सर्वोदयाचा विकास करताना विनोबांनी गांधीजींच्या संकल्पनांना आध्यात्मिक आणि तात्त्विक अधिष्ठान दिले. ‘विश्वस्त’ ही त्यापैकी एक आणि महत्त्वाची संकल्पना आहे.

समाजातील धनिकांनी आपल्याकडील संपत्तीचे मालक नव्हे विश्वस्त म्हणून जगावे असा विश्वस्त वृत्तीचा अर्थ काढला जातो. गांधींजींच्या अव्यवहार्य म्हणून मानल्या गेलेल्या संकल्पनांमधे विश्वस्तवृत्ती हीदेखील एक संकल्पना आहे. तथापि या संकल्पनेला भारतीय परंपरेचा आणि वैश्विक परंपरेचाही संदर्भ आहे. आपल्याकडील वर्णाश्रम व्यवस्थेने केवळ वैश्य वर्णाला धनसंचयाची परवानगी दिल्याचे दिसते. वैश्यांनी या धनाचा उपयोग भोगासाठी नव्हे तर सेवेसाठी करणे अपेक्षित आहे. याचे विवेचन गीताई चिंतनिकेमध्ये आले आहे. पुढे गांधीजींनी एकादश व्रतांमधे अपरिग्रहाचा स्वीकार केल्यामुळे तिला आपोआपच व्यापक रूप प्राप्त झाले.

वैश्विक पातळीवरही अपरिग्रहाचे तत्त्व प्रतिष्ठित आहे. मार्क्‍सचे उदाहरण देता येईल. ही सृष्टी आपण पुढच्या पिढीकडून कर्ज म्हणून घेतली आहे, असे तो म्हणतो तेव्हा तो एका अर्थी संयम, नि:स्वार्थ आणि विश्वस्त कल्पनांचाच पुरस्कार करतो, असे म्हणता येईल. अन्य धर्मामध्येही त्याग आणि अपरिग्रह या मूल्यांना मोठी प्रतिष्ठा आहे.

गांधीजींनी दिलेला विश्वस्त वृत्तीचा विचार हा क्रांतिकारी आणि व्यापक आहे. तो जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करतो. ही संकल्पना भांडवल, व्याज, भाडे, नफा इतकी सीमितही नाही. विनोबांच्या मते, आज भांडवलदार आणि मजूर दोन्ही वर्ग स्वत:पुरता विचार करतात. परिणामी स्वार्थाचा संघर्ष होतो. मजुरांमध्येही बंधुभाव, सामाजिक जाणीव, एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती या गोष्टी जाग्या होतील तेव्हाच खरी क्रांती होईल. शोषणाच्या प्रक्रियेत कुणीही सहकार्य देऊ नये हा त्यांचा मंत्र आहे.

समाजात विश्वस्त वृत्ती नसेल तर त्याचा फटका त्या समाजालाच बसतो. मोठमोठे उद्योग चार-दोन लोकांच्या हाती असणे यात मोठा धोका आहे, असे विनोबांचे म्हणणे आहे. जमीन गावाच्या मालकीची आणि उद्योगांचे राष्ट्रीयीकरण असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी सुचवला होता. खासगी मालकीमुळेच मालकांना प्रेरणा मिळेल असे मानणे हा अधर्म आहे, इतका त्यांचा मूठभरांच्या मालकीहक्काला विरोध होता. विनोबांचा विश्वस्त वृत्तीचा विचार इतका सीमित नाही. नेहमीप्रमाणे त्यांनी या विचाराला गीतेची आणि साम्ययोगाची बैठक देऊन गांधीजींचा विचार सखोल आणि व्यापक केला. साम्ययोग आणि विश्वस्त कल्पना यांचा मेळ अत्यंत उचित आणि मनोज्ञ आहे.

गांधीजी असोत की विनोबा ते कोणत्याही कृतीला सत्य, अिहसा आदी कसोटय़ा लावणार हे उघडच होते. भौतिक समस्यांचा बारकाईने अभ्यास, त्यांना तत्त्वज्ञानाचा आणि अध्यात्माचा आधार, समस्यांच्या सोडवणुकीसाठी जनजागृती आणि हृदयशुद्धी हीच त्यांची काम करण्याची रीत होती. या मार्गाने जाताना लवकर यश मिळत नाही, इतकेच नव्हे तर अशी पद्धती संपूर्ण अपयशी ठरल्याचे दावे सहजपणे केले जातात. परंतु हा मार्ग टाळून कृती केली नाही तर ‘तातडीची भिंत पायाविण’अशी स्थिती निर्माण होते. ती कशी रोखायची हा कळीचा मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे.