‘हे विघ्नहर्त्या, आता किमान दोन तास तरी कोणतीही दुर्घटना घडू देऊ नकोस’ गणरायाकडे अशी प्रार्थना करत नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते वांद्र्याला भेटले तेव्हा पहाटेचे तीन वाजलेले. हे चौघेही तसे शाळकरी मित्र. नेत्यांचे स्वीय सहाय्यक व्हायचे हे सर्वांनी आधीपासून ठरवलेले. ही नोकरी मिळवण्यासाठीसुद्धा खूपच चढाओढ असते हे लक्षात आल्यावर यातल्या एकाने ‘आपत्ती प्रसिद्धी व्यवस्थापनाचे’ खूळ एका बड्या नेत्याच्या डोक्यात घातले. त्याचे बघून इतरांनी तोच मार्ग स्वीकारला व चौघांना लगेच नोकरी मिळाली.
अलीकडे अनियंत्रित पावसामुळे दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कामाचा बोजा वाढलेला. तरीही ठरलेली भेट व अनुभवाधारित गप्पा चुकवायच्या नाहीत म्हणून ते आज भेटले. वाफाळता चहा घेत पहिला म्हणाला, ‘अरे, काय ती मोनोरेलची घटना. पडद्यावरची दृश्ये बघून थरकाप उडाला पण इकडे आमच्या साहेबांचा लकडा सुरूच. ताबडतोब गाडीतल्या प्रवाशांचे नंबर मिळव व बोलणे करून दे. अखेर नियंत्रण कक्षाला ज्याने पहिला फोन केला त्याचा नंबर तेथील अधिकाऱ्यांना दरडावून घेतला.
त्यावर फोन करत साहेब बोलणार आहेत, टीव्हीवर दिसाल असे सांगताच तो प्रवासी जाम भडकला. इकडे आम्ही मरणाच्या दारात व तुम्हाला प्रसिद्धी सुचते काय असे म्हणाला. शेवटी बाबापुता करून त्याला समजावले व बोलणे करून दिले. तरी साहेबांचे समाधान होईना. त्या सीएमओपेक्षा आपण जास्त सक्रिय दिसायला हवे. आणखी फोननंबर मिळव असा लकडा सुरू झाला. ते मिळवून प्रवाशांशी बोलताना प्रत्येकाच्या शिव्या खाव्या लागल्या. नशीब की त्यातल्या एकानेही साहेबांना नाही दिल्या. कोकणात दरड कोसळली तेव्हाही असाच त्रास झाला.’
मग दुसरा म्हणाला, ‘अरे, ही घटना घडली तेव्हा मी व साहेब साचलेल्या पाण्याची पाहणी करून मलबार हिलला परतत होतो. कळताच आम्ही गाडी वळवली पण जाममध्ये फसलो. मग मी प्रत्येक चॅनलला फोन करून साहेबांचा बाइट घ्या म्हणून विनवणी सुरू केली. त्यातल्या केवळ एकाने पट्टी चालवली. प्रयत्न करूनही प्रसिद्धी मिळत नाही म्हणून साहेब फार वैतागले. तुझे साहेब प्रवाशांशी बोलताहेत, मग तेच करण्यात काय हशील म्हणून आम्ही त्यांच्या कुटुंबांचे नंबर मिळवले. त्यांना धीर देतानाची चित्रफीत गाडीतच शूट केली व सर्वांना पाठवली पण तीही एकाच चॅनलने दाखवली. घटनास्थळी पोहोचू शकलो नाही म्हणून चिडलेल्या साहेबांनी वाहतूक उपायुक्ताला उद्या कार्यालयात बोलावले आहे.’
मग तिसऱ्याला हुरूप आला. ‘आम्ही मराठवाड्यात होतो. पावसाने उडवलेल्या हाहाकाराविषयी कळताच साहेबांनी विकास आढावा बैठक अगदी पाच मिनिटांत गुंडाळली. अशा परिस्थितीत हे फुटेज कोण दाखवणार, असे म्हणत ते पूरबाधित गावांकडे निघाले. नावेत बसून प्रवास करताना नेमका कॅमेरा खराब झाला. मग पुन्हा परतलो. अधिकाऱ्यांनी धावपळ करून नवा आणला. त्याने साहेबांचा नावप्रवास शूट केल्यावरच ते शांत झाले. ज्या गावात गेलो तिथले बाधित इतके चिडले होते की साहेबांना त्यांच्या खांद्यावर हातही ठेवू देईनात.
अखेर अधिकाऱ्यांनी धमकावल्यावर ते तयार झाले. सर्व चॅनल्सनी बातमी ठीक दाखवली त्यामुळे साहेब खुशीत होते.’ मग चौथा हिरमुसल्या चेहऱ्याने म्हणाला, ‘अरे, पावसामुळे सर्व बैठका रद्द झाल्याने आमचे साहेब बंगल्यातून बाहेर पडायलाच तयार नव्हते. मी कळवळून सांगितले, हीच प्रसिद्धीची योग्य संधी पण ते ऐकेचनात. एआयची मदत घेऊन घरीच एखादा व्हिडीओ शूट कर म्हणाले. शेवटी केला. काय करणार? ते काही नाही. आता माझ्यासाठी दुसरा साहेब शोधा यार!’ हे ऐकून तिघेही त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिले.