एकच विचार भिन्न काळ आणि वास्तवाशी जोडत मांडण्याचे कौशल्य हे तर्कतीर्थांच्या वक्तृत्वाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य होते. २० मार्च, १९८२ रोजी पुण्यात झालेल्या ‘राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्षपद तर्कतीर्थांनी भूषविले होते. त्यंनी अध्यक्षपदावरून केलेले भाषण ‘नवभारत’ मासिकाच्या एप्रिल, १९८२ च्या अंकात प्रकाशित झाले होते.
त्यात तर्कतीर्थ वैश्विक परिपार्श्व विशद करत सांगतात की, ‘जगातील भिन्न राष्ट्रांमधील राष्ट्रीयत्व वा एकात्मता विचार व भारतातील या संदर्भातील वास्तव भिन्न आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, ही एकधर्मी व एकभाषिक राष्ट्रे होत. तिथे एकात्मता असणे स्वाभाविकच म्हणायला हवे; पण याच युरोपात कॅनडा, स्वित्झर्लंडसारखी बहुभाषिक राष्ट्रे आहेत. तिथे फुटीरपणा व धुसफुस दिसते. भारत बहुभाषिक, बहुधार्मिक राष्ट्र असून, इथे मात्र व्यापक राष्ट्रीयत्व दिसते. ते सर्व धर्म, भाषा, वंश यांना समाविष्ट करणारे आहे. इथले संविधान इहवादी आहे. या संविधानाने नागरिकांच्या भिन्न धर्मपरंपरांना बाजूला सारत मानव धर्माने जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. एका युरोपीय राष्ट्राइतकी इथे ख्रिाश्चन, मुस्लीम धर्मीय लोकसंख्या आहे. इथल्या भिन्न राज्यभाषा युरोपीय भाषांइतक्याच प्रगल्भ आहेत, परंतु इथे स्वभाषेपेक्षा राष्ट्राभिमानाला महत्त्व असल्याने राष्ट्रीय एकात्मता विचार सर्वोपरी मानला जातो. तीच गोष्ट इथल्या साहित्यातूनही प्रतिबिंबित होते.
भारतीय राष्ट्रीयता मात्र अंतिम मानवी मूल्यांवर आधारित असल्यामुळे आज जगाला आवश्यक असलेल्या सांस्कृतिक व राजकीय विश्वबंधुतेची उभारणी करत आहे. याचे ऐतिहासिक प्रत्यंतर म्हणजे गेल्या सुमारे दोनशे वर्षांच्या भारतीय धर्मसुधारणा व समाजसुधारणा यांचा इतिहास होय. या सामाजिक व धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक, विचारवंत नेते हे जरी बहुसंख्य हिंदू होते तरी ते विश्वबंधू होते. त्यात काही थोर मुस्लीम आणि ख्रिाचन हेसुद्धा दृष्टिआड करता येत नाहीत. विश्वबंधुत्वाचा संदेश त्यांना धर्मचिंतनातून मिळाला होता. पहिले विश्वबंधू समाजसुधारक व धर्मसुधारक राजा राममोहन रॉय होत. त्यांनी युनिव्हर्सल चर्च म्हणजे सर्व धर्मांचे व्यासपीठ स्थापन केले होते. दुसरे संत रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांचे सद्गुरू. त्यांनी आपल्या उपासनेच्या साधनेत इस्लाम, ख्रिास्ती इ. भिन्न भिन्न धर्मांच्या साधनेचा अंतर्भाव केला होता.
रवींद्रनाथ ठाकूर हे दिव्य मानवधर्माचे द्रष्टे कवी होते. लोकमान्य टिळक यांनी भगवद्गीतेतून आत्मौपम्य (समानता) दृष्टीचे मानवतावादी नीतिशास्त्र गीतारहस्यात प्रतिपादिले. योगी अरविंद यांनी सर्व मानवांच्या दिव्य जीवनाचे युग या पृथ्वीवर उदयास येणार आहे आणि मानवी इतिहासाची यात्रा त्या युगाकडे चालली आहे, असे द्रष्टेपणाने सांगितले. ही परंपरा महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. सुधारकांचे अग्रणी आगरकर हे इहवादी होते. या इहवादी भारतीयांची परंपरा पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंत येऊन भिडते. हे इहवादी विचारवंत धर्मग्रंथाचे मूल्य मान्य करतात, परंतु ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ या पद्धतीने धर्मग्रंथ हा देवाने दिला आहे, म्हणून पूर्ण प्रमाण म्हणून त्याला शरण जात नाहीत.
धर्मग्रंथाला प्रमाण न मानणारे असे अनेक विश्वबंधुत्ववादी हिंदू गेल्या दोनशे वर्षांच्या इतिहासात मार्गदर्शक म्हणून तळपले आहेत. त्यांतील महाराष्ट्रातील श्रेष्ठ धर्मसुधारक आणि समाजसुधारक म्हणजे जोतिराव फुले होत. सर्वच धर्मसंस्था आणि धर्मग्रंथ तपासून त्यांच्यातील कालबाधित काय आहे आणि भविष्यकाळाला अनुकूल कल्याणकारक असे काय आहे, याची समीक्षा या भारताच्या राष्ट्रीयत्वाचा पाया घालणाऱ्या नेत्यांनी केली आहे. याचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देता येते. हे उदाहरण या देशातील हिंदू, मुस्लीम, ख्रिाश्चन, शीख इत्यादिकांनी आदर्श म्हणून स्वीकारले पाहिजे आणि आपापला धर्म किंवा धर्मपरंपरा आंबेडकरमार्गानेच संस्कारिली व परिष्कारिली पाहिजे.
आज भारतीय एकात्मतेला फार मोठे धोके उत्पन्न होत आहेत. ते टाळण्यासाठी सर्वधर्मीयांनी मूलभूत मानवीय मूल्य स्वीकारले पाहिजे. ईशान्येकडील राज्ये, हिमालयातील समाजगट अजून राष्ट्रीय एकात्मतेपासून दूर आहेत. त्यांना विवेकवादाच्या आधारावर आधुनिक संस्कृतीच्या परिवारात आणून आधुनिक शिक्षण व्यवस्था व नवी अर्थरचना करायला हवी.’
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com