणालो, माझे काम प्रेमाचे आहे. सगळय़ांवर माझे प्रेम आहे. हे प्रेम देश-विदेश, हिंदू-मुस्लीम असा भेद मानत नाही. पूर्वेकडे तोंड करून ईश्वराचे नाव घ्यायचे की पश्चिमेकडे, हे सर्व बाहेरील भेद आहेत. खरी गोष्ट तर हृदयात आहे. आपण सर्वाना फसवू शकतो, पण ईश्वराला फसवू शकणार नाही. सत्यच धर्म बाकी सर्व गोष्टी बाह्य आहेत.

मला जेव्हा प्रश्न करतात की मी कुठला निवासी आहे? तेव्हा मी म्हणतो की ब्रह्मपुत्र नदी जशी सगळय़ा देशांची तसा मीदेखील सर्व देशांचा आहे.

भूदान हा एका देशासाठीचा विचार नाही. तो सर्व देशांसाठी आहे आणि विशेषत: आशिया महाखंडासाठी आहे. जिथे जमीन कमी, लोकसंख्या अधिक आहे. प्रेमाच्याच

मार्गाने भुकेचा प्रश्न सोडवावा लागेल. इस्लामचा अर्थ शांती आहे. परंतु पोटात भूक असताना शांती कशी प्राप्त होईल? म्हणून प्रथम पोटाची शांती झाली पाहिजे, त्यानंतरच चित्ताला शांती मिळेल.

लोक विचारतात की सगळय़ा प्रश्नांना भूदान हे पूर्ण उत्तर आहे, की हे एक साधनमात्र आहे? माझे म्हणणे हे आहे की, माझा उद्देश प्रेमभावना व्यापक करणे हा आहे. सर्व देशांतील सर्व जण एकमेकांचे भाऊ आहेत. त्यांच्यात दुजेपणा वा भेद नाही. प्रत्येक गाव एक परिवार होईल. ही भावना भूदानासाठी आहे.’ (संदर्भ- आचार्य विनोबा भावे- विजय दिवाण).

भूदानच नव्हे तर विनोबांच्या समग्र जीवनचरित्राचे हे सार आहे. भूदान, ग्रामदान आणि अंतिमत: साम्ययोगाचे लघुरूप म्हणून या चिंतनाकडे पाहता येईल. विनोबांनी उदंड यत्न केला. जगताचा जयकार केला. नंतर ईश्वराची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेची ईश्वराने कशा प्रकारे दखल घेतली?

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या