कला-इतिहासाचा ठेवा जिथे पाहायला मिळतो अशा संग्रहालयांकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन पाश्चात्त्यांइतका प्रगल्भ का नसतो, संग्रहालयांतली गर्दी वाढण्यासोबत आपल्याकडे गोंगाट, अस्वच्छताही का वाढते? ही जर समस्या मानली तर ती भारतीयांपुरती नसून दक्षिण आशियाचीच आहे का?- आणि भारतीय कलेतिहासाबद्दल भारतीयांना ममत्व वाटावे- उदाहरणार्थ लघुचित्रांच्या शैली मुघल असोत की राजपूत की दख्खनी- त्या साऱ्याच चित्रांचा आदर करता यावा, यासाठी काय करावे लागेल? अशा प्रश्नांचा विचार करणाऱ्या डॉ. कविता सिंग यांचे ३० जुलै रोजी झालेले निधन दीर्घ, दुर्धर आजारानंतर असले, तरी त्या आणखी काळ कार्यरत राहायला हव्या होत्या असे अनेकांना वाटले. जेएनयूत ‘स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड अॅस्थेटिक्स’ हे ज्ञानकेंद्र सुरू झाले, तेव्हापासून तिथे अध्यापन करणाऱ्यांपैकी एक, हा कविता सिंग यांचा अलीकडच्या काळातील लौकिक. पण देश-विदेशांतील कलेतिहासाच्या अभ्यासकांना लघुचित्रांच्या इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या संशोधक म्हणून त्या माहीत होत्या.
एकेका लघुचित्राचे वर्णन करायचे, हा तोवरचा सर्वमान्य खाक्या. तौलनिक अभ्यास होई, तो केवळ शैलींमधल्या वैशिष्टय़ांचा. हा खाक्या बदलून, आशयाचा आणि दृश्यवैशिष्टय़ांचा तौलनिक अभ्यास कविता सिंह यांनी मांडला, हे त्यांचे नवेपण ठरले. १९६४ साली जन्मलेल्या कविता यांनी १९८४ मध्ये दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजातून इंग्रजी साहित्यात बीए करण्यापूर्वीच आनंद कुमारस्वामी यांचे ‘द डान्स ऑफ शिवा’ हे पुस्तक वाचले होते. दृश्याचा विचार जर इतक्या विविधांगीपणे करण्याची मुभा ‘कलेतिहास’ हे क्षेत्र देते आहे, तर तेच मी निवडेन, असे पक्के ठरवूनच त्या बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलेतिहास विभागात पोहोचल्या. तिथे गुलाममोहम्मद शेख यांच्यासारखे चित्रकारही शिकवत. कविता यांचा पदव्युत्तर पदवीसाठीच्या लघुप्रबंधाचा विषय भारतीय कला-संग्रहालयांतील ताणेबाणे अशा आशयाचा होता. पण पीएच.डी. संशोधनासाठी चंडीगडच्या पंजाब विद्यापीठात, भारतीय चित्र-परंपरांचे अव्वल अभ्यासक बी. एन. गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कविता यांनी भारतीय लघुचित्रांशी संबंधित विषय निवडला. डॉक्टरेट १९९६ मध्ये मिळवल्यानंतर काही काळ दिल्ली स्कूल ऑफ आर्टमध्ये अर्धवेळ अधिव्याख्यात्या होत्या (आजतागायत अनेक सरकारी कला महाविद्यालयांत कलेतिहासासाठी अर्धवेळ अधिव्याख्यातेच असतात). पण ‘जेएनयू’मध्ये येण्यापूर्वी कविता सिंग यांनी ‘मार्ग’ या भारतीय कलापरंपरांच्या इतिहासाला वाहिलेल्या एकमेव गंभीर त्रमासिकाच्या मार्गदर्शक मंडळावरही काम केले. ‘जेएनयू’मध्ये त्यांचे कार्यक्षेत्र ‘स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड अॅस्थेटिक्स’पुरते मर्यादित राहूच शकणार नव्हते. एकीकडे दिल्लीकडे विदेशांतून नैमित्तिक भेटींस येणाऱ्या कला-अभ्यासकांचा वाढता ओघ आणि त्यांना भारतीय नजरेतून मार्गदर्शन करण्याची गरज, तर दुसरीकडे ‘जेएनयू’त येणारे दबाव वेळीच झुगारण्याची आवश्यकता या दोन्ही वाढीव अपेक्षा कविता सिंग यांनी पूर्ण केल्या. भारतीय कलापरंपरेतून मुघल लघुचित्रांचे महत्त्व कमी केले जाईल, अशी भीती अभ्यासकांना वाटत असताना, या अभ्यासकांच्या मार्गदर्शक ठरणाऱ्या डॉ. सिंग यांचे नसणे क्लेशदायी आहे.