नगर परिषद, कराडमार्फत अनेक वर्षे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला आयोजित केली जाते. १९९१च्या या व्याख्यानमालेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘विज्ञान आणि मानवी मूल्ये’ या विषयश्रृंखलेत तीन पुष्पे गुंफली होती, पैकी दोन व्याख्याने ‘नवभारत’ मासिकाच्या फेब्रुवारी – मार्च १९९१च्या अंकात प्रकाशित आहेत. १) जीवविज्ञानात दिसणारा मानव, २) विज्ञान संस्कृती. तिसरे व्याख्यान एप्रिल १९९१ च्या अंकात प्रकाशित होईल, अशी सूचना दुसऱ्या भाषणाच्या शेवटी (‘नवभारत’, फेब्रुवारी-मार्च, १९९१; पृ. ८७) संपादकांनी प्रकाशित केली खरी; पण तदनंतर अपरिहार्य कारणामुळे जवळजवळ एक वर्ष (१९९१) ‘नवभारत’ मासिकाचे अंक प्रकाशित होऊ न शकल्याने ‘मनुष्य व नैतिक मूल्य’ हे तिसरे भाषण प्रकाशित झाले नाही आणि शोध घेऊनही उपलब्ध होऊ शकले नाही.
या पहिल्या व्याख्यानात ते म्हणतात की, हा कठीण विषय आहे. माणूस समजून घ्यायचा प्रयत्न पूर्वापार आहे. वेद-उपनिषदात ‘कोऽयमात्मा’- आत्मा म्हणजे ‘मी’ म्हटले आहे. सॉक्रेटिस, येशू ख्रिास्ताने (नो दायसेल्फ) म्हणत स्वत:ला जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. तर्कशास्त्र मानवाच्या असण्यास ठाम स्वीकृत देत ‘आय थिंक, देअरफोर आय अॅम’ म्हणत होते. जीवशास्त्र परिभाषेत माणूस ‘होमोसेपिअन’ म्हणजे शहाणा, प्रगल्भ जीव होय; पण तो खरंच शहाणा का, ते अजून ठरायचे आहे. कारण, त्यांनी जी संहारक अस्त्रे निर्माण केली, त्यातून त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले; पण शहाणपण नाही.
जीवविज्ञानाने त्याला विकसित जीव मानले आहे. काव्यात आणि साहित्यात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जीवांची गंधर्व, अप्सरा इ. वर्णने सर्वधर्म नि भाषा साहित्यात आहे. सर्वांत जुने विज्ञान ज्योतिर्विज्ञान होय. भौतिकीमधला जुना शास्त्रज्ञ न्यूटन होय. भौतिकशास्त्राचा आज खूप विकास झाला आहे. जीवविज्ञानात डार्विनने क्रांती केली. त्याच्या संशोधनाने धर्मग्रंथातील मनुष्यजन्म, विकास, कल्पना खोट्या ठरल्या. मनुष्य बुद्धिजीवी ठरला. म्हणूनही तो श्रेष्ठ आहे. त्याने विविध ज्ञान-विज्ञाने आपल्या बुद्धीने विकसित केली. जनुकाचा शोध लावून जीवविकासाचे रहस्य शोधले. माणसातील माहिती केंद्रे शोधली. मानवी वंशाचा अभ्यास झाला. जात, वंश संबंध तपासले गेले. माणुसकीचा भाव सर्वांत श्रेष्ठ ठरला. त्याआधारे माणसाचे श्रेष्ठत्व ठरले, ते संस्कृती विकासामुळे.
विज्ञानातील रसायनशास्त्र एक विकसित झालेले शास्त्र आहे. त्या शास्त्राने एकपेशीय जीवापासून ते मनुष्यासारख्या बहुपेशीय जीवांतीतील बीजसूत्रे, रंगसूत्रे शोधून काढली आहेत. त्यातील आम्लांचा शोध घेतला आहे. त्याच्या आधारे जीवांच्या जैविक प्रेरणांचा शोध घेणे शक्य झाले आहे, त्यामुळे मानवी सामाजिक प्रेरणांचा आता शोध घेता येतो. तो जननिक संकेतांच्या (जेनेटिक कोड) आधारे. डॉ. हरगोविंद खुराणा यांनी डीएनए किंवा आरएनएचा शोध लावल्यामुळे जीव अभ्यास सूक्ष्म आणि अचूक बनत गेला आहे. जीवाला जगायला लागणारी प्रेरणा व कौशल्ये जीवातील वर्णसूत्रांतून येतात.
बीज, मेंदू आणि देह बाह्य केंद्र (एक्स्ट्रा ऑटोमॅटिक) यामुळे मनुष्य मिळालेली माहिती साठवू शकतो व तिच्या आधारे कार्य करतो. असे कार्य सर्व जीवांत होते. माणसात ते विशेषत्वाने घडते. हे विशेषत्व ही मानवी जीवास उत्क्रांतीत अथवा विकासात लाभलेली देणगी होय. मानवाने विकसित केलेले ज्ञान अपार आहे. ते साठवता आल्याने नंतरच्या पिढ्या ते वापरू शकतात. अन्य प्राण्यांपेक्षा माणूस चांगला शिकू शकतो. कारण, शिकण्याची क्षमता त्यात प्रगत आहे. साऱ्या सृष्टीतील माणसे वेगवेगळ्या रंग, वंश व देहयष्टीची दिसतात. ती त्या पर्यावरण व वंशपरंपरेची परिणती होय. वंश, वर्ण देहयष्टीच्या आधारे माणूस श्रेष्ठ, कनिष्ठ ठरत नाही. माणसाची योग्यता त्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. वंश, जात, वर्ण श्रेष्ठतेस काही अर्थ नसतो. शेवटी व्यक्ती क्षमता निर्णायक ठरते. वर्ण संकर हा वंश परिवर्तित करत राहतो. व्यक्ती निर्मितीचा निकष स्त्री-पुरुष संबंधच आहे, अन्य नाही. काळे, गोरे, पिवळे इ. वर्ण कालनिर्मित होय. जीवशास्त्रात दिसणारा माणूस अनेक कारणांची एक प्रचीती आहे.
drsklawate@gmail.com