अतुल सुलाखे

जेथे मी दान घेतो तेथून मी हृदयमंथनाची, हृदयपरिवर्तनाची, चित्तशुद्धीची, मातृवात्सल्याची, मैत्रीची आणि गरिबांप्रति प्रेमाची आशा धरतो. जेथे इतरांच्या चिंतेची भावना जागृत होते तेथे समत्व बुद्धी प्रगट होते..

.. भूदान हा एका देशासाठीचा विचार नाही, तो सर्व देशांसाठी आहे आणि विशेषत: आशिया खंडासाठी आहे. जिथे जमीन कमी, उद्योगधंदे कमी आणि लोकसंख्या अधिक आहे..

– विनोबा

माणसाला अंतिमत: ओढ असते ती स्थिरावण्याची. शांतपणे आयुष्य जगण्याची. रामायण, महाभारत, राम, कृष्ण, बुद्ध, अशोक, अकबर आदींचा जीवनप्रवास शांततेने जगण्याचीच प्रेरणा देतो. वैदिक धर्मही कर्मकांडांकडून शांततेकडे वळला आणि उपनिषदांचे तत्त्वज्ञान आकाराला आले. आरण्यके आणि उपनिषदे या अतिप्राचीन दर्शनांनी त्या वेळेच्या थकलेल्या समाजमानसाला शांत केले. श्रमण आणि भिक्खू संस्कृतीने हा अहिंसा धर्म अधिक व्यापक आणि तितिक्षाप्रधान केला. क्रोधाला अक्रोधाने जिंकावे, दुष्प्रवृत्तींना दूर करून सत्प्रवृत्तींनी समाजात अग्रस्थानी राहावे, विरोधकांकडेही सत्याचे कण असणार, ते जाणून घ्यावेत, त्यांचा स्वीकार करावा आणि जीवन उन्नत करावे. ‘धर्मक्षेत्रे मतिर्मम’ या शिकवणीचा विसर पडू नये.

या देशातील समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र वरील मूल्यांवर आधारित आहे. या मूल्यांचा विसर पडला की इथले समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र सावध होते. तातडीच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना भूतकल्याणप्रधान दर्शनाची प्रस्थापना होते. वैदिक, अवैदिक, भारतासाठी तुलनेने नवीन असणारी दर्शनेही याला अपवाद नाहीत. दारा शुकोह आणि अकबर यांचे चिंतन याची साक्ष देणारे आहे. शिवरायांनी तर ‘मुद्रा भद्राय राजते’ अशी मुद्रा धारण करून कल्याणकारी राज्य कल्पनेचा उदोकार केला.

या भूमीतील संत, महाकवी, सम्राट ते अगदी बालकेही स्नेह आणि साधुतेला अनुकूल असे मन घेऊनच जन्माला येतात. भरतखंडातील ही दार्शनिक परंपरा सार्वत्रिक आणि सर्वमान्य आहे. तिला छेद बसेल असे काही घडले की ती परंपरा दुष्ट बुद्धीचाच नाश करते. गांधीजींच्या सत्याग्रहाचे आणि विनोबांच्या सत्याग्रही भूमिकेचे आणि साम्ययोगाचे मूळ या परंपरेत आहे.

या विश्वकल्याणदायी भूमिकेचे पुनर्दर्शन भूदानामुळे झाले. किमान पाच हजार वर्षांचे चिंतन भूदानामध्ये एकवटले. विनोबांनी सर्व धर्माचा आदर करत त्यांच्या कालसुसंगत शिकवणीची पुनस्र्थापना केली. तेच तत्त्व घेऊन त्यांनी भूदान यज्ञात सेवा अर्पण केली.

या यज्ञाला अपार प्रतिसाद मिळाला. व्यवहार आणि अध्यात्म एकमेकांना पारखे नाहीत कारण दोहोंना दृष्टीने व्यष्टी आणि समष्टीचे ऐक्य मान्य आहे. या आणि अशा असंख्य कारणांनी भूदानाने परमादर मिळवला आणि आजही तो टिकून आहे.

भूदानाच्या अशा कितीतरी रम्यता आणि साम्यता प्रकट करणाऱ्या कथा आहेत. त्यांचे गुण आपल्या जवळचे झाले की युद्धाच्या कथा ऐकवणारसुद्धा नाहीत मग त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटणारी रम्यता खूप दूरची गोष्ट झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24@gmail.com