रोमन लोकांच्या अंधश्रद्धांना गोंजारणारं किचकट आणि क्लिष्ट रोमन कॅलेंडर काहीही शास्त्रीय आधार नसताना सुमारे ५०० वर्षं वापरात राहिलं. या अंधश्रद्धांच्या कचाट्यातून विज्ञानही त्याला बाहेर काढू शकलं नाही आणि कित्येक राजेही. रोमन अधिक महिन्याचं गणित किती किचकट आणि क्लिष्ट आहे हे पाहिलं आपण. वास्तविक सुमारे ३५५ दिवसांचे १२ चांद्र महिने आणि ३६५.२५ दिवसांचं सौर वर्ष यांचा मेळ बसवायचा एवढाच तर मुद्दा होता. पण त्यासाठी चार-चार वर्षांचे सहा खंड केले. काही वर्षांमध्ये फेब्रुवारी २३ दिवसांचा केला. काही वर्षी अधिक महिने ठेवले, काही वर्षी काढले. हा सगळा खटाटोप कशासाठी?

याचं एका शब्दात उत्तर आहे, अंधश्रद्धा. त्याही एक नाही, दोन. पहिली अंधश्रद्धा ‘आम्हाला चांद्रमासच हवेत’ हा आग्रह. म्हणजे मग वर्ष ३५४ किंवा ३५५ दिवसांचंच असणार! आणि मग त्याची सौर वर्षाबरोबर सांगड घालण्याकरता विविध उपाय करावे लागणार. पण ‘महिना चंद्रावर आधारितच हवा’ हा हट्ट पुरा होण्यासाठी काय वाटेल ते करायची रोमन लोकांची तयारी होती, अगदी किचकट गणितसुद्धा!

बरं, एवढं करून महिने खरोखरच चांद्र होते का? असूच शकत नाहीत. ३१ दिवसांचे चांद्र महिने कसे असू शकतात? चांद्र महिने हे नेहमी २९ किंवा ३० दिवसांचे असतात आणि यांच्या कॅलेंडरमध्ये तर बारातले चार महिने ३१ दिवसांचे होते!

म्हणजे थोडक्यात काय तर म्हणताना ‘चांद्र महिने’ म्हणायचं पण प्रत्यक्षात त्यांचा आणि चंद्रभ्रमणाचा काहीही संबंध नाही अशी परिस्थिती किंवा ओढून-ताणून कसे तरी कोंबलेले चांद्र महिने असा प्रकार.

दुसरी अंधश्रद्धा सम संख्यांविषयी. ‘सम संख्या अशुभ’ असा रोमन लोकांचा समज होता. त्यामुळे त्यांना सम दिवस असलेले महिने नको होते. सम संख्या अशुभ का? याला काहीही तर्कसुसंगत उत्तर नाही. ‘आम्हाला वाटतात म्हणून’, ‘आमची तशी परंपरा आहे म्हणून’ हीच ती कारणं.

सम संख्यांचे दिवस असलेले महिने नकोत म्हणून बहुसंख्य महिने ३१ किंवा २९ दिवसांचे. अधिक महिना करतानादेखील फेब्रुवारी २३ दिवसांचा करायचा (विषम संख्या) आणि अधिक महिना घ्यायचा तोदेखील शक्यतो २७ दिवसांचा (परत एकदा, विषम संख्या)! किती त्या कोलांटउड्या!

बरं, आश्चर्य म्हणजे, सम संख्यांविषयी इतका आक्षेप असणाऱ्या रोमन लोकांना वर्षाचे बारा महिने चालत होते, अधिक महिन्याचं २४ वर्षांमध्ये बसवलेलं गणित चालत होतं, आणि या २४ वर्षांमध्ये केलेले ४-४ वर्षांचे गटही चालत होते!

तेव्हा, या श्रद्धा, रूढी, परंपरा अतिशय वरवरच्या होत्या. त्यांच्यात अंतर्गत विसंगती होत्या. पण त्यांचा पगडा किती जबरदस्त होता पाहा. त्यांचं जतन व्हावं म्हणून माणसं काय थराला जात होती पाहा.

बरं, असं होतं का की शास्त्रीय सत्य काय आहे हे माहीत नव्हतं? अजिबात नाही. त्या काळातदेखील खगोलशास्त्र बऱ्यापैकी पुढारलेलं होतं. मेटन नावाच्या ग्रीक (रोमन लोकांचे सख्खे शेजारी) खगोलशास्त्रज्ञाने ख्रिास्तपूर्व पाचव्या शतकातच सौर वर्षाचं मान ३६५.२५ दिवस इतकं अचूक वर्तवलं होतं. याच मेटनने १९ सौर वर्षांत २३५ चांद्र मास असतात हेदेखील सिद्ध केलं होतं! आणि या दोन गोष्टींवर आधारित चांद्र मास आणि सौर वर्ष यांची सांगड घालण्याची सोपी युक्तीही शोधून काढली होती. अन्य काही संस्कृतींनी हा उपाय अमलातदेखील आणला होता आणि आपआपली कॅलेंडरं साधी, सोपी, सुटसुटीत केली होती. पण रोमन लोक मात्र त्यांच्या रूढींना अगदी कवटाळून बसले होते.

एवढंच काय, ख्रिास्तपूर्व दुसऱ्या शतकात हिप्पार्कस नावाच्या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने सौर वर्ष ३६५.२४६७ दिवसांचं असतं एवढं अचूक गणित मांडलं होतं. आपलं ‘काळाचे गणित’ आणि त्याचं काळाचं गणित यांच्या उत्तरात अवघ्या ६ मिनिटांचा फरक आहे! हे महाशय केवळ अचूक गणित मांडून थांबले नाहीत तर त्यांनी ३६५.२५ आणि ३६५.२४६७ हा फरक पृथ्वीच्या डळमळत्या आसामुळे असतो हेदेखील जाणलं होतं!

पण गणित आणि विज्ञान एवढं प्रगत होऊनदेखील रोमन मंडळी आपल्या अंधश्रद्धा ‘रूढी आणि परंपरा’ या गोंडस नावाखाली सोडायला तयार नव्हती. त्यामुळे रोमन कॅलेंडरचा किचकटपणा सुमारे ५०० वर्ष तस्साच राहिला. या एवढ्या प्रदीर्घ कालखंडात रोममध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. कित्येक राजे आले आणि गेले. राज्यपद्धती बदलल्या. राज्यविस्तार झाला. पण या कॅलेंडरला कोणी हात लावू धजावलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे क्लिष्ट, किचकट, कटकटीचं कॅलेंडर मोडीत काढून त्याजागी सोपं, सुटसुटीत, सुलभ कॅलेंडर अमलात आणणारा वीर होता सम्राट गाईअस जूलियस सीझर. याची आणि आपली चुटपुटती ओळख असते. पण तो नेमका कोण होता, त्याने कॅलेंडरमध्ये काय बदल केले, का केले, कोणत्या त्रुटी दूर झाल्या, कोणत्या शिल्लक राहिल्या वगैरे गोष्टी आपण पाहणार आहोत. पण ते पुढच्या भागात.