‘‘अजिबात कटकट करायची नाही, जेवा चूपचाप’’ असे निर्वाणीचे बोलत तिने तो बसलेल्या टेबलवर ताट जवळजवळ आदळलेच. वाटीत हेलकावे खात असलेले फोडणीचे आंबटगोड वरण व दोन चपात्या बघून त्याने शर्टाची बाही दुमडता दुमडता नाक मुरडले; पण बोलण्याची हिंमत झाली नाही. ऑफिसला जाताना उगीच वाद नको, असा विचार करत सवयीनुसार तो पुटपुटला, ‘‘जरा कांदा तरी दे.’’ त्यासरशी ती उसळली, ‘‘सोडला ना तुमच्या त्या निर्मलाताईंनी कांदा. मग नाही मिळणार. मारे गोडवे गाता ना तिचे त्या पार्कात बसून. आता कांदा, लसूण विसरा.’’ तिचा फणकारा बघून तो निमूट एकेक घास पोटात ढकलू लागला.
रोज तेच तेच खाऊन तो कंटाळला होता; पण विश्वगुरू व ताईंच्या नेतृत्वामुळे एक दिवस भले होईल असे त्याला सारखे वाटत होते. भात वाढायला जवळ आलेल्या तिला बघून तो पुन्हा पुटपुटला, ‘‘देशाची काळजी वाहणाऱ्या निर्मलाताई पण आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आहेत हं!’’ हे ऐकताच तिचा पारा चढला. ‘‘वारे वा! घरी नोकरचाकर, दिमतीला अनेक साहाय्यक, तरीही त्या मध्यमवर्गीय. जानेवारी ते मार्च या वेतनातून करकपातीच्या काळात त्याही फोडणीचे वरण रोज खातात का, हे जरा विचारून या की त्यांना. सात वर्षे झाली. तुमच्या बळावर आलेले हे सरकार प्रत्येक वेळी तोंडाला पाने पुसतेय. तरीही त्यांच्याच प्रेमात? साधे लोणचे घ्यायला जास्तीचा खर्च झाला, तरी तुम्ही कुरकुर करता. निर्मलाताई व त्यांच्या सासू कसे घरच्या आंब्याचे लोणचे तयार करताहेत, त्याचे छायाचित्र दाखवून जखमेवर मीठ चोळता. थोडी महागाची साडी घेऊ म्हटले की, त्या ताई किती साध्या साडय़ा घालतात, देशहितासाठी तसेच राहायला हवे, असे टोमणे मारता. मुलांनी हॉटेलात जाण्याचा हट्ट केला तर प्लेटचा हिशेब सांगत इतका इतका जीएसटी भरावा लागेल, असे गणित मांडून त्यांचा हिरमोड करता. गॅसचा सिलिंडर महिन्याच्या आधी संपला, तर महिन्याचे आर्थिक गणित कसे बिघडले, हे जोरजोरात सांगता. दारावर भाजीची गाडी आली म्हणून काही घ्यायला निघाले, तर डोळे वटारता.
कॉलेजात जाणाऱ्या मुलांना दुचाकी घेऊन द्या म्हटले, तर वाहन कर्जाचे व्याज वाढल्याचे सांगून वर सायकल चालवल्याने होणाऱ्या व्यायामाचे फायदे ऐकवता. नवा लहानसा सोन्याचा दागिना घेऊन द्या, असा आग्रह धरला तर त्या निर्मलाताई बघ, कशा सोने वापरत नाहीत, असे सांगून गप्प बसवता. पोटाला एवढा चिमटा काढून जगत आहोत तरी त्या ताईंनी स्वत:ची तुलना आपल्याशी केली की हवेत तरंगता. बघा, ताईंना आपली काळजी कशी आहे, हे पार्कातसुद्धा साऱ्यांना सांगता. थांबा जरा. येऊ द्या तुमचे बजेट. मग याल जमिनीवर,’’ असे म्हणत ती स्वयंपाकघरात निघून गेल्यावर बऱ्याच काळाने तो भानावर आला. आता तिला डिवचण्यात अर्थ नाही, असे म्हणत ऑफिसला पोहोचला, तर तिथे सारेच सहकारी निर्मलाताई कशा मध्यमवर्गीय यावर तावातावाने चर्चा करत होते. नाइलाजाने तोही त्यांच्यात सहभागी झाला.