एखाद्या व्यक्तीस सर्व कला आणि शास्त्रांचे ज्ञान असते का? या प्रश्नाचे उत्तर ज्या थोड्यांबाबत ‘होय’ असे द्यावे लागे, त्यांपैकी एक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. तर्कतीर्थांनी ललित वाङ्मय, कला, समीक्षा, मूल्ये, नीती इत्यादींबद्दल आपल्या भाषणांमधून जे विचार व्यक्त केले आहेत, ते लक्षात घेता असे म्हणावे लागते की, त्यांच्या व्यासंग आणि विश्लेषणास विषयांचे कुंपण घालता येत नाही.
मुंबईतील विलेपार्ले उपनगरात १९४३मध्ये दुसरे गोमांतक मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष तर्कतीर्थ होते. या अध्यक्षपदावरून त्यांनी केलेले भाषण ‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ विषयाला वाहिलेले होते. प्रदीर्घ वैचारिक, कलाविषयक भाषण म्हणून याची नोंद घ्यावी लागते. तर्कतीर्थ आपल्या वैचारिक भाषणांमध्ये कधी कधी लालित्यपूर्ण निवेदनांनी रंगत आणत.
या भाषणातही तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ललित कला आणि ललित वाङ्मय या दोन्ही गोष्टी भिन्न असून, त्यांची क्षेत्रे व स्वरूपही भिन्न आहे. दोन्ही क्षेत्रांतील कलाकृतींची समीक्षा होत असते. ती समीक्षा करणारे स्वतंत्र टीकाशास्त्र आहे. कला आणि वाङ्मय सौंदर्य हे स्वतंत्र असून, ते बंधमुक्त असते व असले पाहिजे. प्रतिभेच्या तरल, सुंदर परंतु स्वच्छंदी नृत्यात खंड पाडून समीक्षा विसंगती व विरस निर्माण करते.
तर्कतीर्थांसारखा प्रकांडपंडित ललित, मनोहर भाषाशैली वापरून आपले भाषण एखाद्या ललित, प्रतिभावान लेखकाचा प्रत्यय आणू शकतो, यावर विश्वास बसत नाही. या भाषणात एके ठिकाणी तर्कतीर्थ म्हणतात, ‘‘ऋग्वेदात सूर्यावर सोनेरी पिसारा असलेल्या गरुड पक्ष्याचे रूपक केले आहे. प्रतिभापक्षी विविध रंगांनी रंगलेल्या व प्रकाशपूर्ण चैतन्याकाशात विहार करणारा वेदातील सोनेरी पिसारा असलेल्या गरुडासारखा त्या अनंत आकाशात स्वैरपणे भराऱ्या मारणारा आहे. त्याच्या भरारीत व विहारात जे सौंदर्य आहे, ते स्वातंत्र्यमूलक आहे. म्हणजे, आकाशात अडथळा नसतो व प्रकाश असतो आणि तो पक्षी स्वत: पिंजऱ्यात त्यावेळी कोंडलेला नसतो. प्रकाश व आकाश ही स्वातंत्र्याची पूर्ण प्रतीके आहेत.
आकाश म्हणजे मोकळेपणा. आकाशात सर्व सद्वस्तू सामावतात. प्रकाशात गतीचे अडथळे व दृष्टीची बंधने नष्ट होतात. दृष्टीचे बंधन म्हणजे काळोख. ललित समीक्षेत प्रतिभेला प्रतिबंध उत्पन्न करणारे प्रश्न अलीकडे उत्पन्न केले जात आहेत. पती आंधळा म्हणून पातिव्रत्यामुळे गांधारीने जन्मभर डोळे बांधून ठेवले, त्याचप्रमाणे काव्यप्रतिभेने अंधरूढ धर्माचे पातिव्रत्य स्वीकारून रूढ नीतीच्या बंधनाने दृष्टी कायमची बांधून राहावी, असा त्या प्रश्नांचा उद्देश आहे. म्हणून त्यांचा विचार करणे अगत्याचे आहे. तसे पाहिले तर कलाकारांनी समीक्षेत शिरलेच पाहिजे असे नाही. आदर्श कला निर्माण करणारे अनेक महान कलाकार समीक्षापंडित नव्हते, असे सांगता येईल.
वाल्मीकी व कालिदास यांनी साहित्यशास्त्र लिहिलेले ऐकिवात नाही. शेक्सपिअरचा समीक्षेवरचा ग्रंथ प्रसिद्ध नाही. समीक्षेची उपेक्षा करूनही उच्च कलानिर्मिती होऊ शकते. परंतु, आता समीक्षेची उपेक्षा करून भागणार नाही. कारण, सध्याचे समीक्षाप्रश्न कलाव्यापारात विक्षेप उत्पन्न करू लागले आहेत, त्यामुळे उच्चतर कलाव्यापार मंदावून बंदही पडण्याची भीती आहे. एक पाश्चात्त्य समीक्षाकार मार्मिकपणे असे म्हणतो की, उत्कृष्ट कलानिर्मितीची स्फूर्ती निमाली, म्हणजेच कलेचे प्रयोजन काय व कलेची बंधने कोणती असे प्रश्न उत्पन्न होतात.’’
तर्कतीर्थांचे हे विचार ललित कला आणि वाङ्मयाचा विचार करताना त्यात समीक्षेची भूमिका विशद करतात. मूलत: समीक्षा आस्वादक असायला हवी. ललित कला आणि वाङ्मय या दोन्ही गोष्टी सौंदर्याने नटलेल्या असतील, तरच त्या आस्वाद्या होतात. त्यांची समीक्षा आस्वाद्या नसेल, तर मात्र ती कला व वाङ्मयाच्या सौंदर्यतत्त्वास मारक ठरते. म्हणून कला व वाङ्मयाचे सौंदर्य समीक्षेत तितक्याच तोलामोलाने प्रतिबिंबित झाले, तर समीक्षाही सौंदर्यतत्त्वाने विभूषित होणे अशक्य नाही. समीक्षक वा टीकाकाराने प्रत्येक वेळी हातात कात्री, करवतच घेतली पाहिजे असे नाही. समीक्षा काही शस्त्रक्रिया नाही. हाती कुंचला घेतला तरी चालतो.
drsklawate@gmail.com
