तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ शीर्षक भाषण हे व्याख्यान नसून, एक संपृक्त प्रबंध आहे. या प्रबंधात त्यांनी कला आणि वाङ्मय समीक्षेचा विचार अनेकांगांनी केला आहे. कला आणि मूल्यविचार जसा त्याचा एक पक्ष आहे, तसेच कलेचे ध्येय, कलेचे पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व, कला आणि नीतीसंबंध अशा अनेक अंगांचा उलगडा ते या व्याख्यानात्मक प्रबंधात करतात.

यातील कला व नीतीसंबंधांचा विचार हा तितकाच महत्त्वाचा आहे. तर्कतीर्थांच्या विचारानुसार कला ही स्वत:च एक ध्येय असते. ते ध्येय म्हणजे आनंददायी स्थिती. कलेची आनंदमयता स्वीकारार्ह असते. कलेकरिता कला याचा हाच अर्थ असतो. कला हे मनुष्याचे स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध असे इष्टसाध्य वा ध्येय असते. कशाचे साधन वा माध्यम म्हणून तिचा आनंद नसतो. तो आनंद कलेतच असतो. चंद्रोदय रम्य का वाटतो, निळे आकाश आपणास आल्हादक का वाटते, आकाशातील प्रकाश वा ढगातील पाऊस का भावतो, खडीसाखरेचा स्वाद, गुलाबाचा गंध वा भैरवी रागाची गोडी स्वयंसिद्ध प्रिय भासते, तशी कलाही!

कोणी म्हणतात, जीवनाकरिता कला. जीवन म्हणजे आत्म्याच्या विविध ध्येयांच्या सिद्ध्यर्थ चाललेला जीवसमुदायाचा प्रयत्न! म्हणजेच आत्म्याला पूर्णत्व देण्याचा अट्टहास. आत्म्याची ध्येये तारतम्ययुक्त असतात. कला हे मानवाचे एकमेव ध्येय नाही. ध्येयात वैचित्र नि वैविध्य असते. कला त्यांपैकी एक होय. ध्येयाचे कलारूपांशी संवादित्व असणे महत्त्वाचे असते, अन्यथा कलाविकास अशक्य! कारण, अंशापेक्षा (पार्ट) अंशी (व्होल) मोठा असतो. कला केवळ साधन नाही, ती साधनाही आहे.

मराठी साहित्यात कलाविषय अनेक वाद प्रसिद्ध आहेत. फडके – खांडेकरांचा कलेकरिता कला आणि जीवनाकरिता कला, हा जसा प्रसिद्ध तसाच फडके – आचार्य जावडेकरांमधील कला – नीती वादही बहुचर्चित आहे. या दुसऱ्या वादाची चर्चा मात्र अल्पशीच झाली. खरे तर ती ऐरणीवर यायला हवी होती. (जसे या सदर लेखकाचे म्हणणे आहे.) नीतिशास्त्र हा सर्व शास्त्रांचा पाया असल्यामुळे नैतिक मूल्य सर्व मूल्यांत श्रेष्ठ आहेत. म्हणून कलेची शुद्धता नीतीच्या अधिष्ठानावर अवलंबून असते, असे आचार्य शंकरराव जावडेकरांचे म्हणणे होते, तर प्रा. ना. सी. फडके कलेच्या तंत्र, भाषा, रचना, सौंदर्य तत्त्वाचा आग्रह धरीत. हा वाद एका अर्थाने कलात्मक लेखन श्रेष्ठ की वैचारिक लेखन (चिंतनक्षम, नैतिक, सामाजिक) असाच होता.

नैतिक मूल्ये सारखी बदलतात. नित्शे, मार्क्स यांचे विचार नैतिकतासंबंधी भिन्न दृष्टिकोन व्यक्त करताना दिसतात. नीती हा कलेचा विषय खरा; पण बंधनकारक मात्र नाही. मनुष्याच्या भावनांची निर्मिती करणारे व त्या भावनांना क्षुब्ध वा शांत करणारे सगळे प्रकार कलेचे विषय बनतात. त्यामुळे विविध भावनांचा आविष्कार इतकेच कलेचे कार्य असते. कलेसंबंधी श्लील – अश्लील, बीभत्स – सुंदर, नीती – अनीती या कल्पना सापेक्ष होत. संदर्भ बदलले की त्यांचे अर्थ बदलतात. मूल्यांचेही तसेच आहे.

शास्त्र आणि वाङ्मयातील कल्पना या वस्तुस्थितीचा उलगडा करण्याकरिता उत्पन्न होत असतात. परिस्थिती बदलली की, त्यांची शुद्धी करून घ्यावी लागते. आपण निरुपयोगी झालेल्या कल्पनांना शुकनलिकान्यायाने (मोहाने होणारी फसगत) चिकटून बसलेले असतो. वाङ्मय, कला, शास्त्र, राजकीय, सामाजिक पक्ष, संस्था हे सर्व जुन्या संस्कृतीच्या व्यर्थ अभिमानाने भारलेले असतात. एकत्व निर्मितीसाठी जुन्याचा ऱ्हास व नव्याचा उदय आणि स्वीकार अनिवार्य असतो. जुने विचार व विभूती मागील प्रगतीच्या पायऱ्या होत. त्यावर पाय दिल्याशिवाय पुढील पायरी कशी गाठता येणार?

तर्कतीर्थांचे हे विचार म्हणजे मानवी जीवनविषयक अनेक गूढ प्रश्नांची तार्किक उकल होय. कला व नीतीसंबंधांचा अन्वय म्हणजे जीवनमार्गाचा नवशोध होय. वर्णन वस्तुस्थितीजन्य असते, तर विश्लेषण नवविचारांची निर्मिती प्रक्रिया असते. तर्कतीर्थविचार नेहमीच भविष्यलक्ष्यी विकासाच्या अनंत संभावना जागृत करीत नव्या दिशा नि दिशांतरे सुचवत राहतात.

drsklawate@gmail.com