मागच्या एका लेखापुरतं विषयांतर करावं लागलं होतं. पण आज मात्र हरदासाची कथा मूळ पदावर! पुन्हा एकदा शालिवाहन शकाचा ऊहापोह.

शालिवाहन शक ही कालगणना मोठी नियमबद्ध आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग हा की कोणत्याही परिस्थितीत पंचांगकर्त्यांनी या नियमांचं पालन केलं आहे. उदाहरण म्हणून क्षय तिथी आणि वृद्धी तिथी या संकल्पना पाहा. तिथीची व्याख्या हा नियम झाला. तो नियम अनुसरताना एखाद्या तिथीचा क्षय झाला म्हणून किंवा दिवस उलटला तरी तिथी तीच राहिली (वृद्धी तिथी) म्हणून नियमांना बगल देणं वगैरे प्रकार नाही! त्यापेक्षा कालगणनेत क्षय आणि वृद्धी तिथी ठेवल्या सरळ.

तीच गत महिन्यांची. महिन्यांच्या नावाच्या नियमाचं पालन करताना अधिक महिना निष्पन्न झाला, मग त्याकरता नियम वाकवणं वगैरे करामती नाहीत. त्यापेक्षा अधिक महिना स्वीकारला सरळ.

पण या तीनही उदाहरणांमध्ये तसं पाहता फारसं काही अवघड नव्हतं. कारण एखाद्या तिथीचा क्षय झाला असला तरी ती तिथी असतेच. कोणत्याच सूर्योदयाला ती नसते, एवढंच काय ते. आणि अधिक महिना हा तर चांद्र मास – सौर वर्ष अशा प्रकारच्या कालगणनांमध्ये अटळ आहे. त्यामुळे हे नियम पंचांगकर्त्यांनी पाळले यात विशेष काही नाही असं एक वेळ म्हणता येईल.

पण महिन्याच्या नावाचा नियम पाळताना एखादा महिना लुप्तच झाला तेव्हाही पंचांगकर्त्यांनी त्यांच्या नियमाला मुरड घातली नाही. त्यापेक्षा त्यांनी तो महिना गायब झाला हे स्वीकारलं! नियमबद्धतेची कमाल आहे ही!

महिना गायब होतो? हो! अख्खा महिना गायब होतो. अशा गायब झालेल्या महिन्याला, अर्थातच, क्षय मास म्हणतात. यापूर्वी सन १९६३ आणि सन १९८३ या दोन वर्षी असा महिना गायब झाला होता. पण आता एवढ्यात हे घडणार नाही. यापुढचा क्षयमास अजून सुमारे शंभर वर्षांनी सन २१२३ मध्ये येईल.

पण ‘काळाचे गणित’ सोडवायचं तर ही घटना नेमकी काय आहे, ती कशी घडते, का घडते हे सारं समजून घेतलं पाहिजे. आज तेच करू.

समजा, नवा महिना चालू झाला तेव्हा सूर्य धनू राशीत आहे. नियमानुसार या महिन्याचं नाव ‘पौष’. पण हा महिना सुरू झाल्यावर काही काळातच सूर्य मकर राशीत गेला. मग पौष शुक्ल पक्ष संपला, पौर्णिमा येऊन गेली, कृष्ण पक्ष संपला आणि अमावास्या संपायच्या आत सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत गेलासुद्धा. थोडक्यात, पुढचा महिना सुरू झाला तेव्हा सूर्य कुंभ राशीत होता. मग या नव्या महिन्याचं नाव नियमानुसार अर्थातच, फाल्गुन असेल! म्हणजे मधला माघ महिना चक्क गायब झाला. क्षय मास, क्षय मास म्हणतात तो हा असा निष्पन्न होतो. सोबतची आकृती पाहा म्हणजे हे चटकन स्पष्ट होईल.

आता पुढचा मुद्दा. समजा, एखाद्या वर्षी असा एखादा महिना गायब झाला तर ते वर्ष अकरा महिन्यांचं होतं का? मुळीच नाही. ते शक्यच नाही. ज्या ज्या संवत्सरात अशा एखाद्या मासाचा क्षय होतो त्या संवत्सरात निश्चितपणे एक तरी अधिक मास असतोच असतो. त्यामुळे होतं काय तर वर्षाची लांबी १२ महिनेच राहते आणि वर्ष ३५४-३५५ दिवसांचं राहतं.

वर्षात एकूण १२ महिने असतात. त्यातल्या कोणत्याही महिन्याचा क्षय होऊ शकतो का? मुळीच नाही. काही ठरावीक महिनेच क्षय पावू शकतात. आणि जसं हे खरं आहे तसंच काही ठरावीक महिनेच अधिक असू शकतात हेही खरं आहे. हे असं का हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आणि आपण त्याचं उत्तरदेखील पाहणार आहोत. पण ते पुढल्या भागात.