कसलाही भेदभाव न करता जनतेचे कल्याण करायचे असेल तर सजिवांपेक्षा निर्जिवांवर विश्वास ठेवणे केव्हाही योग्य हे तत्त्व मी संपूर्ण कारकीर्दीत कटाक्षाने पाळत आलो. मोठय़ा जबाबदारीची जाणीव मनात ठेवत मी गांधीनगरहून जेव्हा दिल्लीत स्थानांतरित झालो तेव्हापासून माझी कॅमेऱ्याशी असलेली मैत्री अधिक घट्ट झाली. मोठय़ा पदावर असताना माणसांना जवळ केले की हितसंबंधाचे आरोप आपसूकच चिकटतात. तसे होऊ नये म्हणून मी कॅमेऱ्याला जवळ केले. आता आम्हा दोघांनाही एकमेकांची इतकी सवय झाली की तो ‘ऑन’ झाला की माझे हात आपसूकच वर जातात व प्रसंगागणिक अभिवादन, नमस्कार अशा हालचाली करू लागतात. हे नाते तसे खूपच नैसर्गिक; पण विरोधकांना यात कृत्रिमपणा वाटतो त्याला माझा नाइलाज आहे. परवा मी लष्कराच्या लढाऊ विमानातून अवकाशात एक फेरी मारली. नित्यनेमाप्रमाणे माझा सोबती (कॅमेरा) सोबत होताच. ढगांकडे बघून नेहमीप्रमाणे मी हात हलवला. त्यावरून विरोधकांनी उगीच काहूर उठवले. लहानपणापासून मला ढगांचे आकर्षण आहे. संपूर्ण विश्वाचे कल्याण हेच माझे ध्येय असल्याचे तुम्ही जाणताच. यात जमीन व अवकाश सारे काही आले. त्यामुळे हात हलवून मी ढगांची खबरबात जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात गैर काय? रामगिरी पर्वतावर राहणाऱ्या कालिदासाने सुद्धा ढगांशी संवाद साधण्याची किमया आत्मसात केली होती व त्यातूनच मेघदूतसारखे महाकाव्य जन्माला आले. ढगांकडे बघताना मला याच काव्यात एक पात्र असलेल्या यक्षची आठवण झाली व मी उत्स्फूर्तपणे ‘तुमच्यात साठवून ठेवलेले पाणी नियमितपणे पृथ्वीवर का पाडत नाही’ असा यक्षप्रश्न ढगांना विचारला. व लगेच काही भागात मेघधारा बरसल्यासुद्धा! तात्पर्य हेच की मी कुठेही असलो तरी मानवाच्या कल्याणाचाच विचार करतो व या कामात मला माझा आवडता कॅमेरा मदत करत असतो.
जनतेसमोर नतमस्तक होणे हा मी माझ्या कर्तव्याचा एक भागच समजतो. काही वर्षांपूर्वी मी केदारनाथला गेलो व भोलेबाबांना नमन केले. त्यानंतर लगेच कॅमेऱ्याच्या माध्यमातून जनतेला प्रणाम केला. तो करताना मंदिराकडे मी पाठ फिरवली म्हणून विरोधकांनी टीका केली, पण त्याने मी अजिबात विचलित झालो नाही. माझी प्रत्येक कृती ही जनतेला समर्पित असते. ती साऱ्यांना दिसावी यासाठी कॅमेऱ्याने माझ्या आयुष्यात अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे. लोकशाहीत प्रत्येक सत्ताकर्त्यांने सामान्यांप्रति उत्तरदायी असायलाच हवे. हे दायित्व निभावण्याचे काम नकळत माझा सवंगडी झालेला कॅमेरा उत्तम पद्धतीने पार पाडत आला आहे. याच केदारनाथच्या गुफेतील ध्यानधारणा असो, प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवणे असो, सकाळचा व्यायाम असो की करोनाची लस घेणे असो, या प्रत्येक कृतीतून जनतेला प्रेरणा मिळेल असा संदेश देण्याचे काम माझा कॅमेरा आजवर निष्ठेने व कसलीही अपेक्षा न बाळगता करत आला आहे. सामान्य लोकांना नेतृत्वाची कृतिशीलता आवडत असते. नेतृत्वाने केवळ वाणीवर भरवसा ठेवून चालत नाही. हा अनुभव केवळ आणि केवळ या कॅमेऱ्यामुळेच मला आला. यामुळे तो सोबत नसला तरी मी खरोखरच बेचैन होतो. जाणीवपूर्वक स्वीकारलेले माझ्यातले एकटेपण खायला उठते. अनेकदा काही कार्यक्रम नसला व कॅमेरा सोबत असला की मी आनंदी होत ‘सिलसिला’तले हे गाणे माझ्या शब्दात गुणगुणतो :
‘मैं और मेरा कॅमेरा
अक्सर ये बाते करते है!
तुम ना होते तो कैसा होता,
तुम हो तो ये मन गाता!’