तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे प्रारंभिक संस्कृत शिक्षण पिंपळनेर या त्यांच्या धुळे जिल्ह्यातील जन्मगावी सुरू झाले. तद्वतच त्यांच्यावरील धार्मिक संस्कारांनाही इथेच बालपणी आरंभ झाला. तर्कतीर्थांनी वसंत श्रीपाद सातवळेकर यांना वेदाध्ययनसंबंधी दिलेल्या एका मुलाखतीत (पाहा- तर्कतीर्थ समग्र वाङ्मय खंड- ६) सांगितले आहे की, ‘‘मी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्याचे नियम पाळू लागलो. मी अग्नीची नित्य उपासना करीत असे. त्रिकाल संध्या, सूर्यनमस्कार आणि योगासनेही करीत असे.
योगासनाचे महत्त्व मला माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांनी सांगितले. ते दक्षिणमार्गी शाक्त व शैव होते. ‘सप्तशती’चे अनुष्ठान व नवरात्र वडील करीत असत. त्यांची प्रदोषपूजा रात्री अकरा वाजेपर्यंत चाले. ती माझ्या कानावर पडत असे. घरीच वेदाध्ययन केले. शुक्ल यजुर्वेद शिकलो.’’ तर्कतीर्थांनी पहिल्यांदा महिपतीचा ‘संतलीलामृत’ ग्रंथ वाचला. पुढे ‘पांडव प्रताप’, ‘हरिविजय’, ‘शिवलीलामृत’ वाचले. वडिलांनी त्यांना ‘अमरकोश’ पढविला.
सन १९१४ ला तर्कतीर्थ बटू म्हणून प्रज्ञापाठशाळेत वेदाध्ययनार्थ दाखल झाले. पहिल्या दहा महिन्यांमध्ये त्यांनी व्युत्पत्ती पूर्ण केली; बाणभट्टाची ‘कादंबरी’, ‘नैषधचरित्र’, ‘न्यायमुक्तावली’, ‘जागदीशी’, ‘गादाधरी’ वाचत आणि शिकत त्यांची संस्कृतविद्या विकसित झाली. पंक्ती लावणे. चिन्तनिका, पाठांतर, वाद, भाषण, इत्यादींद्वारे संस्कृत अध्ययन पक्के होत गेले. तसे मग ‘तर्कसंग्रह’, ‘तर्कदीपिका’, ‘वेदांतसार’, ‘अर्थसंग्रह’, ‘पंचदशी’ ग्रंथ वाचन आणि चर्चा सुरू झाली.
सन १९१८ ते १९२२ या काळात संस्कृत, वेद, न्याय, व्याकरण, मीमांसा, तर्क, अलंकारशास्त्र इत्यादींचे काशी येथे उच्च शिक्षण घेतले आणि ते ‘तर्कतीर्थ’ झाले. सन १९२३ ते १९३३ या दशकांमध्ये तर्कतीर्थांनी आपले गुरू नारायणशास्त्री मराठे यांच्याबरोबर विविध पंडित सभा, धर्म परिषदांमध्ये धर्म व समाजसुधारणेचे कार्य करीत. यासंबंधीचे त्यांचे पहिले संस्कृत लेखन म्हणजे ‘शुद्धिसर्वस्वम्’ (१९२८) प्रबंध होय. पुढे सन १९३३ मध्ये तर्कतीर्थांनी ‘भारतीयधर्मेतिहासतत्त्वम्’ प्रबंध रचला. सन १९३४ मध्ये त्यांनी महात्मा गांधींसाठी अस्पृश्यता निवारणास प्रमाणभूत ठरेल असा ‘अस्पृश्यतामीमांसा’ हा संस्कृत प्रबंध लिहिला.
याच वर्षी लोककल्याणी औंध संस्थानचे अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या राज्य कारभारास २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जे संस्कृत मानपत्र प्रदान करण्यात आले होते, ते तर्कतीर्थांनीच लिहिले होते. १९६० ला तर्कतीर्थ गुरू नारायणशास्त्री मराठे ऊर्फ स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जे स्मारक भवन, वाई येथे उभारण्यात आले, त्याच्या लोकार्पणप्रसंगी तर्कतीर्थांनी या गुरूंचे संस्कृतचरित्र ‘श्री केवलानंदयतेश्चरिसार:’ चरित्र लिहिले.
स्वामी केवलानंद सरस्वतींनी ‘धर्मकोष’ या संस्कृत महाकोशाचा पाया घातला. त्या धर्मकोशाचे ‘व्यवहारकाण्डम्’, ‘उपनिषत्काण्डम्’, ‘संस्कारकाण्डम्’, ‘राजनीतिकाण्डम्’ या चार कांडांमधील प्रारंभिक २० भागांच्या संस्कृत, इंग्रजी प्रस्तावनाही तर्कतीर्थांनी लिहिलेल्या आहेत. याचे संपादक, प्रकाशकही तेच होते. कृ. वा. चितळे लिखित ‘लोकमान्य टिळक चरित्रम्’ ग्रंथास सन १९५६ मध्ये संस्कृतमध्ये प्रस्तावना लिहून टिळक चरित्रावर प्रकाश टाकला आहे. तर्कतीर्थांचे मोठे बंधू आयुर्वेदाचार्य वेणीमाधवशास्त्री रचित ‘आयुर्वेद महाकोश:’ला जोडलेले ‘पूरणिका निवेदम्’ (१९६८) तर्कतीर्थांचेच आहे. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदांमधून तर्कतीर्थांनी जे निबंध सादर केले, ते मूळ संस्कृतमध्येच लिहिलेले असत. रशिया, फ्रान्समधील संस्कृत निबंध बहुचर्चित झाले होते. रशियात वाचलेला ‘संस्करांचे यज्ञप्रधान स्वरूप’ (१९६३) आणि फ्रान्समधील ‘वैश्विक व्यवस्था आणि वैदिक देवतांचे राज्य’ (१९७३) निबंध त्यांच्या विषयावरूनच अभिनव होते, हे लक्षात येते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संस्कृत विद्योचा जो व्यासंग केला, त्यातून त्यांनी भारतीय संस्कृतीच्या इतिहासात जी वैदिक संस्कृतीची बीजे आढळतात, ती त्यांनी आपल्या संस्कृत लेखनाद्वारे अधोरेखित केली. शिवाय त्यांनी ‘भारतीय राज्यघटना’चे संस्कृत भाषांतर ‘भारतस्य संविधानम्’ (१९५२) शीर्षकाने करून संस्कृत विद्योवरील आपला एकाधिकार सिद्ध केला. सुमारे १३००० ‘संस्कृत हस्तलिखित ग्रंथ विवरण सूची’ (खंड १ व २)चे संपादन करून संस्कृत प्राचीन पोथ्यांचा आपला अभ्यास प्रस्तुत केला. भारत सरकारने त्यांना १९७३ मध्ये ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ उपाधीने गौरविले होते, हे सार्थच म्हणावे लागेल.
drsklawate@gmail.com