१ ऑगस्ट, १९५६ या दिवशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त झालेल्या भाषणाचा नि त्याअनुषंगाने घडलेल्या घटनांचा वृत्तांत दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे २ ऑगस्ट, १९५६ च्या दैनिक ‘पुढारी’च्या अंकात प्रसिद्ध झालेला होता. त्यानुसार हे वर्ष (१९५६) लोकमान्य टिळक जन्मशताब्दीचे होते, म्हणून कोल्हापूर काँग्रेस कमिटीने हे विशेष व्याख्यान योजले होते. हा या शताब्दी वर्षाचा समारोप समारंभ होता. सभेत घडलेल्या अनुचित व अप्रिय घटनेनंतर पोलिसांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला होता. पोलिसांनी घोषणा देणाऱ्या १७ तरुणांना अटक केली व नंतर त्यांना जातमुचलका घेऊन सोडून देण्यात आले होते. काँग्रेस कमिटी कार्यवाह अॅड. बी. एस. पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर तर्कतीर्थांचे मुख्य भाषण झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार होते.

तर्कतीर्थ आपल्या भाषणात म्हणाले की, ‘‘लोकमान्यांनी राष्ट्रीयत्वाची कल्पना भारतीय जनतेच्या मनात प्रथम रुजविली. लोकमान्य निधर्मी राज्याचे द्रष्टे व भारतीय क्रांतीचे प्रवर्तक होते.’’

संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल बोलण्यासाठी समिती कार्यकर्त्यांच्या आग्रहास अनुलक्षून ते म्हणाले की, ‘‘मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे आणि तो होणार, असे माझेही मत आहे. परंतु, माझा मार्ग शांतीचा आहे आणि आपला चळवळीचा आहे.’’

लोकमान्य टिळक जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तर्कतीर्थांच्या हस्ते संपन्न झाला.

सभा संपल्यानंतरही सभागृहाबाहेर संयुक्त महाराष्ट्र समितीचे शेकडो कार्यकर्ते घोषणा देत उभे होते. नंतर तर्कतीर्थांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. तिचे दहन रविवार गेट पोलीस चौकीसमोर (आझाद चौक) करण्यात आले. गांधी टोप्यांचीही प्रतीकात्मक होळी करण्यात आली. उपस्थितांचा रोष व रोख काँग्रेस व त्यांच्या कार्यकर्त्यांवर होता.

झाल्याप्रकरणी ज्या १७ समिती कार्यकर्त्यांना अटक झाली, त्यांपैकी एक कॉम्रेड गोविंद पानसरे होते. काही वर्षांनंतर हा खटला चालला. आरोपींना शिक्षा व्हावी असे सरकारला (काँग्रेस पक्षास) वाटत होते. तशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. प्रस्तुत खटल्यात साक्ष देण्यासाठी म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी काही वर्षांनी कोल्हापुरात आले होते. काँग्रेस कार्यकर्ते पुंडलिकजी कातगडे हे काँग्रेस कार्यकर्ते. ते वाईच्या प्राज्ञपाठशाळेतील तर्कतीर्थांचे सहाध्यायी. तर्कतीर्थ शासकीय विश्रामगृह येथे उतरलेले होते. कातगडेजींनी तिथे जाऊन तर्कतीर्थांची भेट घेतली आणि विनंती केली की, ‘समितीच्या कार्यकर्त्यांना शिक्षा होऊ नये असे पाहा.’ तर्कतीर्थांनी त्यांना आश्वासन दिले की, ‘तुम्ही काळजी करू नका. त्यांना शिक्षा होणार नाही, याची उत्तम तऱ्हेने मी काळजी घेईन.’ तर्कतीर्थांनी आपल्या साक्षीत कोणासही ओळखले नाही. ते म्हणाले, ‘चेहरे माझ्या लक्षात नाहीत.’ आणि त्या १७ जणांची निर्दोष मुक्तता झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्यांचे सारे आयुष्य वेगवेगळ्या चळवळी करण्यात गेले, त्यांच्यामुळे शिक्षा होणे शक्य नव्हते. तर्कतीर्थांच्या दृढ मनोवृत्तीची ज्यांना कल्पना आहे, त्यांना ते कोणत्या विषयात कोणती भूमिका घेतील, हे समजणे सहज शक्य आहे.

लोकमान्य टिळक जन्मशताब्दी वर्षात घडलेल्या या प्रसंगाच्या अनुरोधाने आपण पाहू लागतो, तेव्हा लक्षात येते की निषेध, बहिष्कार, प्रतीकात्मक प्रेतयात्रा यांपेक्षाही टोकाचे अवमान करणारे प्रसंग तर्कतीर्थांच्या जीवनात अनेकदा आले. तर्कतीर्थांनी या सर्व प्रसंगी स्थितप्रज्ञतेची भूमिका निभावली. ‘दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगत स्पृह:। वीतराग भयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते॥’ अर्थात् दु:खात ज्या माणसाचे मन उद्विग्न होत नाही, सुखात ज्याची स्पृहा (आकांक्षा) निवृत्त (मुक्त) झाली आहे, ज्याच्या मनात राग, भय, क्रोध नष्ट झालेला आहे, तो मुनिवत स्थितप्रज्ञ असतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे जीवन, विचार आणि व्यवहार होय. वरील उदाहरणातून तर्कतीर्थांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात जो कृतिशील आदर्श प्रस्तुत केला आहे, तो केवळ स्तुत्य नसून वर्तमानासाठी तर अनुकरणीय वस्तुपाठ ठरतो. त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षात त्यांच्या विचारांचे हे स्मरण म्हणजे गतकालीन मूल्य माहात्म्य गमावलेल्या महाराष्ट्रासाठी पुनरुज्जीवन उपक्रम होय.

– डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com