महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य बृहन्महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत महाराष्ट्र मंडळांनी केलेले दिसून येते. बेळगाव, बडोदे, इंदूर, भोपाळ, अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली, कलकत्ता येथील अशी मंडळे सण-समारंभांच्या बरोबरीने व्याख्याने योजत आली आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील ‘वाङ्मय चर्चा मंडळ’ व्यवच्छेदक अशा अर्थाने की, ते वाङ्मयाला वाहिलेले आहे. या मंडळाने ९ जानेवारी, १९४९ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे व्याख्यान योजले होते. त्याचा विषय होता ‘काव्य आणि सामाजिक क्रांती’. विशेष म्हणजे तत्कालीन वाङ्मयीन नियतकालिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘सत्यकथा’ने फेब्रुवारी, १९४९च्या अंकात प्रकाशित केले होते.
नेहमीच्या धाटणीपेक्षा हे व्याख्यान शैली म्हणून उपरोधिक, टीकात्मक असे दिसून येते. प्रारंभीच ते म्हणतात, ‘‘प्रथम एक गैरसमज मी दूर करतो. मी काव्यतीर्थ नसून तर्कतीर्थ आहे आणि काव्य व तर्क यांतील विरोध सुप्रसिद्ध आहे..! प्राचीन कवींनी काव्याची चंद्रिकेशी व तर्काची चंडांशुशी (सूर्य) तुलना केली आहे. आपल्या या व्याख्यानात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, कवी हा क्रांतदर्शी या अंगाने सामाजिक क्रांतीचा अग्रदूत असतो.
कवी गोविंदाग्रजांनी (रा. ग. गडकरी) ‘कैदी नव्हे तो कवी’ म्हणत कवीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष वेधले आहे. शास्त्र नि कलेस जसा इतिहास असतो, तसा काव्यालाही असतो. कवी एक कलाकार म्हणून बंधमुक्त असतो. केशवसुतांची ‘तुतारी’ याची साक्ष देते. केशवसुतांनंतर तशी कविता झाली नाही. कवीचे अधिष्ठान म्हणजे शारदेचे सिंहासन! ते केशवसुतांनी गाठले. दिक्कालांचा भेद करून अज्ञाताच्या कुंपणावरून पलीकडे उडी ठोकून त्यांची दृष्टी भविष्यकाळाचा ठाव घेत होती. नव्या मनूतील नव्या दमाचा त्यांचा शिपाई तलवार, बंदुका घेऊन दुसऱ्याचे रक्त सांडणारा नाही.
या पार्श्वभूमीवर अलीकडे कसले काव्य निर्माण होत आहे. प्रा. बा. सी. मर्ढेकरांच्या ‘काही कविता’ (१९४८) संग्रहातील काहीच कविता चांगल्या आहेत. त्यांनी पाय रिकिबीत अडकलेला शिपाई उभा केला आहे. तो नव्या युगाचा कसा? या भाषणात तर्कतीर्थकृत मर्ढेकर काव्यटीका कठोरच म्हणावी लागेल. ‘मर्ढेकरांनी अभिजात बीभत्सरस आपल्या काव्यात निर्माण केला’सारख्या वाक्यातून ते लक्षात येईल.
‘काव्य आणि सामाजिक क्रांती’ भाषण जागतिक वाङ्मय संदर्भांनी परिपूर्ण आहे. केशवसुत, तुकाराम, हरिभाऊ आपटे एकीकडे, तर दुसरीकडे कार्ल मार्क्स, नाटककार एस्किलस होते. यांच्या काव्य, साहित्याचे दाखले देत तर्कतीर्थ साहित्य हे क्रांतीचे साधन असल्याचे अधोरेखित करीत राहतात. प्रॉमिथिअस, ज्युपिटर एकीकडे, तर दुसरीकडे श्रीकृष्ण, असा दृष्टांतांचा गोफ विणत तर्कतीर्थ आपले व्याख्यान खुलवत राहतात, तेव्हा लक्षात येते की, प्रतिभा व प्रज्ञा या सख्ख्या बहिणी खऱ्या!
‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हे केशवसुत अभिप्रेत कवी कार्य असल्याचे समजावत ते मानवेंद्रनाथ रॉय यांनी वाङ्मयसंबंधी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांतून ‘ब्युटिफुली स्टराईल’ म्हणत जे वर्णन करतात त्यातून वर्तमान वाङ्मयाचा दर्जाच ते निश्चित करीत असतात. अस्पष्ट (व्हेग) वाङ्मयास श्रेष्ठ कसे म्हणायचे, हा तर्कतीर्थांनी निर्माण केलेला प्रश्न वाचकास अंतर्मुख करतो. वाङ्मय हे हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘सर्मन्स फ्रॉम दि माउंटेन्स’सारखे मार्गदर्शक असायला हवे, हे सांगायला तर्कतीर्थ विसरत नाहीत.
कवी शेलेने विज्ञान व नीतिधर्म दोन्हीही हवेत असे सांगितले होते. तो जडवादी (अनीश्वरवादी, निधर्मी) होता; पण जडातून (निर्जीवतेतून) जे आवाज निघतात, ते तो आत्मिक मानत असे. आकाशापासून मनाची विशालता, सूर्यापासून ज्ञानोपासना हे गुण त्याला घ्यावेसे वाटत असत. ‘आय चेंज बट डू नॉट डाय’ म्हणणारा हा कवी परिवर्तन सातत्यच सूचित करीत होता. ‘कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला’ म्हणणारे कवी माधव ज्युलियन हेच सांगतात ना? काव्य आणि क्रांती हे सामाजिक अद्वैत असल्याचे तर्कतीर्थ या व्याख्यानातून सूचित करीत सबंध मानव्याला आशा देणारे कवी हवेत, ट्रिंग ट्रिंग करणारे नकोत असे म्हणतात, तेव्हा त्यांना केशवसुत व मर्ढेकरांमधील फरकच सुचवायचा असतो, हे स्पष्ट होते.
drsklawate@gmail.com
