नेमस्तपणे बालपण जगलेल्या स्लोअर शहाणेच्या आयुष्यात कविता तशी उशिराच आली. अगदी कॉलेजच्या वयात. ते नाही का, कविता सुचविणाऱ्या एका मित्राने त्याला ट्रिपच्या वेळी कविता करण्याची पैज लावली वगैरे. साधारण त्या सुमारास. शालेय अभ्यासक्रमात कविता शिकण्याचा तर स्लोअरने अगदी धसकाच घेतला होता. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कवितेचे रसग्रहण करा किंवा कवितेच्या एखाद्या ओळीवरून संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा, असे प्रश्न त्याला घाबरवून सोडायचे. कवितेला नाद असतो, गेयता असते वगैरे त्याला पुढे कधी तरी कॉलेजात गाणी ऐकून त्यातले पद्या शोधताना जराजरा कळू लागले. त्याआधी कविता हा विषय त्याच्या आयुष्यात अत्यंत गद्या होता.

त्याच्या शाळेत कविता शिकविण्याची पद्धतही कदाचित याला कारणीभूत असावी. वर्गात कविता मोठ्याने वाचून दाखविणे, त्यातील शब्दार्थ सांगणे, कवीची ओळख वगैरे सोपस्कार पार पाडणे आणि थेट प्रश्नांना हात घालून उत्तरे लिहून देणे अशा प्रकारे कविता ‘शिकवली’ गेल्याने स्लोअर शहाणेला कविता हा प्रकार मराठी विषयातील ‘गुण’ कमी करणारा प्रकार वाटे. कवितेचा अर्थ वगैरे तर त्याच्या डोक्यावरूनच जाई. कवितेचाही संस्कार घडावा लागतो, तो काही त्याच्यावर घडला नाही. तसेही एकूणच ऐंशीच्या त्या सपक दशकात शाळेत जाणाऱ्यांना मार्क सोडून बाकी काही शाळेत मिळतही नव्हते. पाठ्यक्रमेतर आयुष्यातही, उभारी घेऊ पाहणाऱ्या दूरदर्शनवर आणि रेडिओवर, मनोरंजनात्मक बरेचसे भरणपोषण ‘तिसऱ्या’च भाषेतून होत होते.

अशा काळात नववीत का कधी तरी एकदा एक चांगले मराठीचे शिक्षक काही काळ स्लोअरच्या वर्गावर आले. तेव्हा, त्यांनी पुस्तकातील कविता शिकविण्यापूर्वी वर्गात एक संवादसत्र घेतले. कविता म्हणजे काय, असा प्रश्न त्यांनी वर्गापुढे उपस्थित केला आणि कुणीच हात वर करून उत्तर देत नाही म्हटल्यावर एकेका विद्यार्थ्याला उभे करून त्यांनी त्या त्या विद्यार्थ्याकडून या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक विद्यार्थी म्हणाला, ‘कविता म्हणजे कवीचा यमके जुळविण्याचा छंद!’ दुसरा एक म्हणाला, ‘कविता म्हणजे मर्यादित जागेत, मर्यादित ओळींत संपविण्याची गोष्ट!’ आणखी एक विद्यार्थी तर म्हणाला, ‘जो धडा नाही, ती कविता!’ उत्तरे ऐकून हताश झालेल्या शिक्षकांनी स्लोअर शहाणेला उत्तर सांगण्यासाठी उभे केले, तेव्हा एकदम जबाबदारीचे दडपण येऊन स्लोअरने चक्क मीटरमध्ये उत्तर दिले…

कविता म्हणजे ओळीपुढे ओळ

पण, प्रत्येक शब्दाला अर्थ खोल

प्रयत्ने आकळू पाहता एकेक बोल

परीक्षा समयीचा शून्य दिसू लागे गोल

आधीची उत्तरे आणि नंतर स्लोअरचे हे मीटरमधले बोलणे ऐकल्यानंतर शिक्षकांनी अन्य कुणालाच हा प्रश्न न विचारता, आजचा तास संपला असे जाहीर केले आणि ते शिक्षक कधीही परत स्लोअरच्या वर्गावर कविता शिकवायला आले नाहीत. स्लोअरच्या शालेय वयात त्यामुळे कविता हा विषय मराठी विषयात गुण मिळवून न देणारा भाग म्हणूनच ठाण मांडून बसला.

कॉलेजात कधी तरी कवितेप्रति अचानक एक जिव्हाळ जाणीव स्लोअरच्या मनात निर्माण झाली, जेव्हा एका कार्यक्रमाचे शीर्षक त्याच्यातील गद्या व्यक्तीला थोडे ओलावून गेले. शीर्षक होते, ‘गुलज़ार बोलतो, त्याची कविता होते’. कुणी तरी नुसते काही तरी म्हणते, बोलते आणि त्याची कविता होते? असे होते? खरेच? हे तीन प्रश्न अशाच क्रमाने सलगपणे स्लोअरच्या मनात उमटले. हा नेमका काय प्रकार आहे, तो पाहायला-ऐकायला हवा म्हणून त्याने या कार्यक्रमाला जायचे ठरवले. गुलजारांची चित्रपटगीते, कविता आणि त्यांना जोडणारी गुलजारांचीच गोष्ट, असे कार्यक्रमाचे स्वरूप. हे निवेदन इतके ओघवते आणि सहज, की पूर्ण कार्यक्रमाची कविता झाली! स्लोअर तो कार्यक्रम ऐकून थक्क झाला. त्याने त्यातील गाणी पूर्वी रेडिओवर ऐकलेली होतीच, पण त्या गाण्यांतील कविता आपल्याला नव्याने भेटते आहे, असे काही तरी त्याला कार्यक्रम ऐकताना जाणवून गेले.

भारावून गेल्याच्या अवस्थेत त्याने त्या रात्री त्याच्या रोजदिनीत लिहिले, ‘काळाच्या साकळलेल्या तुकड्यातून गळणारे क्षण ज्याला ओघळणारे थेंब म्हणून टिपता येतात, त्याला कविता करता येते, असे समजावे. असे थेंब अथांग समुद्रात दडलेल्या शिंपल्याला शोधून त्यात लपतात आणि त्या थेंबांचे मोती होतात. असा एखादा शिंपला आपल्याला मिळाला, की तो कानाला लावून बघावा. त्यातून ऐकू आला आवाज, ‘गुलज़ार’ असा, तर समजावे कवितेच्या घराच्या उंबरठ्यावर रेंगाळायला आता जमू शकेल…’

स्लोअरचे कवितेच्या प्रदेशात शिरणे हे असे होते, गाण्याकडून कवितेकडे जाणारे. तो या कार्यक्रमानंतर प्रत्येक गाणे चालीसाठी नाही, तर अर्थासाठी ऐकू लागला. साहिरचे टोकदार शब्द, शैलेंद्रचे विधान, मजरूह यांची कालसुसंगतता असे कंगोरे त्याला गाणी ऐकताना हळूहळू लक्षात येऊ लागले. जोडीला मार्क्स शिकत असल्याने त्यातली सामाजिकताही त्याच्या काळजाला भेदून जाई. रात्री झोपेतून अचानक उठून स्लोअर ‘जला दो ये दुनिया’ वगैरे गायला लागायचा किंवा मग रस्त्यातून चालता चालता ‘माना अपनी जेब से फकीर है…’ असे कुणाला तरी समजवायचा. मराठी कविताही त्याला अशीच आधी गाण्यांतून भेटली. संजीवनी मराठे, भा. रा. तांबे, मर्ढेकर, आरती प्रभू, कुसुमाग्रज, बोरकर, ना. घ. देशपांडे, गदिमा सगळ्यांची कविता चालीत म्हटल्यावर समजू लागली. ‘ती येते आणिक जाते’ हे प्रेयसीबद्दलचे गाणे नाहीच, ते सर्जनाच्या उत्कट बिंदूचे वर्णन आहे आणि ‘जाताना फुले मागते’ म्हटल्यावर न उमटणाऱ्या कवितेने घायाळ झालेल्या मनाची आर्तता, असेही तो कॉलेजच्या वाङ्मय मंडळात सांगायला लागला. स्लोअर त्या कॉलेजवयात नकळत अक्षरांच्या एका मुसळधार गुहेत शिरला आणि त्याला कविता गुणगुणता येऊ लागली. जशी ती गुणगुणता येऊ लागली, तसे त्याला कळले, की या गुणगुणीतून शब्दांचे अर्थ आत झिरपणे आणि त्याने तृप्त होणे, याला रसग्रहण म्हणतात. अर्थात, तोवर कवितेचे रसग्रहण करा, या प्रश्नापासून तो दूर आला होता…

या सगळ्यांच्या गीतांत प्रेम, विरह, वेदना आहेच, पण त्यापलीकडे जाऊन काही सांगणे आहे, असे स्लोअरला वाटे. थेट तत्त्वज्ञान नसेल, पण जीवनाचे सत्त्व आहे, इतके स्लोअरला आकळू लागले. गाणे फक्त चालीत बुडून नाही, तर शब्दांत गुंतूनही ऐकायचे असते, ही जाणीव तेव्हापासून स्लोअरच्या मनभर पसरली. अशात त्याने गुलज़ार नीट ऐकायला सुरुवात केली. म्हणजे अगदी शब्दाशब्दाचा अर्थ शोधत गाण्याची चिरफाड करायची असे नाही, तर ऐकता ऐकता ओळ अनुभवत तीच रात्री पांघरून निजायचे, अशी. हळूहळू स्लोअरला असे करताना गंमत येऊ लागली. आसमाँ, तिनका, आशियाना, जमीं, घरोंदा, चाँद, कतरा, ख्वाब, रात आदींसह सपनासारखे सर्व स्वप्निल शब्द त्याच्या मन:पटलावर ‘घर’ करून राहिले. स्लोअरला या घरात राहणे आवडू लागले तसे त्याने त्याचे या घरातील एक विश्व, एक जगणे कल्पून तसे जगायलाही सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या थोड्या थोड्या तुकड्यांवर चित्रकारी करत त्याने कल्पनांचे बरेच कॅनव्हास रंगीत केले. या गीतांत, कवितांत दर्द नाही असे नाही, पण सु़कून जास्त आहे, असे त्याला वाटू लागले. जगताना दिलासा लागतो, तो ही गाणी देतायत, असे म्हणून त्याने हा ऐकण्याचा ध्यास चालू ठेवला. कॉलेजवयाच्या याच अनघड सुमारास कधी तरी ऑप्शनल इंग्लिशच्या तासाला त्याने वर्ड्सवर्थची ‘डॅफोडिल्स’ ऐकली. दोन प्रतिमा त्याच्या लख्ख लक्षात राहिल्या, नव्हे त्याने त्या मन:चक्षूसमोर पाहिल्याही. ‘टेन थाउजंड सॉ आय अॅट अ ग्लान्स…’ आणि ‘दे फ्लॅश अपॉन दॅट इनवर्ड आय…’. मग स्लोअरने विचार केला, वर्ड्सवर्थने दहा हजार डॅफोडिल्स पाहिल्याचा प्रचंड मोठा अनुभव एका ओळीत दिला आणि गुलज़ारांच्या ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता…’ या एका ओळीने दहा हजार अनुभव जिवंत केले! आपल्याला खरेच कविता कळायला लागली? स्लोअरने त्या रात्री रोजदिनीत लिहिले, ‘कविमनाचे असावे, पण आतून कविताच येऊ नये, याची कळ सोसणाऱ्याचे भोग कल्पनासिद्ध कसे होतात? कारण, ते अनुभवसिद्ध झाले, तर ते गद्या होतात आणि कविता हा तर पद्या अनुभव असतो…’ रोजदिनीत यापुढे नोंद झाली नाही. स्लोअर शहाणेही त्या रात्री ‘फ्लॅश अपॉन दॅट इनवर्ड आय’ची तुलना ‘रोज रोज आँखों तले, जब कोई सपना चले’शी करता करता झोपून गेला.