भारतीय पॅराग्लायडिंग क्षेत्रातील महत्त्वाचे नाव असलेले आणि आजवर ४० आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व केलेले विजय सोनी (५३) यांचे नुकतेच निधन झाले. नॉर्थ मॅकेडोनिया येथे ग्लायडिंगच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातात त्यांनी प्राण गमावले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या पायलट्ससह भारतीय पॅराग्लायडिंग विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
पुण्याचे रहिवासी असलेल्या सोनी यांचा पॅराग्लायडिंगच्या क्षेत्रातील प्रवास १९९०मध्ये सुरू झाला. १९९६साली त्यांनी रीतसर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध प्रशिक्षक राजन जुवेकर यांच्याकडे त्यांनी या खेळाचे धडे गिरवले आणि २००० पासून ते देशविदेशांतील स्पर्धांत सहभागी होऊ लागले. तेव्हापासून आजवर त्यांनी अनेक स्पर्धांत भारताचा ठसा उमटवला आहे. २००० साली ६४ किलोमीटरची क्रॉस कंट्री फ्लाइट यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले. पुढे त्यांनी १०० किलोमीटरच्या एफएआय ट्रायअँगल स्पर्धेतही यश प्राप्त केले. त्यांनी भारतीय पॅराग्लायडिंग क्षेत्राला ‘अॅक्युरसी पॅराग्लायडिंग’ची ओळख करून दिली आणि २०१६ साली भारताचे आंतरराष्ट्रीय ‘अॅक्युरसी कॉम्पिटिशन’मध्ये प्रतिनिधित्व करून इतिहास रचला. ‘क्रॉस कंट्री’ या ग्लायडिंगला वाहिलेल्या मासिकाने दोनदा दखल घेतलेले ते एकमेव भारतीय पायलट आहेत. ‘लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्येही त्यांच्या नावाची नोंद आहे.
पॅराग्लायडिंग क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत असतानाच त्यांनी या क्रीडा प्रकारात प्रशिक्षक म्हणूनही नाव कमावले. सुरुवातीला ‘ब्रिटिश हँग ग्लायडिंग अँड पॅराग्लायडिंग असोसिएशन’चे प्रशिक्षक असलेले भारतातील पहिले पॅराग्लायडिंग प्रशिक्षण केंद्र- ‘हार्ले इंडिया पॅरास्कूल’मध्ये प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. पुढे २०१७मध्ये त्यांनी ‘ऑरेंज लाइफ’ नावाने स्वत:चे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग क्षेत्रात भारताचे नाव प्रस्थापित करण्यासाठी उत्तमोत्तम पॅराग्लायडर्स घडविणे हे त्यांचे ध्येय्य होते. त्यांनी हजारो इच्छुकांना आणि भारतीय सैन्य दलातील जवानांनाही पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण दिले.
२००० ते २००२ अशी सलग तीन वर्षे त्यांनी कामशेतमध्ये या खेळाच्या स्पर्धा भरविल्या. त्यातून प्रेरणा घेऊन हिमाचल प्रदेश सरकारनेही २००२पासून स्वत:ची पॅराग्लायडिंग स्पर्धा सुरू केली. विजय उत्तम पॅरामोटर पायलट आणि प्रशिक्षकही होते. २००१मध्ये भारतात झालेल्या पहिल्या पॅरामोटर स्पर्धेत ते पहिले आले होते. त्यांनी अनेक स्पर्धांत पंच, संचालक आणि तांत्रिक सल्लागार म्हणून भूमिका बजावली. अपघात झाला तेव्हा ते ‘फ्लायमास्टर ओपन पॅराग्लायडिंग’मध्ये सहभागी होण्यासाठी नॉर्थ मॅकेडोनियाला गेले होते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विविध स्पर्धांत आपल्या चमूसह सहभागी होण्याचा त्यांचा मानस होता.
भारतात साहसी खेळांची संस्कृती अलीकडच्या काळात विकसित होऊ लागली आहे. पॅराग्लायडिंगसारखा क्रीडाप्रकार विकसित होण्यासाठी आवश्यक भूरचना, सुविधा, प्रशिक्षण, सुरक्षेची साधने ही बहुसंख्यांना सहज उपलब्ध होणे कठीण. शिवाय या खेळाभोवती अद्याप प्रसिद्धीचे वलयही निर्माण झालेले नाही. अशा स्थितीत नेटाने पाठपुरावा करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे स्थान उंचावणाऱ्या विजय सोनी यांचे अपघाती निधन हे न भरून निघणारे नुकसानच!