डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात आयोजित केलेल्या धम्म दीक्षा सोहळय़ातील अखेरच्या साक्षीदार अशी ओळख असलेल्या डॉ. कुमुदिनी पावडे निवर्तल्या. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हा त्या केवळ १८ वर्षांच्या होत्या. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा आंबेडकरांनी दिलेला संदेश त्यांनी आयुष्याच्या अखेपर्यंत अमलात आणला. संस्कृत भाषेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर येथील शासकीय कला विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापकी करणाऱ्या पावडेंनी केवळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्दच घडवली नाही तर त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव व्हावी यासाठी भरपूर परिश्रम घेतले. त्या मूळच्या सोमकुंवर. त्यांनी आंतरजातीय विवाह केला तो बहुजन समाजातील मोतीराम यांच्याशी. तेव्हा या विवाहाला प्रचंड विरोध झाला. मोतीरामजी गांधीवादी तर त्या आंबेडकरवादी. या दोन्ही महनीय व्यक्तिमत्त्वांतील वाद सर्वश्रुत. त्याची सावली या दोघांनीही कधी संसारावर पडू दिली नाही. म्हणूनच धंतोलीतील पावडेंचे घर या दोन्ही महापुरुषांच्या अनुयायांसाठी हक्काचे ठरले. कुमुदिनींनी किमान ५०० तरुण-तरुणींचे आंतरजातीय विवाह स्वत: पुढाकार घेऊन लावून दिले. या कामात अनेकदा त्यांना रोषाला सामोरे जावे लागले, पण त्या डगमगल्या नाहीत. निराधार, गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्या अखेपर्यंत झटल्या. त्यांच्या घरी अशा मुलांचा कायम राबता असायचा. यातूनच त्यांना जवाहर रात्रशाळेची कल्पना सुचली.
कष्ट करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजही ही शाळा आदर्श म्हणून ओळखली जाते. फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा पुढे नेत त्यांनी अनेक सामाजिक चळवळींत सक्रिय सहभाग नोंदवला. सीमा साखरे, लीलाताई चितळे व कुमुदिनी पावडे असे त्रिकूट विदर्भात अनेक वर्ष चळवळीत सक्रिय होते. महिलांचा प्रचंड सहभाग असलेला नागपुरातील बलात्कारविरोधी मोर्चा तेव्हा राज्यभर गाजला होता. त्यामागे मेहनत होती ती या तिघींची. बंगळूरुच्या मनोरमा रुथ यांच्या मदतीने त्यांनी देशातील दलित महिलांचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ दलित विमेन्सची स्थापना केली. १९७० ते ९० च्या दशकात या संघटनेने देशभरात अनेक ठिकाणी मेळावे घेतले. महाराष्ट्रात अस्मितादर्श चळवळ व संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. यातूनच त्यांनी ‘बायजा लेखक वाचक मेळावे’ घेणे सुरू केले. दलितांवरील अन्यायाची चर्चा होते, पण त्यातील स्त्रियांचे प्रश्न कायम दुर्लक्षित राहतात हे लक्षात घेऊन त्यांनी ‘बायजा’ चळवळ पुढे नेली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही त्या अखेपर्यंत सक्रिय होत्या. १२ देशांत झालेल्या वेगवेगळय़ा परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांचे ‘अंत:स्फोट’ हे आत्मचरित्रवजा निवेदनाचे पुस्तक बरेच गाजले. स्त्रीमुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या कुमुदिनी अन्यायग्रस्त स्त्रीच्या मदतीसाठी धावून जायच्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पण प्रसिद्धीपासून त्या कायम दूर राहिल्या. सामाजिक विषमता दूर झाल्याशिवाय समाज शिक्षित झाला असे म्हणता येणार नाही. त्यासाठी नुसते बोलून चालणार नाही तर कृती करायला हवी, असे त्या प्रत्येक व्यासपीठावरून सांगत. चळवळ हाच श्वास यावर गाढा विश्वास असणाऱ्या कुमुदिनींच्या निधनाने नागपूरने एक आदरयुक्त चेहरा गमावला आहे.



