शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ने अनेक सिनेमे दिले. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेकांना या कथेने आकर्षित केले. प्रत्येकाने आपापल्या नजरेतून प्रेमाचा हा त्रिकोण रेखाटण्याचा प्रयत्न केला. पारो अर्ध्या रात्री देवदासकडे येते. ‘एवढ्या रात्री आलीस. उद्या तोंड कसं दाखवशील?’ असा देवदासचा प्रश्न असतो. ‘ती हिंमत माझ्यात आहे’, असं उत्तर पारो देते. ‘उद्या तुझी मान शरमेनं झुकणार नाही का?’ या देवदासच्या प्रश्नावर पारोचं उत्तर असतं, ‘तू पुरुष आहेस. आज ना उद्या लोक तुझ्यावरचा डाग विसरतील. दोन दिवसांनंतर कोणी लक्षातही ठेवणार नाही की कधी कोण्या रात्री एक दुर्दैवी पार्वती आपल्या कुलशीलाची पर्वा न करता तुझ्या पायावर डोकं टेकवण्यासाठी आली होती.’ देवदास पारोला माघारी जायला सांगतो. ही झाली जुन्या देवदास आणि पारोची गोष्ट. अनुराग कश्यपच्या ‘देव डी’मधील पारो मात्र बाणेदार उत्तर देते. कारण ती नव्या युगाची, आधुनिक परिवेशातली पारो आहे. ती आतल्या आत जळत नाही आणि अश्रूही ढाळत नाही.
देवदास ही खरंतर मानवी मनाच्या पराभवाची कथा आहे. एखादी व्यक्ती प्रेम करते, पण ते व्यक्त करण्याची आणि नाते टिकवण्याची ताकदच गमावून बसते. देवदास हा असा नायक आहे. देवदास आणि पारो हे आत्म्यांचे मीलन न झालेले दोन ध्रुव कधीच एकत्र येत नाहीत. शेवटच्या बिंदूवर देवदास पारोच्या उंबऱ्यापर्यंत आलेला आहे पण तो उंबरा ओलांडू शकलेला नाही, त्याच्यामध्ये ते साहसच नाही. आणि इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की देवदास आतून जो कोसळतो तो प्रेमामुळे नाही तर स्वत:च्या कमजोर मानसिकतेतून आलेल्या अपराधभावाने. जिथं नात्याची भावना अडखळत व्यक्त होते आणि नाती सांभाळताना पाय लटपटतात अशी ही व्यक्तिरेखा आहे. एखादी गोष्ट मिळवल्यानंतर ती टिकवण्यासाठी जी जिद्द आणि असोशी लागते तिचा अभाव हा त्या व्यक्तीला आतून पोखरत असतो. असा हा देवदास, पारो, चंद्रमुखी यांच्या प्रेमाचा त्रिकोण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या चित्रपटांतून पाहायला मिळाला. त्रिकोणाच्या प्रत्येक बिंदूवर यातले तिघेही आपापल्या वाट्याचे दु:ख घेऊन उभे आहेत. वेगवेगळे कलावंत या अनुभवाला भिडले पण सातत्याने त्यासाठीचं आवाहन शरदचंद्र यांच्या कथेने केलं. साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांची ‘देवदास’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. बोलपटाला सुरुवात होण्याआधीही या कथेवर मूकपटाची निर्मिती झाल्याची नोंद आहे. प्रत्येक पिढीला या कथेने खुणावलं हे त्या कथेचं यश. केवळ देवदासवर झालेल्या चित्रपटांसह आणखीही काही चित्रपट, काही मालिका, लघुपट अशा माध्यमातून शरदचंद्र यांची कादंबरी, कथा नवा अनुभव देत राहिली. प्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी अलीकडेच शरदचंद्र यांच्या ‘पाथेर दाबी’ या कादंबरीवर सिनेमा काढण्याचं जाहीर केलं. या कादंबरीला पुढच्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशांनी या कादंबरीवर बंदी घातली होती. महत्त्वाच्या कलाकृतींचं कसं वेगवेगळ्या माध्यमांतून पुनर्वाचन होत असतं याची ही उदाहरणे आहेत.
कोणतीही गुंतागुंत नसलेलं साधं सरळ कथानक, त्याला मानवी नात्याची जोड, भावनांचं विणकाम, न अडखळता एखाद्या निर्झराप्रमाणे वाहणारा कथानकाचा प्रवाह आणि काठोकाठ भरलेलं कारुण्य अशी शरदचंद्र यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. ‘देवदास’प्रमाणेच एक अनोखी प्रेमकथा म्हणजे ‘परिणीता’. या कादंबरीत प्रेमाचा लोभस असा आविष्कार पाहायला मिळतो. ललिता एक निरागस युवती आणि शेखर हा एक स्वाभिमानी मुलगा. या दोघांमध्ये असलेली मैत्री आणि या मैत्रीला प्रेमाचा स्पर्श. समाजातल्या रुढी, परंपरांचा वरवंटा कधी कधी असा फिरतो की कोमल अशा भावनांच्या चिंधड्या होतात. ललिता आणि शेखर यांची प्रेमकथा अधुरी राहते. या व्याकूळ कथेचा परिणाम वाचकांवर होतो… वाट्याला आलेलं आडवं, तिडवं आयुष्य हेच जणू या लेखकाच्या लेखनाची भूमी म्हणून पाहता येईल.
शरदचंद्र यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण देवानंदपूर या गावात. पुढचं शिक्षण भागलपूर इथं आजोळी झालं. केवळ परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून त्यांना शिक्षणावर पाणी सोडावं लागलं. त्यानंतर हाताशी नोकरी आली, त्यातही मन रमलं नाही म्हणून ती सोडून दिली. १८९६ ते १९०१ या काळात ते भटकत राहिले. त्याच काळात देवदासचं लेखन झालं. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर १९०३ या वर्षी ते म्यानमारला गेले. तिथं त्यांनी लग्न केलं. एक अपत्यही झालं. प्लेगची साथ आल्यानंतर त्यातच पत्नी आणि मूल दोघेही दगावले. त्यानंतर हिरणमयी देवी यांच्याशी त्यांनी विवाह केला.१९०७ मध्ये विविध मासिकांमधून त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचं लेखन प्रसिद्ध करायला सुरुवात केली. हे लेखन वाचकांमध्ये कमालीचं लोकप्रिय ठरलं. १९१६ यावर्षी शरदचंद्र भारतात आले. पूर्ण वेळ लेखन करत राहिले. परिणीता, श्रीकांत, चरित्रहीन, गृहदाह, देना पावना, शेष प्रश्न अशा प्रमुख साहित्यकृतींच्या माध्यमातून त्यांच्या भाषेच्या सीमा ओलांडून ते देशभरातल्या वाचकांपर्यंत सर्वदूर पोहोचले. भारतीय भाषांमध्ये एवढे लोकप्रिय असलेले ते अपवादात्मक लेखक मानले जावेत. केवळ वाचकांवरच नव्हे तर देशातल्या अनेक लेखकांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे.
असंख्य व्यक्तिरेखा समाजमनावर कोरणाऱ्या या लेखकाचा सर्जनप्रवास होता तरी कसा याबाबतचे कुतूहल अनेकांना होते. त्यातूनच हा लेखक समजून घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. विष्णू प्रभाकर यांचे ‘आवारा मसीहा’ हे पुस्तक या शोधाचाच एक भाग आहे. हे पुस्तक लिहायला विष्णू प्रभाकर यांना १४ वर्षे लागली. शरदचंद्र यांच्या चित्रणाचा प्रदेश त्यासाठी त्यांनी पालथा घातला, तेथील असंख्य माणसांशी संवाद साधला. केवळ एका लेखकाचा हा शोध नव्हता तर शरदचंद्र या नावाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या निमित्ताने अभ्यासले गेले. त्यांच्यातल्या माणसाचाही घेतलेला हा वेध आहे. गरिबी, भूक, एकटेपणा अशा असंख्य गोष्टींशी संघर्ष करत एका लेखकाचा अथक असा प्रवास कसा अविरतपणे सुरू होता याचा शोध विष्णू प्रभाकर यांनी घेतला. मराठीत चारुता सागर यांनी मोजकी परंतु सकस अशी कथा लिहिली. शरदचंद्रांच्या कथासृष्टीने चारुता सागर यांनाही झपाटून टाकलं होतं. त्यांच्या लेखणीचं जे गारूड मनावर झालं त्यामुळे चारुता सागर यांनीही बंगाल पायाखाली घातला होता. एखाद्या लेखकाचा शोध पुन:पुन्हा घ्यावासा वाटणं यातच त्या लेखकाचं सामर्थ्य दडलेलं असतं. शरदचंद्र यांनी रेखाटलेल्या सर्व व्यक्तिरेखा ही सामान्य माणसं होती. जगाच्या दृष्टीने बेदखल असणाऱ्या या माणसांच्या कथा त्यांनी अजरामर करून टाकल्या. त्यांच्या कथेतील पात्रं भारतभरातल्या वाचकांना आपल्या जवळची, नात्यातली, कुटुंबातली वाटली.
भारतीय भाषांमध्ये बंगाली कादंबरी प्रगल्भ आहे. कादंबरीसाठी हिंदी आणि बांगला या दोन्ही भाषेत ‘उपन्यास’ हा शब्द वापरला जातो. पण हिंदीनेसुद्धा हा शब्द बंगालीतूनच घेतला आहे. असं विधान प्रख्यात समीक्षक नामवर सिंह यांनी एका लेखात केलेलं आहे.
१८६२ साली भूदेव मुखोपाध्याय यांनी ‘ऐतिहासिक उपन्यास’ या नावाचा एक लेख लिहिला होता. त्यात ‘उपन्यास’ या शब्दाचा पहिल्यांदा उपयोग करण्यात आला. असा दाखला त्यांनी दिला आहे.(अर्थात ही बाब अनेकांना रुचणार नाही, पण हिंदी अंध राष्ट्रवाद एवढा प्रबळ होऊ लागला आहे की आपली अस्मिता परजण्याच्या नादात भारतीय भाषांमध्ये जी आदानप्रदान होते तिच्यावरच पाणी टाकण्याचा हा प्रयत्न आहे. अशी पुष्टीही नामवर सिंहांनी त्याच लेखात जोडली आहे…) खरं तर भारतीय कादंबरीत बंगाली कादंबरीकारांचं मोठं योगदान आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय हे त्यातलं एक ठळक नाव मानता येईल.
प्रचंड अशा लेखनाच्या माध्यमातून त्यांनी मानवी स्वभावाच्या मर्यादा उघड केल्या, मानवी मनाचा शोध घेतला, समाजातल्या तथाकथित, जीर्ण रूढी-परंपरा, त्यातून सबंध मानवी जीवनाला पडलेला विळखा याचा शोध शरदचंद्र यांनी त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमधून घेतला. अमानुष प्रथांच्या माध्यमातून दडपल्या जाणाऱ्या माणसाच्या आकांक्षांना त्यांनी शब्द दिला. जात, धर्म, वंश, लिंग अशा भेदांच्या आधारे माणसाला छळणाऱ्या वैगुण्यांवर त्यांनी एका अर्थाने प्रहारच केला. विशेषत: रूढींचे काच सोसणाऱ्या स्त्रिया, त्यांचं विदीर्ण झालेलं अंत:करण शरदचंद्रांच्या कथा-कादंबऱ्यांमधून उघड झालं. अर्थात कारुण्य हा जरी त्यांच्या साहित्याचा विशेष असला तरीही स्त्रीमनाच्या विविध कंगोऱ्यांना त्यांनी प्रकाशमान केलं. प्रत्येक वेळी त्यांच्या कथेतील स्त्री करुणच असते असं नाही, ती कधी जिद्दी असते तर कधी स्वाभिमानी, कधी निरागस तर कधी करारी. प्रेमाला केवळ शारीर दृश्यबिंदूतून न पाहता त्याची अथांग अशी खोली निरखण्याची दृष्टी शरदचंद्रांकडे होती. त्यामुळेच त्यांच्या प्रेमकथांनाही वेगळी उंची लाभल्याचं पाहायला मिळतं.