एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघावे आणि वाटेत असे एखादे वळण यावे की त्याने आपले आयुष्यच बदलून जावे, असे फार मोजक्यांच्या बाबतीत घडते. डॉ. जीन येलिन या अशांपैकीच एक. १९व्या शतकातील अमेरिकी साहित्य या विषयावर शोधनिबंध लिहीत असताना ‘इन्सिडन्ट्स इन द लाइफ ऑफ अ स्लेव्ह गर्ल’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि या एका पुस्तकाने त्यांची ओळखच बदलून टाकली.
अमेरिकेतील गुलामगिरीचा इतिहास प्रदीर्घ असला, तरीही गुलामांचे विशेषत: गुलाम महिलांचे लिखित स्वरूपातील स्वानुभव दुर्मीळ आहेत. डॉ. येलिन यांची ओळख अशी की, त्यांनी एका गुलाम महिलेने स्वत: लिहिलेला दुर्मीळ दस्तावेज उपलब्ध असल्याचे सिद्ध केले. ‘इन द लाइफ ऑफ अ स्लेव्ह गर्ल’ हे पुस्तक तोवर ‘श्वेतवर्णीय महिलेने लिहिलेली कादंबरी’ म्हणून ओळखले आणि अभ्यासले जात होते. शोधनिबंधासाठी वाचन करताना ते डॉ. येलिन यांच्या हाती लागले. हे काल्पनिक लेखन नसून स्वानुभव असावा, असे त्यांना सतत जाणवत होते. त्यांनी या जाणिवेचा पाठपुरावा केला आणि कृष्णवर्णीयांच्या इतिहासाविषयीचे तोवर लपवून ठेवलेले एक गुपित हाती लागले. ती कादंबरी नव्हती. एका गुलाम महिलेचे आत्मचरित्र होते. त्या काळात गुलामांना शिक्षण घेण्यास बंदी होती. त्यामुळे टोपणनावाने हे लेखन केले गेले होते. लेखिकेचे खरे नाव होते हॅरिएट जेकब्ज.
तिचा माग काढताना डॉ. येलिन यांना जेकब्ज यांचे पत्र सापडले. त्यात खऱ्याखुऱ्या माणसांची नावे होती. येलिन यांनी ही संदर्भाची साखळी जोडली आणि त्यांना जेकब्ज यांच्याविषयीची अधिक माहिती मिळत गेली.. हॅरिएटचा जन्म अमेरिकेतलाच, १८१३ सालचा. लहानपणीच तिला गुलाम म्हणून विकले गेले होते. मात्र ज्यांना विकले त्या कुटुंबातील एका भल्या महिलेने तिला लेखन, वाचन शिकवले. पुढे तिला एका शेतमळय़ाच्या मालकाने खरेदी केले. त्याने तिच्यावर प्रचंड अत्याचार केले. तिथून पळून जाऊन ती आपल्या आजीच्या पोटमाळय़ावर लपून राहिली. उठून उभेही राहता येणार नाही, एवढय़ा जागेत तिने तब्बल सात वर्षे काढली. या काळात तिने बायबलचा अभ्यास केला. तिथून पळून ती न्यूयॉर्कला गेली आणि तिथे काही काळ परिचारिका म्हणून काम केल्यानंतर पुन्हा गुलामीच्या पाशात अडकली.
अॅमी पोस्ट या गुलामगिरी निर्मूलन चळवळीतील कार्यकर्तीने हॅरिएटला तिचा अनुभव लिहून काढण्याविषयी सुचवले आणि त्यातून हे पुस्तक साकारले. हॅरिएट यांनी लिंडा ब्रेन्ट नावाने लेखन केले. नामसाधम्र्यामुळे या पुस्तकाचे श्रेय लिंडा मारिया चाइल्ड या पत्रकार आणि गुलामगिरी निर्मूलन कार्यकर्तीकडे गेले होते. तिनेच पुस्तकाचे संपादनही केले होते. मात्र डॉ. येलिन यांनी जेकब्ज यांचा माग काढला आणि सत्य जगापुढे आले.
येलिन यांचा हा शोधनिबंध ‘इन्ट्रिकेट नॉट्स- ब्लॅक फिगर्स इन अमेरिकन लिटरेचर’ या नावाने १९७२ साली प्रसिद्ध झाला. ‘विमेन अँड सिस्टर्स- द अँटी स्लेव्हरी फेमिनिस्ट इन अमेरिकन कल्चर’ या पुस्तकासाठी १९९० साली त्यांना पुलित्झर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. ‘हॅरिएट जेकब्ज- अ लाइफ’ या त्यांच्या पुस्तकाला ‘फ्रेड्रिक डग्लस पुरस्कार’ आणि ‘विलियम सॅडर्स स्कारबरो पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. अमेरिकन आफ्रिकन महिलांच्या इतिहासाच्या त्या अभ्यासक होत्या. पीस विद्यापीठातील प्राध्यापक होत्या. गुलामगिरीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दस्तावेज जगापुढे आणणाऱ्या या लेखिकेचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली!