भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९६४ मध्ये फूट पडली आणि ई.एम. एस. नंबुद्रीपाद, ज्योती बसू, हरकिशनसिंग सुरजित, बी. टी. रणदिवे, ए. के. गोपालन, प्रमोद दासगुप्ता आदी ३२ प्रमुख नेत्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. माकपच्या संस्थापकांपैकी केरळचे माजी मुख्यमंत्री वेल्लीकठू शंकरन अच्युतानंदन किंवा व्ही.एस. वयाच्या १०१व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी एकत्रित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षकार्य सुरू केले होते.
अच्युतानंदन यांनी २००६ ते २०११ या काळात केरळचे मुख्यमंत्रीपद तर तीन वेळा विरोधी पक्षनेतेपद भूषविले होते. पक्षांतर्गत अनेक अडथळे त्यांना आले. वयाची ८० वर्षे पार केल्यावर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. डाव्यांच्या पोलादी चौकटीत बंडखोर आणि प्रवाहाच्या विरोधात पोहणारे नेते म्हणून अच्युतानंदन यांची ओळख होती. आठ दशकांच्या राजकीय चळवळीत सत्तेत असो वा सत्तेबाहेर, लढवय्या ही त्यांची प्रतिमा कायम बघायला मिळाली.
संघर्ष आणि आंदोलने हा त्यांच्या राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग होता. भूमिगत क्रांतिकारक, कार्यकर्त्यांचा आधारवड, निवडणूक व्यवस्थापन तज्ज्ञ, गर्दी खेचणारा नेता, सार्वजनिक हितासाठी लढा देणारा नेता, पक्ष नेतृत्वाची नाराजी असतानाही प्रसंगी भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर भूमिका घेणारा आणि हरित चळवळीतील सहभागी अशा विविध भूमिकेत अच्युतानंदन वावरले. १९८० ते १९९२ अशी १२ वर्षे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव असतानाच डाव्या पक्षांचा आघाडीच्या राजकारणावर भर होता.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत कारभारात कायमच एक विशेष पोलादी चौकट असायची. तरीही प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे धाडस अच्युतानंदन यांनी केले होते. जे पटते त्याबद्दलची मते ठामपणे मांडायची, असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या या आक्रमकपणातूच त्यांचा वेळोवेळी पक्षाच्या कॉम्रेड्सबरोबर संघर्ष झाला. एम. व्ही. राघवन आणि गौरी अम्मा यांच्यासारख्या नेत्यांची पक्षातून अच्युतानंदन यांच्यामुळेच हकालपट्टी झाली होती.
डाव्या पक्षांच्या निर्णय प्रक्रियेत पॉलिट ब्युरोचे स्थान सर्वोच्च. बंडखोर स्वभावामुळेच अच्युतानंदन यांची दोनदा पॉलिट ब्युरोमधून हकालपट्टी झाली होती. यापैकी एकदा तर ते चक्क केरळचे मुख्यमंत्री होते ! मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात पक्षाच्या सर्वोच्च मंडळाने कारवाई करणे हे तर भारतीय राजकारणात तसेही दुर्मीळ. केरळात डाव्या आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री ई. के. नयनार यांनी अणूऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना तयार केली होती.
डाव्या पक्षाच्या विविध संघटनांनी या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवीत आंदोलन पुकारले असता राज्य सचिव या पक्षाच्या राज्यातील सर्वोच्चपदी असतानाही अच्युतानंदन यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवीत कारवाई ओढवून घेतली होती. पक्षांतर्गत विरोधकांची राज्य सचिव मंडळातून हकालपट्टी केल्याबद्दलही नेतृत्वाने त्यांना चाप लावला होता. केरळचे विद्यामान मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि अच्युतानंदन यांच्यात कायम वितुष्ट. २००९ मध्ये केरळमधील गाजलेल्या जलविद्याुत घोटाळ्यात विजयन यांचे नाव जोडले गेल्यावर पक्षाच्या भूमिकेविषयी अच्युतानंदन यांनी आक्षेप घेतला होता. त्यातून त्यांची पॉलिट ब्युरोमधून हकालपट्टी झाली होती.
वयाच्या नव्वदीनंतरही त्यांच्यातील बंडखोर स्वभाव कायम होता. प्रकृती साथ देत नसल्याने पाच वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणापासून ते दूर गेले होते. पण त्याआधीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल मापकने त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली होती. बंडखोरी ही त्यांच्या नसानसात भिनलेली होती. यामुळेच कसलीही भीडभाड न ठेवता ते आपली मते ठामपणे मांडत असत. विरोधी पक्षनेतेपदी असताना राज्यात कोणतेही आंदोलन, एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा कोणताही गंभीर प्रश्न उद्भवल्यास अच्युतानंदन तेथे लगेचच भेट देत असत. केरळमध्ये डाव्या पक्षांचे एकापेक्षा एक बडे नेते होऊन गेले. पण अच्युतानंदन यांच्याएवढी लोकप्रियता अन्य कोणत्या नेत्याला लाभली नाही.
डावे पक्ष आणि डावा विचार देशात हळूहळू लोप पावू लागला आहे. सध्या केरळ या एकाच राज्यात माकपची पाळेमुळे रुजलेली दिसतात. तीन दशके सत्ता भोगलेल्या पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीला तिथे भोपळाही फोडता आला नव्हता. साक्षरता आणि आरोग्य सेवांमध्ये देशात चांगली कामगिरी केलेल्या केरळने सामाजिक क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. देशात धर्माच्या राजकारणाला अधिष्ठान प्राप्त झाले असताना, डाव्या आघाडीमुळे केरळ याला अपवाद ठरला. अच्युतानंदन, नंबुद्रीपाद, नयनार यांच्यासारख्या नेत्यांनी डाव्या आघाडीला बळ दिले. यातूनच अजूनही केरळात माकप घट्ट पाय रोवून आहे. अच्युतानंदन यांना श्रद्धांजली.