विज्ञान आणि तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत गेली तसतसं ‘वर्षाची लांबी किती’ या प्रश्नाचं उत्तर अधिकाधिक अचूक होत गेलं. अचूकतेकडचा माणसाचा प्रवास हा काळासारखाच अनंत आहे. जूलियस सीझरच्या काळी सर्वमान्य उत्तर होतं ३६५.२५ दिवस. आधुनिक विज्ञानाने शोधून काढलेलं उत्तर आहे ३६५.२४२१८९७ दिवस! दशांश चिन्हानंतर सात आकडे! वर्षाची लांबी आता मिलिसेकंदांपर्यंत सांगता येते.
वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर जूलियस सीझरचं कॅलेंडर सौर वर्ष ३६५ दिवस ६ तास इतक्या कालावधीचं असतं या गृहीतकावर आधारलेलं होतं, तर प्रत्यक्षात सौर वर्ष ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटं ४५.१९ सेकंद इतक्या कालावधीचं असतं.
हा काय प्रकार आहे तेदेखील नीट समजून घेतलं पाहिजे. वर्ष ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटं ४५.१९ सेकंद इतक्या कालावधीचं असतं म्हणजे या वर्षी मध्यरात्री १२ वाजता ३१ डिसेंबरची पार्टी केली तर पुढल्या वर्षी ती पहाटे ५ वाजून ४८ मिनिटं ४५.१९ सेकंदांनी करायची का? तसं नसतं. पुढल्या वर्षीही नवं वर्ष मध्यरात्री १२ वाजताच चालू होणार. पण हा जो फरक आहे तो भरून काढण्यासाठी कॅलेंडरकर्ते ना-ना युक्त्या-प्रयुक्त्या करतात. लीप वर्ष वगैरे प्रकार आहेत ते याच कारणामुळे. म्हणजे नवं वर्ष तर मध्यरात्री १२ वाजताच सुरू व्हावं आणि तरीही वर्षाची लांबी मात्र अमुक दिवस तमुक तास इतकी मिनिटं आणि तितकी सेकंद राहावी हे ‘काळाचे गणित’ सोडवायचं असतं.
आता नीट लक्ष द्या. जूलियन कॅलेंडरनुसार वर्षाची लांबी आणि प्रत्यक्षात वर्षाची लांबी यात साधारण अवघा सव्वाअकरा मिनिटांचा फरक आहे. फार नाही. कदाचित दुर्लक्ष करण्याजोगा वाटेल कुणाला. पण थोडी आकडेमोड करून पाहू.
जूलियन कॅलेंडरची चार वर्षं म्हणजे ३६५.२५ × ४ = १४६१ दिवस आणि आधुनिक विज्ञानानुसार चार वर्षं म्हणजे ३६५.२४२२ × ४ = १४६०.९६८८ दिवस, म्हणजे साधारण १४६१ दिवसच की. म्हणजे चार वर्षांत जूलियन कॅलेंडर काही फार चुकलं आहे असं म्हणता येणार नाही. चार सोडा, ४० वर्षांनंतरदेखील जूलियन कॅलेंडरची कालगणना आणि प्रत्यक्षात चालत असलेलं ऋतुचक्र यांत पूर्ण एका दिवसाचाही फरक पडत नाही.
आता याला १०० ने गुणू. ४०० वर्षं. जूलियन कॅलेंडरनुसार १,४६,१०० दिवस आणि प्रत्यक्षात सुमारे १,४६,०९७ दिवस. जवळजवळ तीन दिवसांचा फरक पडला!
याला पुन्हा ४ ने गुणू. आता १६०० वर्षं झाली. जूलियन कॅलेंडरनुसार ५,८४,४०० दिवस झाले आणि प्रत्यक्षात मात्र अवघे सुमारे ५,८४,३८८ दिवस. म्हणजे जवळजवळ १२ दिवसांचा फरक!
थोडक्यात काय तर जूलियन कालगणनेतलं वर्ष हे प्रत्यक्षातल्या वर्षापेक्षा सुमारे सव्वाअकरा मिनिटांनी मोठं असल्यामुळे वर्ष-दोन वर्षांत किंवा अगदी ४०-५० वर्षांत फारसा फरक जाणवत नसला तरी हा फरक गणिती श्रेणीने वाढत जातो आणि दर ४०० वर्षांत सुमारे तीन दिवसांचा फरक पडतो.
हा फरक वेळीच दुरुस्त केला नाही तर काही सहस्राकांतच कॅलेंडरमधले महिने आणि प्रत्यक्षात अनुभवायला येणारे ऋतू यांचा काही ताळमेळच राहणार नाही. आणि काही सहस्राकं हा एका मानवी आयुष्याच्या दृष्टीने प्रचंड मोठा कालावधी असला तरी ऐतिहासिकदृष्ट्या हा कालावधी फार मोठा म्हणता येत नाही. आणि म्हणून चांगलं कॅलेंडर कोणतं तर ज्याचा आणि ऋतुचक्राचा मेळ कित्येक सहस्राकांनंतरदेखील कायम राहील असं कॅलेंडर.
नेमकं इथेच जूलियन कॅलेंडर कमी पडलं. ‘वर्षाची लांबी किती’ याच्या किंचित चुकीच्या उत्तरावर हे कॅलेंडर आधारित होतं. त्यामुळे सुमारे १६०० वर्षांनंतर त्यात बदल करणं गरजेचं झालं.
काय गंमत आहे पाहा. जूलियस सीझरच्या आधी सुमारे शंभर-एक वर्षं हिप्पार्कस या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने वर्षाच्या लांबीचा ३६५.२४६७ दिवस असा अधिक अचूक अंदाज वर्तवला होता. जूलियस सीझरने तेव्हा त्याच्या कॅलेंडरसाठी हा अधिक अचूक अंदाज वापरला असता तर?
पाहू. वर्षाची लांबी ३६५.२४६७ दिवस धरून दोन सहस्राकांचे होतात ७,३०,४९३.४ दिवस आणि प्रत्यक्षात होतात ७,३०,४८४.४ दिवस. म्हणजे सुमारे नऊ दिवसांचा फरक. तेव्हा, अधिक अचूक अंदाज हादेखील पुरेसा अचूक अंदाज नव्हता, असंच म्हणावं लागेल.
म्हणजे जरी जूलियन कॅलेंडर या अंदाजावर आधारित असतं तरी त्यात बदल करणं गरजेचं झालंच असतं. फक्त कदाचित पोप ग्रेगरींनी १६ व्या शतकात जे काम केलं ते काम सध्याच्या काळात कोणाला तरी करावं लागलं असतं!