यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सौहार्द सर्वपरिचित आहे. ‘कृष्णाकाठ’ या आपल्या आत्मकथेचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण यांनी केल्यानंतर त्यावर तर्कतीर्थांनी भाष्य करणे ओघाने आलेच. ‘कृष्णाकाठ’चे प्रकाशन ७ फेब्रुवारी, १९८४ ला झाले. त्याची प्रशंसा करीत तर्कतीर्थांनी ६ ऑक्टोबर, १९८४ रोजी पुणे आकाशवाणीवर भाषण केले होते. त्याची संहिता मासिक ‘लोकराज्य’ने मार्च, २०१२ च्या विशेषांकात प्रकाशित केली होती.
तर्कतीर्थांनी यात विशद केले आहे की, ‘‘आत्मचरित्र लिहिणे ही जबाबदारी असते. ती यशवंतराव चव्हाण यांनी मोठ्या कुशलतेने पार पाडली आहे. आत्मचरित्राचा आकृतिबंध वेगळा असतो. त्याचा आशयही निराळा असतो. आपण आपल्याला पाहायचे, स्वत:चे सर्वांगीण अवलोकन करायचे, तेव्हा कित्येकदा दार बंद करूनही घ्यावे लागते. परंतु, आत्मचरित्रात सगळे काही उघडे करून सांगावे, अशी आत्मचरित्रांविषयी अपेक्षा असते. वाचकांची ही अपेक्षा केव्हाही मर्यादित अर्थानेच कोणताही आत्मचरित्रकार पूर्ण करू शकतो.’’
‘कृष्णाकाठ’मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी १९१३ (जन्म) ते १९४६ अशा प्रारंभिक ३३ वर्षांचे जीवन कथन केले आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील जीवनघडण यात वर्णिली आहे. त्या अर्थाने ही पूर्वार्धाची जीवनगाथा होय. हा आत्मचरित्राचा पहिला खंड. तो प्रकाशित झाला त्याच वर्षी त्यांचं निधन झाल्याने ते दुसरा खंड साकारू शकले नाहीत. जन्म ते पार्लमेंटरी बोर्ड सेक्रेटरी होईपर्यंतची जीवनकहाणी ‘कृष्णाकाठ’मध्ये आहे. यशवंतरावांचा जन्म आजोळी- देवराष्ट्रे गावी झाला. त्यांची जडणघडण कराडमध्ये झाली. कराडच्या नागरी संस्कृतीचा पाया आधुनिक शिक्षण होता. वडील बालपणीच निवर्तले होते. मातोश्री विठाबाई यांनीच त्यांचा सांभाळ केला. कराडमध्ये राहण्याचा निर्णय आईचाच होता. ‘मातृदेवोभव’ हा ‘श्रुती’मधील आदेश ज्यांनी पाळला, ते सर्व सुपुत्र मानवी इतिहासात भाग्यशाली झाले. अशा सत्पुत्रांपैकी यशवंतराव चव्हाण एक होते. म्हणूनच त्यांनी १९४६च्या ३० मार्चला पार्लमेंटरी बोर्ड सेक्रेटरी बैठकीस जाताना आईचा आशीर्वाद घेऊन मुंबईस प्रस्थान केले होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रारंभिक वैचारिक घडणीत पहिला प्रभाव पडला तो भाऊसाहेब करंबेळकर यांचा आणि त्यांच्या ‘विजयाश्रम’चा. हा आश्रम महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारधारेवर कार्यरत होता. यशवंतराव चव्हाण माध्यमिक शिक्षण घेत होते, त्या काळातच त्यांना सविनय कायदेभंग आंदोलनाने आकर्षित केले. ‘साबरमतीच्या तीरावरी’ल वादळाने ‘कृष्णाकाठ’ भरून गेला. यशवंतरावांना एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. या काळात त्यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा वाढला. तुरुंगातून बाहेर आल्यावर तर्कतीर्थ, ह. रा. महाजनी, आत्माराम पाटील (बहे बोरगावकर) त्यांचे साथी, सहकारी झाले. पुढे ते रॉयवादाकडे आकर्षित झाले. यामुळे वैचारिक परिपक्वता आली. ‘कृष्णाकाठ’चे पहिले प्रकरण ‘जडणघडण’ या वैचारिक आंदोलनाचे प्रवेशद्वार होय. ‘वैचारिक आंदोलन’मध्ये राजकीय वाटचालीचा विस्तार वाचावयास मिळतो. ‘निवड’ या तिसऱ्या प्रकरणात दुसऱ्या जागतिक महायुद्धाचे व त्याच्या भारतीय पडसादाचे विवेचन आहे. यात ‘भारत छोडो’ आंदोलन येते. भूमिगत चळवळींचे रोमांचकारी वर्णन यात आहे. नंतर १९४५ मध्ये महात्मा गांधींची दुसऱ्या महायुद्धातील भूमिका विशद केली आहे. १९४२ चे ‘भारत छोडो’, ‘पत्री सरकार’, ‘रॉयवादी मीमांसा’ यांनी हे प्रकरण गुंफले गेले आहे. १९४६ च्या विधानसभा निवडणुकीत झालेला विजय, बाबासाहेब खेर यांची नेतेपदी निवड, यशवंतराव चव्हाण पार्लमेंटरी सेक्रेटरी होणे, या घटनांचा साद्यांत इतिहास म्हणजे ‘कृष्णाकाठ’; पण हा जीवनाचा पूर्वार्धच!
ज्यांना यशवंतराव चव्हाण यांचे समग्र जीवन समजून घ्यायचे आहे, त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे उभारलेले स्मृतिसंग्रहालय पाहायला हवे. सदर स्मृतिसंग्रहालय मी उभारत असताना मला लक्षात आलेली गोष्ट अशी की, यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने महाराष्ट्राला असे सुसंस्कृत नेतृत्व लाभले, ज्यामुळे १९५६ ते १९८४ अशा सुमारे तीन दशकांच्या काळातला महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य म्हणून विकसित होत राहिला. तसे ते राज्य परत केव्हा होणार?
drsklawate@gmail.com