तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनात जितकी वैचारिक स्थित्यंतरे दिसून येतात, तितकी स्थित्यंतरे फारच कमी लोकांमध्ये झालेली आढळतात. वेदांती, राष्ट्रवादी, काँग्रेसी, गांधीवादी, मार्क्सवादी, रॉयवादी, पुन्हा काँग्रेसी असा तर्कतीर्थांचा वैचारिक प्रवास लक्षात घेता कधी कधी प्रश्न पडतो की, ही वैचारिक धरसोड आहे की वैचारिक मूलभूत परिवर्तन आहे. याचा खुलासा तर्कतीर्थांनी अनेक ठिकाणी करून ठेवला आहे. ‘मी रॉयवादी का झालो?’ शीर्षक लेखात त्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘मूलत: विरोधी असलेली विचारसरणी माझ्या विचारपथात आल्याबरोबर क्षोभ उत्पन्न करून मला विचारास प्रवृत्त करते, असा माझा जुना अनुभव आहे. संस्कृत तत्त्वज्ञानाचा मी अभ्यास करावयास लागलो, तेव्हा अशा तऱ्हेचा अनुभव अनेक वेळा आला आहे. उदा. सनातन वैदिक धर्म विरुद्ध बौद्ध तत्त्वज्ञान. सनातन धर्मात स्थिर व शाश्वत कल्पनांसह तत्त्वांना फार महत्त्व आहे. अनादी व शाश्वत : जीवात्मा, देवता, धर्म व परमात्मा हे सगळे शाश्वत. याच्या अत्यंत विरोधी बौद्धमत आहे. या मतात सर्व क्षणिक आणि सर्व शाश्वत कल्पना मिथ्या होत. शून्य हे परमार्थिक सत्य होय. अशा तऱ्हेच्या परस्परविरोधी विचारसरणींनी माझ्या विचारांना वेळोवेळी फार गती दिली आहे.’’

प्रचलित विचारसरणी सोडून नव्या विचारसरणीप्रति आपल्या मनात जे आकर्षण निर्माण होते, त्याचे कारण त्या विचाराची मौलिक विलक्षणता हे असल्याचे तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे. आपणास एखाद्या विचारसरणीचे आकर्षण निर्माण होते, ते केवळ राजकीय असत नाही, तर बऱ्याचदा ते सामाजिक व सांस्कृतिक प्रमेयांचेही असते, हे सांगायला शास्त्रीजी विसरत नाहीत. ज्या विचारधारांची तात्त्विक बैठक पृथक असते, त्यांच्या वैलक्षण्याचे आकर्षण तर्कतीर्थांना असते हे लक्षात येते. हे वैलक्षण्य त्यांच्या लेखी विचार प्रवर्तकतेस पुरेसे असते, असे म्हणता येत नाही, शिवाय त्या विचारात स्फटिकाप्रमाणे स्वच्छता, स्पष्टता, पारदर्शितता, क्ष किरणाप्रमाणे भेदकता आवश्यक असते. मौलिक विलक्षणता म्हणजे पूर्वविचारधारेपेक्षा सर्वथा भिन्न, अभिनव नि आकर्षक गोष्ट होय.

तर्कतीर्थांमधील वैचारिक परिवर्तने पाहता त्यांनीच आपले साम्य पक्ष्याशी दाखवत एकदा म्हटले होते की, पक्षी जसा एकाच फांदीवर स्थिरावत नाही तसे माझे आहे. ‘मी परिवर्तनवादी शास्त्री’ शीर्षक भाषणात ते म्हणतात, ‘‘माझ्यात सारखा बदल होत गेला; अजूनही होणार नाही, असा निर्वाळा मी देऊ शकत नाही. परंतु तेव्हा लोक मला म्हणत, ‘हा खूप वाहवला आहे.’ मी प्रवाहपतितासारखा हतबल होऊन वाहत गेलो नाही. आतापर्यंत मी उच्च नैतिक न बैद्धिक सत्याच्या ध्रुवताऱ्याकडे लक्ष देऊनच वाहत राहिलो आहे. वेगाने बदलणाऱ्या जगाच्या प्रवाहात पहिल्या उमेदीत पाऊल टाकले. केव्हा वाहत तर केव्हा पोहत राहिलो. कोठेच पाय टेकले नाहीत. टेकायला जागाच सापडली नाही. जगाबरोबर माझ्यातही खूप बदल होत गेला.’’

प्रा. के. ना. वाटवे संस्कृत, मराठीचे जाणकार होते. ते तर्कतीर्थांचे स्नेही. या बदलांचे निरीक्षण करत त्यांनी एकदा भाष्य केले होते की, ‘‘तुमच्यातले बदल मोजले तर तीन प्रकारचे आहेत व त्याकरिता निरनिराळी तीन आयुष्ये वस्तुत: लाभावयास पाहिजेत, ते तुम्ही एकाच आयुष्यात अनुभवले.’’ वेदांती, रॉयवादी आणि नंतर नवमानवतावादी असा तर्कतीर्थांच्या जीवनातील वैचारिक स्थित्यंतराचा प्रवास मूलत: सुरू झाला, तो सन १९३०-३२ च्या धुळे तुरुंगवासात. तिथे त्यांच्याबरोबर द्वा. भ. कर्णिक होते. त्यादरम्यान भारतात मार्क्सवादाचे वारे जोरात वाहू लागले होते. तेव्हा तुरुंगात द्वा. भ. कर्णिकांमार्फत मार्क्सवादी साहित्य प्रचारित, प्रसारित केले जात असे. ते तर्कतीर्थ वाचत. मूळ वेदांती नि एका अर्थाने आध्यात्मिक घडण झालेल्या या संस्कृत पंडितास हा भौतिकवादी विचार एकदम नवा होता. त्याचे आकर्षण निर्माण झाले. वाचनाने तर्कतीर्थ मार्क्सवादी केव्हा झाले हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. सन १९३६ ला तर्कतीर्थ मानवेंद्रनाथ रॉय यांच्या संपर्कात आले नि रॉयिस्ट बनले. त्यांचा रॉयवाद मार्क्सवादावर आधारित होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com