एखादा निर्हेतुक चालण्यासाठी निघालो आहे, असं म्हणतानादेखील अॅप लावून किती पावलं झाली, हे मोजतोच. चाल स्वरांची मर्यादा सोडत नाही, हे माहीत असूनही एखादा विसंवादी सूर लावावासा वाटत राहण्याने आयुष्य बेसूर भासू लागतं. पण, अशा विसंवादी सुरातही नवनिर्मितीची प्रचंड ताकद असते. आपल्याला त्याला ‘चाल’ लावता यायला हवी…
एका अंधाऱ्या रात्री निरभ्र आकाशाच्या अथांग सावलीच्या पश्चिम कोपऱ्याला प्रकाशित करणाऱ्या एका उजळ पुंजक्याकडे पाहत स्लोअर शहाणे रस्त्याने एकटाच चालला होता. जमिनीकडे पाहत चालणारे वास्तवाशी अधिक जुळवून घेणारे असतात, आकाशाकडे पाहत चालणारे वास्तवाशी फारकत घेणारे, असा ढोबळ फरक जाणून असूनही स्लोअर शहाणे त्या रात्री तसाच चालत राहिला. असे करून तो प्रत्येक चालण्याला काही हेतू असतो किंवा पोहोचण्याचे ठिकाण असते, या रूढ समजुतीला बेदखल करत होता, असे त्याला वाटत होते. वास्तविक त्याच्या नेणिवेत चालणेच काय, कोणत्याही कृतीचे काही हेतू असायलाच हवेत का, असा प्रश्न टोक केलेल्या पेन्सिलीप्रमाणे उभा राही, त्याचीच ही जागृत जाणीव त्याला या वेळी झाली होती इतकेच. फरक इतकाच, की एरवी चालत चालत अनावधानाने का होईना, कुठल्या तरी मुक्कामी पोहोचल्याने त्या पेन्सिलीचे टोक मोडे, आज तसे होताना दिसत नव्हते, म्हणून स्लोअरला वाटले, की आपण त्या रूढ समजुतीला जणू बेदखल करतो आहोत…
असे चालणे कुणाला दिशाहीन वाटू शकत असले, तरी ते तसे नसून केवळ निर्हेतुक आहे, ही समजूत या वेळी त्याच्या मनाच्या तळाशी पक्की होती. आपले हे मार्गक्रमण म्हणजे प्रत्येक पावलागणिक उमटणारे प्रांजळाचे ठसे आहेत, अशी त्याची समजूत एक हजार पावले चालल्यावर दृढ झाली. हे ठसे पाहायची अनावर ओढ मनात दाटून येऊनही त्याने तसे केले नाही. ‘फार फार वर्षांपूर्वी…’ अशी सुरुवात होणाऱ्या गोष्टींमध्ये ‘मागे वळून पाहिलेस, तर…’ असे इशारे असायचे आणि नेमका तेथेच घात व्हायचा, हे ठाऊक असल्याने स्लोअरने मागे वळून पाहिले नाही. शिवाय, मागे वळून पाहणे यामध्ये त्याला ‘सरलेल्या आयुष्याचा लेखाजोखा’ किंवा ‘भूतकाळाचा वर्तमान संबंध’ वगैरे काही तत्त्वज्ञानही अपेक्षित नव्हते. सरळ चालताना मागे जायचे नाही आणि वळायचेही नाही, म्हणून मागे वळून पाहायचे नाही, इतकाच स्लोअर शहाणेचा तर्क होता… माझाच काय, कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाचा प्रवास असाच एकरेषीय असतो, असा विचार चमकून जाण्याचा नेमका हाच क्षण त्याचे मन उजळून गेला.
जसा हा क्षण उजळला, तसे त्याला लक्षात आले, की आपण हजार पावले चाललो हे आपण पहिले पाऊल टाकण्यापूर्वी, चाललेली पावले मोजण्यासाठी लावलेल्या अॅपमुळे आपल्याला कळले आहे. त्यामुळे हे चालणे अगदीच निर्हेतुक नाही, तर पावलांचा हिशेब ठेवण्याएवढे तरी नक्कीच सहेतुक झाले आहे. पण, ‘मी आज हजार पावले निर्हेतुक चाललो,’ अशी खास मध्यमवर्गीय नोंद ठेवण्यासाठी हे आवश्यकच होते, अशी स्वत:ची समजूत घालून स्लोअर शहाणेने आपल्या चालण्याला अर्थ देण्याचा प्रयत्न केला. अर्थात, असे केल्यावरही त्याला मन उजळलेल्या क्षणाचा पुढचा क्षण अस्वस्थ वाटण्याचा गेलाच. असे काही झाले, की त्याला सोलीलुक्वीची (soliloquy) झडझडून आठवण येई! आठवण काढली, की मनात प्रकट होणारे हे पात्र अशा वेळी गोंधळ दूर करण्यासाठी त्याला आवश्यक वाटे. स्लोअरने सोलीलुक्वीचा धावा केला आणि तो लगेच हजर झाला. तसा तो स्लोअरच्या नेणिवेतील एका कोपऱ्यातील कप्प्यात कायमचा मुक्कामाला होताच. फक्त ‘बोलावणे आल्याशिवाय नाही,’ अशा बाण्याचा असल्याने तो आपण होऊन येत नसे. चालत चालत चाललेल्या स्लोअरचं मग नेहमी व्हायचं तसं त्याच्याशी संभाषण सुरू झालं… एकट्याचं एकट्यासाठीचं एकट्यानंचं एकलगत!
स्लोअर : चालत चालत कुठेही पोचायचं नसतं, अशा वेळी किती चालावं?
सोलोलुक्वी : तुला ‘चालणारं’ उत्तर हवंय, की ‘न चालणारं’?
स्लोअर : उगाच कोट्या करू नकोस, सरळ उत्तर दे. तसं केलंस, तर जे उत्तर देशील ते ‘चालवून’ घेईन.
सोलोलुक्वी : चालेल! पण, तुझ्याबरोबर चालता चालता आधी तुझ्या डोक्याला थोडी चालना देतो…
स्लोअर : चला, म्हणजे आजचं चाल-चलन तुझ्या चालीनं…
सोलोलुक्वी : तर ऐक. तुझ्यासारखा कोणताही मध्यमवर्गीय त्याच्या आयुष्यातील भल्या मोठ्या काळात कुठे ना कुठे तरी पोहोचायचं म्हणूनच चालतो.
स्लोअर : म्हणजे? जरा उलगडून सांग…
सोलोलुक्वी : म्हणजे अगदी सोपी उदाहरणं देतो… तू लहानपणी चालायला लागलास, तेव्हा पहिल्यांदा तुझं कौतुक झालं आणि नंतर तू चालायला लागला आहेस, हे जगाला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक नव्या पाहुण्यासमोर ‘ये, ये’ करत तुला आई, बाबा, आजी, आजोबा अशा कुणापर्यंत तरी पावलं टाकत चालवलं गेलं. तू ‘चाल’ असं सांगणाऱ्या निरोप्यापर्यंत पोहोचत गेलास, सहेतुक. मोठा होत गेल्यावर पालक, शाळा, शिकवणी वर्ग सांगेल, तसं चालणं, कॉलेजात गेल्यावर पदवीपर्यंत पोहोचण्यासाठी चालणं, पदवी मिळाल्यावर नोकरीपर्यंत पोहोचण्यासाठी चालणं, नोकरी मिळाल्यावर ती टिकवण्यासाठी चालणं, ती झाल्यावर उरलेलं जगणं जगविण्यासाठी चालणं, असा तू चालूच आहेस, चालू राहणार आहेस…
स्लोअर : पण, हे तर मला माहित्येय…
सोलोलुक्वी : आणि तरी तुला निर्हेतुक चालायचंय…
स्लोअर : म्हणजे, मी तसा विचार करतो आहे.
सोलोलुक्वी : निर्हेतुक चालायचंय असा हेतू ठेवून?
स्लोअर : हे मला कसं लक्षात आलं नाही?
सोलोलुक्वी : कारण, तू फक्त निर्हेतुक चालायचं आहे असा हेतू ठेवलास. त्याऐवजी तुला कुठेही न पोचण्यासाठी चालता येतं का, असा प्रश्न पडायला हवा होता.
स्लोअर : पण, समज तो आता पडलाय आणि त्याचं उत्तर मी शोधतो आहे, म्हणजे मी इतरांपेक्षा काही तरी वेगळं करतोय ना?
सोलोलुक्वी : अजिबात नाही. हेही तुझ्यासारख्या मध्यमवर्गीयाचं व्यवच्छेदक लक्षण. ‘मी काही तरी वेगळा विचार करतोय,’ असं स्वत:चं समाधान करून घेण्यासाठी किंवा तसं इतरांना दाखविण्यासाठी या विधानापर्यंत चालणं इतकंच आहे ते.
स्लोअर : सगळीच उत्तरं तू मला ‘न चालणारी’ देतोयेस.
सोलोलुक्वी : त्याचं सूचन मी आधीच केलं होतं. तूच म्हटलास मी ‘चालवून’ घेईन.
स्लोअर : मला माझ्याच शब्दांत अडकवणारी तुझी ही ‘चाल’ आधीच लक्षात यायला हवी होती. पण, तू पडलास माझा कॉन्शन्स, तुला ‘चालवून’ घ्यायलाच हवं. मला सांग, मध्यमवर्गीय आयुष्यातलं जवळपास सर्वच चालणं जर इतकं सहेतुक आहे, तरी आयुष्य चालीत नाही, बेसूर आहे असं का वाटत राहतं?
सोलोलुक्वी : कारण चालीलाही आपण बांधणे या क्रियापदात जखडलंय. चाल सोडणे याला बेसूर, बेताल ठरवलेलं असल्यानं ती सोडणारा बेदखल होतो आणि म्हणून तुझ्यासारखा एखादा निर्हेतुक चालण्यासाठी निघालो आहे, असं म्हणतानादेखील अॅप लावून किती पावलं झाली, हे मोजतोच. बांधलेली चाल स्वरांची मर्यादा सोडत नाही, हे माहीत असूनही त्यात एखादा विसंवादी सूर लावावासा वाटत राहणं यामुळे आयुष्य चालीत नाही, बेसूर आहे असं वाटतं. पण, लक्षात घे अशा एखाद्या विसंवादी सुरातही नवनिर्मितीची प्रचंड ताकद असते. आपल्याला त्याला ‘चाल’ लावता यायला हवी…
इतके बोलून सोलोलुक्वी अचानक अंतर्धान पावला. त्याचे हे नेहमीचेच. पण, या वेळी स्लोअरला त्यात काही तरी वेगळे जाणवले आणि त्याने चालता चालता रस्त्यावर मध्येच बसकण मारली. पिशवीतून ‘रोजदिनी’ बाहेर निघाली आणि त्यातल्या एका कागदावरच्या दोन आडव्या रेघांची मर्यादा सोडून त्याने लेखणी ‘चालवली’ आणि लिहिले, ‘चालले आहे, ते चालवून घेऊन चालू ठेवणे, या चालीवर आपले आयुष्य चालले आहे.’
ता.क. : खूपच रात्र झाल्याचे लक्षात आल्याने आणि इतक्या रात्री बाहेर राहणे ‘चाली’-रीतीला धरून नसल्याने स्लोअर हे लिहून उठला, त्याने पावले मोजण्याचे अॅप बंद केले आणि तो परतीच्या वाटेवर पश्चिमेचा तेजाळ पुंजक्याला पाठमोरा खाली पावलांकडे बघत सहेतुक चालू लागला!