भारतीय युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने मध्यंतरी जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला सहा महिन्यांत तिसऱ्यांदा हरवल्यामुळे त्याच्या नावाची चर्चा जगभर सुरू असणे अतिशय साहजिक. प्रज्ञानंदच्या बरोबरीने आणखी एका युवा बुद्धिबळपटूने अलीकडच्या काळात छाप पाडली, त्याचे नाव डी. गुकेश. चेन्नईत अलीकडे झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या कनिष्ठ संघाकडून पहिल्या बोर्डवर खेळताना गुकेशने भल्याभल्यांना धूळ चारली. या दोघांच्या बरोबरीने आणखी एक युवा बुद्धिबळपटू गेली काही वर्षे सातत्याने अप्रतिम कामगिरी करत आहे. त्याचे नाव अर्जुन एरिगेसी. पारंपरिक प्रकारात प्रज्ञानंदपेक्षा सरस आणि अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारांमध्ये गुकेशपेक्षा सरस असलेला हा तेलंगणातील बुद्धिबळपटू विशेषत: गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक मातबर बुद्धिबळपटूंना हरवत नावारूपाला आला. त्याने गुरुवारी अबुधाबी येथील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेतील निर्भेळ यश आणि ऑलिम्पियाडमध्येही त्याने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे अर्जुनचे विद्यमान एलो मानांकन (लाइव्ह रेटिंग) २७२४ झाले असून तो जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानावर आला आहे. त्याच्या पुढे विश्वनाथन आनंद (२७५६) आणि डी. गुकेश (२७२७) हे दोनच भारतीय बुद्धिबळपटू आहेत. गेल्या सव्वा महिन्यातील कामगिरीमुळे अर्जुनने पेंटाल्या हरिकृष्ण (२७१६) आणि विदित गुजराथी (२७१०) यांना मागे टाकले. सध्या त्याचे रेटिंग २६८९ असले, तरी नवीन महिन्याच्या सुरुवातीस त्यात बदल केला जाईल. बहुधा जगातील इतर कोणत्याही बुद्धिबळपटूने इतकी धक्कादायक प्रगती केलेली नाही. या वर्षांच्या सुरुवातीस नेदरलँड्समध्ये टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा झाली, त्यात चॅलेंजर्स म्हणजे दुय्यम वा कनिष्ठ गटात अर्जुन एरिगेसी सहभागी झाला, त्या वेळी त्याचे रेटिंग होते २६३२. ती स्पर्धा त्याने आरामात जिंकली. सात महिन्यांमध्ये त्याने जवळपास १०० एलो गुणांची केलेली कमाई थक्क करणारी ठरते. यातही वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे, गेल्या वर्षी तीन महत्त्वाच्या जलद (रॅपिड) स्पर्धामध्ये छाप पाडली होती. त्या वेळी एक चांगला रॅपिड बुद्धिबळपटू भारताला मिळाला, असेच वाटत होते. परंतु पारंपरिक प्रकारातही त्याने विशेषत: या वर्षी विलक्षण हुन्नर दाखवलेली दिसते. डिसेंबर महिन्यात अनेक मातबरांना नमवून अर्जुनने टाटा स्टील रॅपिड स्पर्धा जिंकली होती. म्हणजे पाठोपाठच्या महिन्यांत त्याने दोन टाटा स्पर्धा जिंकल्या, जलद आणि पारंपरिक किंवा क्लासिकल प्रकारात. ही बाब अर्जुनचे बहुपैलुत्व सिद्ध करणारी ठरते. प्रज्ञानंद, गुकेश आणि अर्जुन या सध्याच्या चर्चेतल्या त्रिकुटात अर्जुन सर्वात ‘सीनियर’ म्हणजे १८ वर्षांचा! प्रज्ञानंद आणि गुकेश अनुक्रमे १७ आणि १६ वर्षांचे आहेत. पटावरील त्याचा वावर अविचल आणि निर्धारपूर्वक असतो. समोर जगज्जेता कार्लसन असो किंवा आणखी कोणी असो, अर्जुनच्या चाली त्याची तयारी आणि आत्मविश्वास दर्शवणाऱ्या असतात. गेल्या काही आठवडय़ांमध्ये अमेरिकेचा लिनिएर डॉमिंगेझ पेरेझ किंवा अगदी परवा चीनचा वँग हाओ या रेटिंगमध्ये त्याच्यापेक्षा किती तरी वरचढ असलेल्या बुद्धिबळपटूंना त्याने मात दिली. करोनाकाळात निव्वळ ऑनलाइन स्पर्धा होत, त्या वेळी अनेक बडय़ा बुद्धिबळपटूंशी पाठोपाठच्या स्पर्धामध्ये खेळण्याचा फायदा अनेक युवा भारतीय बुद्धिबळपटूंना झाला. अर्जुन त्यांपैकीच एक. मात्र प्रत्यक्ष पटावरील खेळांमध्येही त्याच प्रकारचा धडाका अर्जुन दाखवत आहे, ही दिलासादायक बाब ठरते.