अनुबंध शब्दाचे अनेक अर्थ असले तरी व्यक्तिसंबंधांच्या अंगाने वर्तमानात या शब्दाचे वाढते महत्त्व दिसून येते. ‘मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स’ अशा अर्थाचं एक सुभाषित आहे. मनुष्य समाजशील जीव असल्याने तो समाजात राहणे पसंत करतो. या प्रक्रियेत माणूस नि त्याचे संबंधी यांचा एक अनुबंध, नातेसंबंध इत्यादींचा गोफ तयार होते, तसेच अशा संबंधांतून कधी कधी मतभेद, मनभेद तर कधी वैरभावही तयार होत राहतो. कधी कधी हितसंबंधही आकाराला येऊन त्यातून माणसाच्या जगण्याचे नवे ताणतणाव, स्पर्धाही अस्तित्वात येतात.
तर्कतीर्थांच्या जडणघडणीचा, त्यांच्या जीवन, कार्य, विचारांचा अभ्यास करीत असताना लक्षात येते की, ते अनेकार्थाने समाजपुरुष होते. आई-वडील, कुटुंबीय, नातेवाईक, स्वत:ची विस्तारलेली गृहस्थी, मुलं-बाळं नि त्यांचे विस्तारित कुटुंब असते; पण त्यापलीकडचा त्यांचा एक सामाजिक परिवारही होता. या परिवारातील व्यक्तिसंबंध कधी औपचारिक, तर कधी अनौपचारिक होते. मनुष्यसंबंध ही प्रत्येकाची जगण्याची अनिवार्य गरज असते. या संबंधांना अनेक प्रकारची किनार असते. त्याचे व्यक्तिमत्त्व जसे घडते-बिघडते तसे त्याचे संबंधही घडत-बिघडत राहतात.
तर्कतीर्थ वाईतील प्राज्ञपाठशाळेत शिकले. तिथले गुरुजी नि सहाध्यायी यांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव, परिणाम दिसून येतो. त्यांचे गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांच्याबद्दल या सदरात आपण यापूर्वी माहिती घेतली आहे. प्राज्ञपाठशाळा कार्यातील त्यांचे सहकारी महादेवशास्त्री दिवेकर आणि वासुदेवशास्त्री कोनकर यांच्याशी असलेल्या अनुबंधाचा उलगडा तर्कतीर्थांनी त्यांच्याबद्दल लिहिलेल्या व्यक्तिलेखांमधून केला आहे. तर्कतीर्थांची घडण होत असलेल्या काळात वाचनाने त्यांना अनेकांनी प्रभावित केले. अनेकांच्या जीवनचरित्रांतून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी अनेक स्वरूपाचे कार्य केले. प्राज्ञपाठशाळेत शिकत असतानाच्या काळात विनोबा भावे, पुढे पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते झालेले श्रीपाद शंकर नवरे यांच्याबद्दल तर्कतीर्थांनी लिहिले आहे आणि तर्कतीर्थांबद्दल त्यांच्या या सहाध्यायांनीसुद्धा लिहिले आहे. यातून उभयपक्षी अनुबंधावर प्रकाश पडतो. पुढे तर्कतीर्थ आपल्या ऐन तिशीत महात्मा गांधींच्या कायदेभंग चळवळीत सहभागी झाले, ते त्यांच्या आवाहनातील प्रेरणेने. त्याबद्दल यापूर्वी येथे लिहिलेले आहे. परंतु तर्कतीर्थांच्या राजकीय, राष्ट्रीय व आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व घडणीत लोकमान्य टिळकांचा प्रभाव असाधारण आहे.
तर्कतीर्थांचा जन्म, बालपण व प्रारंभिक शिक्षण धुळे जिल्ह्यातील पाझरा नदीकाठच्या पिंपळनेर नामक छोट्या गावात झाले. तिथे दैनिक ‘केसरी’ दोन दिवस उशिरा हाती यायचा. तरी तिथल्या देशमुखांच्या वाड्यात त्याचे सार्वजनिक वाचन व्हायचे. तेव्हा ऐकायला गाव जमत असल्याची आठवण तर्कतीर्थांनी लिहून ठेवली आहे. या वृत्तपत्राने विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वातंत्र्य चळवळीच्या अनुषंगाने लोकजागृतीचे मोठे काम केले. त्यामुळे बालवयातच तर्कतीर्थांच्या मनात लोकमान्य टिळकांबद्दल कुतूहल, आकर्षण निर्माण झाले. तर्कतीर्थ वेदांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी काशीला प्रस्थान गेले, ते पुण्यात जाऊन लोकमान्य टिळकांचे आशीर्वाद घेऊनच.
जीवनाच्या वाटचालीत माणसाचा सामाजिक परीघ रुंदावत जातो, तशी अनुबंधाची नवनवी क्षितिजे नि पैलू विस्तारित होत जातात नि अनुबंधांचे साम्राज्य प्रतिदिन विकसित होत राहते. या साम्राज्यात मग कालौघात पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लालबहाद्दूर शास्त्री, भाऊसाहेब बांदोडकर, एलन रॉय, सेनापती बापट, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, इतिहासकार वि. का. राजवाडे, प्रा. न. र. फाटक, गायक कुमार गंधर्व, साहित्यिक पु. ल. देशपांडे, प्रा. गोवर्धन पारीख, प्रा. अ. भि. शहा, निसिम इझिकेल, वर्नर हाइसेनबर्ग, फिलिप स्प्रॅट, डॉ. मायकेल पोलयानी, चित्रकार फ्रान्सिस जोशे द गोया अशी कितीतरी माणसे तर्कतीर्थांच्या अनुबंधात आली, त्यांना प्रेरणा दिली; तर कधी विचार, कार्याचे सहकारी झालीत. माणसाचा जीवनप्रवास म्हणजे रोज वाढत जाणारा ‘कारवां’, माणसांचे मोहोळ, संबंधांचे गजबजलेले जहाज असते. म्हणून माणूस रोज समृद्ध, संपन्न होत राहतो. तसे तर्कतीर्थ रोज मनुष्यश्रीमंत होत गेले. यावर प्रकाश टाकणारे काही लेख या सदरात येथून पुढे येतील.
drsklawate@gmail.com