अतुल सुलाखे

दानामध्ये दात्याचा हात वर आणि घेत्याचा हात खाली अशी धारणा असते. तिच्यामध्ये फार काही चुकीचे नाही. दानामुळे दात्याचे नाव होते, पण दान घेणाऱ्याला अगदी याचक म्हणण्याइतपत वेळ येते. आपल्याला दानशूर माहिती असतो, पण दात्याला शुद्ध करणारे एखादे दान आहे का हे मुद्दाम शोधावे लागते. विनोबांनी भूदानामध्ये देणारा आणि घेणारा एकाच पातळीवर आणले.

या दानयज्ञाला चालना देणारा माणूस स्वत:च दात्यांसमोर उभा आहे. सर्वात जास्त जमीन मला हवी कारण मी भूमिहीन आहे आणि सर्वात जास्त जमीन माझ्याकडे आहे म्हणून मी जमीनदारही आहे अशी विनोबांची भूमिका होती. याचा सामाजिक आणि आर्थिक अंगाने विचार केला तर आत्ता जमीन दिली तर स्वत:चा उद्धार करून घ्याल आणि मिळालेल्या जमिनीचा सुयोग्य वापर केला, ती कसली तर तुमचे समग्र परिवर्तन होईल. थोडक्यात भूदानाची प्रक्रिया ही समाजाच्या कल्याणाची प्रक्रिया होती.

विनोबांनी भूदानाच्या अनुषंगाने काही कळीच्या गोष्टी सांगितल्याचे दिसते. त्यांच्या मते, ‘दान म्हणजे न्याय्य हक्क. न्याय म्हणजे कायद्यातील न्याय नव्हे तर ईश्वराचा न्याय. ईश्वराचा न्याय म्हणजे सर्वाना पाणी, सर्वाना प्रकाश, सर्वाना जमीन. मी भिक्षा मागायला नव्हे तर दीक्षा द्यायला आलो आहे. देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची प्रतिष्ठा वाढवायला आलो आहे.’

विनोबा जमीनदारांना स्वामित्व विसर्जनाची दीक्षा देत होते. मोठय़ा जमीनदारांनी दिलेली किरकोळ जमीन ते नाकारत. एकदा तीनशे एकर जमीन असणाऱ्या श्रेष्ठीने केवळ एक एकर जमीन दान म्हणून दिली. विनोबांनी ते दान थेट नाकारले. त्या जमीनदाराला सांगितले की, ‘इतके कमी दान दिल्याने तुमची बदनामी होईल. मी सगळय़ांची प्रतिष्ठा वाढवायला आलो आहे. श्रीमंतांची आणि गरिबांचीही. जर मला आश्रमासाठी जमीन हवी असती तर मी हे दान स्वीकारले असते. पण मी आज दरिद्री नारायणाचा प्रतिनिधी या नात्याने मागतो आहे.’ त्या जमीनदाराने ३० एकराचे दानपत्र भरून दिले.

या प्रसंगामुळे विनोबांच्या लक्षात आले की दानाची प्रेरणा असली तरी कंजुषी आहे. त्यामुळे त्यांनी लहान दान घ्यायचे नाही हे ठरवले. एकदा १० हजार एकर मालकीची असणाऱ्या जमीनदाराने शंभर एकर जमिनीचे दानपत्र लिहून दिले. विनोबांनी त्या दानपत्राला स्पर्शही केला नाही. विनोबांनी भर सभेत दानपत्रे फाडून टाकल्याचेही प्रसंग आहेत.

पालकोटच्या राजाने ४५ हजार ५०० एकर जमिनीचे दान केले. ते भूदानाचे कार्यकर्ते बनले. आपले वैभव सोडून ते खादीधारी कार्यकर्ते झाले. एवढेच नव्हे तर ते भूदानासाठी पदयात्राही करू लागले. भूदान यज्ञाची महत्ता त्यांच्या शब्दांत जाणली, तर या भूदानाविषयीचे अनेक प्रश्न दूर होतील : ‘विनोबा आमची जमीन घेतात आणि आम्हाला जीवनदान देतात. त्यांनी आम्हाला वाचवले आहे. नाही तर रशिया- चीनच्या जमीनदारांप्रमाणे आमचीही दुर्गती झाली असती. या भूदान यज्ञात जमीन अर्पण करण्यात आमचे हित आहे. काळाची पावले ओळखून वागण्याने आमचे कल्याण होईल. नाही तर विनाश अटळ आहे.’

दान घेणारा आणि देणारा दोघांनाही विनोबांनी यानिमित्ताने जीवनदान दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24@gmail.com