scorecardresearch

Premium

व्यक्तिवेध: रोझ लेके

‘वीर्काव जागतिक आरोग्य पारितोषिका’ची रक्कम जरी पाच लाख युरो- म्हणजे सुमारे चार कोटी ३८ लाख ७९ हजार रुपये- असली आणि हा पुरस्कार कारकीर्दीचा गौरव करणारा असला तरी यंदा तो रोझ लेके यांना मिळाल्याची प्रसिद्धी फारशी झाली नाही, याची कारणे दोन.

Vyaktivedh Rose Lake Virkaw World Health Prize Award Doctor Rudolph Virkaw Foundation
व्यक्तिवेध: रोझ लेके

‘वीर्काव जागतिक आरोग्य पारितोषिका’ची रक्कम जरी पाच लाख युरो- म्हणजे सुमारे चार कोटी ३८ लाख ७९ हजार रुपये- असली आणि हा पुरस्कार कारकीर्दीचा गौरव करणारा असला तरी यंदा तो रोझ लेके यांना मिळाल्याची प्रसिद्धी फारशी झाली नाही, याची कारणे दोन. पहिले असे की, पेशीविज्ञानाचा वापर समाजासाठी करू पाहणारे प्रख्यात जर्मन डॉक्टर रुडॉल्फ वीर्काव (१८२१-१९०२) यांच्या नावे चालवल्या जाणाऱ्या प्रतिष्ठानातर्फे २०२२ पासूनच हे पारितोषिक सुरू करण्यात आले आणि यंदा त्याचे अवघे दुसरेच वर्ष. दुसरे कारण कदाचित असेही सांगता येईल की, आफ्रिकेत- कॅमेरूनमध्ये राहून जगभराच्या मलेरियामुक्तीसाठी झटणाऱ्या रोझ लेके यांना पुरस्कार आणि मानमरातब नवे नाहीत. त्यांच्या १९७९ पासूनच्या कारकीर्दीला जागतिक आरोग्य संघटनेसह अनेकांची दाद मिळाली आहेच आणि पुरस्कार मिळवण्यापेक्षा काम पुढे जाणे त्या महत्त्वाचे मानतात. वीर्काव पुरस्काराचा सोहळा गेल्या शनिवारी झाला, तेव्हाही याचे प्रत्यंतर आले. मलेरिया लशीचा प्रसार हे ध्येय न विसरण्याची अपेक्षा याही निमित्ताने त्यांनी व्यक्त केलीच, पण ‘मुली, तरुणी मोठय़ा संख्येने आरोग्य-संशोधन क्षेत्रात येताहेत, हा आनंद वाढत राहावा’ असे म्हणणाऱ्या रोझ लेके यांची छोटेखानी मिरवणूकच आफ्रिकी वंशाच्या महिला शास्त्रज्ञांनी या सोहळय़ात काढली, हे पुरस्काराइतकेच मोठे होते! त्यांना २०१८ मध्ये कॅमेरून मेडिकल कौन्सिलतर्फे ‘क्वीन मदर ऑफ द कॅमेरूनियन मेडिकल कम्युनिटी’ हा किताब मिळाला होताच पण दक्षिण आफ्रिकेतून प्रसारित होणाऱ्या ‘आफ्रिका मिरर’ने त्यांना ‘क्वीन ऑफ इम्युनॉलॉजी’ म्हटले होते, याची आठवण देणारी ती मिरवणूक होती.

‘मी सहा वर्षांची असताना माझ्या फुप्फुसाला सूज आली, ते गळू होतं आणि शस्त्रक्रियेनंच काढावं लागणार होतं. या आजाराचं मला जे बालसुलभ कुतूहल होतं, ते आईवडील आणि डॉक्टरांनीही न कंटाळता शमवलं. तेव्हापासून आरोग्य-विज्ञानातला माझा रस वाढत गेला’ असे ‘ट्रेण्ड्स इन पॅरासाइटॉलॉजी’तील मुलाखतीत त्या म्हणतात. त्यांचे वडील मुख्याध्यापक होते, मुलीला शिक्षण-संधी नाकारायच्या नाहीत हा बाणा त्यांची जपल्यानेच पुढे शिष्यवृत्तीवर अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात रोझ शिकल्या आणि मायदेशी परतल्या. १९७९ पासून त्यांनी मलेरिया निर्मूलनावर काम सुरू केले, गर्भवतींच्या मलेरिया-बाधेनंतरचे परिणाम यावर विशेष संशोधन केले. मलेरिया-प्रतिबंधक लशीच्या संशोधनाला मार्गदर्शन केले. १९८५ ते २०१३ पर्यंत त्या कॅमेरूनमधील याउण्डे विद्यापीठातील संसर्गजन्य रोग-संशोधन विभागाच्या प्रमुख होत्या. अन्य देशांतही पोलिओ निर्मूलनाचे काम त्यांनी तडीस नेले. या काळातही जागतिक आरोग्य संघटनेतील समित्यांवर त्या कार्यरत होत्याच, पण  २०१९ मध्ये जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले, कारण जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया निर्मूलनाचा कार्यक्रम जाहीर करून त्यासाठीच्या सल्लागार-गटावर लेके यांची नियुक्ती केली. अलीकडेच फेब्रुवारी २०२३ मध्ये त्या ‘गावि’ या वैश्विक लस-पुढाकार संघटनेच्या मलेरियाविषयक प्रमुख सल्लागारपदी आल्या. वयपरत्वे प्रत्यक्ष संशोधनात त्या नसल्या, तरी त्यांचे मार्गदर्शन संशोधनातच नव्हे तर जीवनसंघर्षांसाठीही अनेकांना उपयुक्त ठरते आहे.

Bharat Ratna
विश्लेषण : ‘भारतरत्न’च्या मागे फायद्याचं राजकारण? या पुरस्काराचा इतिहास नेमका कसा राहिला आहे? जाणून घ्या…
Raj Thackeray on Bharatratna Award
“भाजपाने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर…”, भारतरत्न पुरस्कारांवरून राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
bharatratna awards
नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कुणाकुणाला भारतरत्न पुरस्कारनं गौरवण्यात आलं? त्यामागील सरकारची भूमिका काय?
ram_mandir
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत धार्मिक पर्यटन वाढल्याने २ लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता, दरवर्षी ५ कोटी पर्यटक येणार

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vyaktivedh rose lake virkaw world health prize award doctor rudolph virkaw foundation amy

First published on: 20-10-2023 at 01:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×