निवडणूक जवळ आल्याने रोज वृत्तवाहिन्यांवर झळकायला मिळणार या आनंदात दादासाहेब तयार होऊन दिवाणखान्यात आले. त्यांना माध्यमांशी बोलताना घ्यावयाच्या खबरदारीसंदर्भात पक्षाकडून आलेले पत्र आठवले. ‘त्यानुसार माझी तयारी करून दे’ म्हणत ते पत्र रात्रीच साहाय्यकाला दिल्याचे लक्षात येताच त्यांनी सदऱ्याच्या खिशाला लावलेले कमळाचे चिन्ह ठीक करत बेल दाबली. साहाय्यक आत आला. ‘हं, कर सुरुवात’ असे म्हणताच तो बोलू लागला. ‘‘पत्रकार उलटसुलट प्रश्न विचारून तुम्हाला सापळ्यात अडकवू शकतात. त्यामुळे तुम्ही कॅमऱ्यासमोर चर्चेसाठी बसले की उलट प्रश्न आल्याबरोबर आपला एक सहकारी तुम्हाला कॅमऱ्याच्या मागून सापळ्याची प्रतिकृती दाखवेल ती बघितली की ‘नो कामेंट’ किंवा ‘नेक्स्ट क्वेश्चन’ म्हणायचे. एखादा अडचणीचा प्रश्न आला व तुम्हाला नेहमीसारखा संताप आला तर तो दाबण्यासाठी लवंग व वेलचीची डबी जवळ ठेवा. अडचणीच्या प्रश्नामुळे नकारात्मक भाव चेहऱ्यावर येताना दिसले की अत्तर लावलेला रुमाल चेहऱ्यावरून हळूच फिरवायचा. त्याचा सुगंध तुम्हाला प्रसन्न करेल. या संपूर्ण काळात माध्यमेच नाही तर इतर कुठेही ‘ऑफ द रेकार्ड’ बोलायचे नाही.

हेही वाचा >>> संविधानभान : शुभ सुख चैन की बरखा बरसे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री मित्रांसमवेतच्या ‘सोनेरी’ गप्पांमध्ये तुम्ही पूर्ण ‘भडास’ काढता. ही सवय तुटावी म्हणून टेपरेकार्ड आणलाय. तो सुरू आहे याची जाणीव मी सतत करून देईन. माध्यमचर्चेत आवाजातील चढउतार बरोबर राहायला हवा. अनेकदा अकारण तुमचा आवाज चढून चिरका होतो. त्यामुळे जिथे तो चढवायचा असेल तिथे कार्यकर्त्याशी बोलतो असे समजून बोला व जिथे कमी करायचा असेल तिथे वहिनीसाहेबांशी बोलताहोत हे समजून व्यक्त व्हा. आवाज चांगला राहावा यासाठी रोज पाच हजार वेळा ‘ओम’चा मोठ्याने जप करा. अघळपघळ बोलून माध्यमासमोर होणारी पंचाईत टाळण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना विश्वगुरूंची प्रतिमा नजरेसमोर आणा. तुम्ही आयुष्यभर पांढरे कपडे घातलेत. आता ते अजिबात नको. तुमच्यासाठी मी भगवे, लाल, पिवळे, जांभळे व आकाशी रंगाचे सदरे आणलेत. एक रंगीबेरंगीसुद्धा आहे. आता तेच घालण्याची सवय करा, जेणेकरून कॅमऱ्यासमोर उठून दिसाल. विरोधकांचे म्हणणे ऐकूनच घ्यायचे नाही अशी सवय तुम्हाला गेल्या दहा वर्षात जडली आहे. कुणी प्रतिवाद करू लागले की तुम्ही संतापता. आता ही सवय मोडण्यासाठी रोज रात्री झोपताना निलगिरीचे तेल डोक्याला लावा. यामुळे डोके शांत राहील व सकाळी लवकर जाग आल्याने पक्षनिर्देशानुसार अकरा ते एक या वेळात पत्रपरिषदसुद्धा घेता येईल. शेतकरी व बेरोजगारी या दोन मुद्द्यावर तुम्हाला पक्षाचे धोरण मांडायचे आहे. त्यासाठी आजवर किती आत्महत्या झाल्या व किती पेपर फुटले याची आकडेवारी मी आणली आहे. ती जवळ…’’ साहाय्यकाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच दादासाहेब जोरात ओरडले, ‘चल, निघ इथून’ मग एक फोन करून त्यांनी कुणाला तरी जोरात सांगितले, ‘हे माध्यमचर्चेचे काम कुणा दुसऱ्याकडे सोपवा हो!’