‘‘महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या भवितव्याची व्यापक अशी मांडणी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिभासंपन्न मनाने चालविली. इथल्या माणसाच्या सर्जनशीलतेला प्रेरक वातावरण निर्माण हावे म्हणून साहित्य आणि निरनिराळ्या भौतिक व सामाजिकशास्त्रांमध्ये प्रवीण असलेल्या नागरिकांचे नेतृत्व लाभावे आणि हे नेतृत्व मातृभाषेतच सामान्य माणसाला ज्ञान-विज्ञान संपन्न करू शकेल, तरच महाराष्ट्र विकासाच्या अनंत मार्गांवर वेगाने गतिमान होऊ शकेल, असा यशवंतराव चव्हाण यांचा साहित्य संस्कृती मंडळ स्थापनेमागे उद्देश होता. त्यांनी मला विद्वान कार्यकर्त्यांचा एक गट म्हणजे मंडळ सुचवा असे सांगितले.

मी भौतिकशास्त्र, समाजशास्त्र आणि ललित कला, साहित्य क्षेत्रातील १६ माणसांचे मंडळ सुचविले. …. त्यानुसार निरनिराळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करणे, त्यांच्यातर्फे कार्यक्रम आखणे, आदी कामे प्रारंभी हाती घेण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानसंबंधी त्रोटक माहिती मराठीत उपलब्ध आहे. ती लिहिणारी मराठी भाषी माणसे इंग्रजीत लिहितात. मराठीत त्यांनी लेखन कार्य करावे, असा प्रयत्न केला. ७५ पेक्षा अधिक ज्ञान-विज्ञान शाखांत असे साहित्य निर्माण होण्याची गरज लक्षात आली. त्यानुसार महाराष्ट्रातील तंत्रज्ञ मंडळींना आवाहन करण्यात आले.

मानवी ज्ञानाच्या शाखांमध्ये जे नवे ज्ञान आज आले आहे, ते सर्व ज्ञान मराठीत एकत्रित मांडण्यात यावे, यासाठी मराठी विश्वकोश हा महत्त्वाचा प्रकल्प साहित्य संस्कृती मंडळाने १९६२ मध्ये हाती घेतला. महाराष्ट्रातील सुशिक्षित, साहित्यिक, विद्यापीठीय विद्वानांना भारतातील १४ भाषांत (त्यावेळी राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात १४ भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता होती. आज ती संख्या २२ झाली आहे.) जी काही सारखी नवनिर्मिती होते, त्यांची माहिती नसते. म्हणून ‘आंतरभारती’चा कार्यक्रम आखण्यात आला. या भाषांचा अभ्यास मराठीतून करता यावा म्हणून ‘द्विभाषी कोश’, ‘भाषा प्रवेश’, ‘साहित्य परिचय’ अशा तीन प्रकारच्या साहित्य निर्मितीस प्रारंभ झाला.

सन १९६२ मध्ये यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्यावर साहित्य संस्कृती मंडळाचा हा कार्यक्रम सर्वश्री मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील प्रभृती मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा देत चालू ठेवला. पैकी वसंतराव नाईक यांच्या (१९६३ ते १९७५) काळात माजी मुख्य सचिव एल. जी. राजवाडे यांच्या एकसदस्य समितीने साहित्य संस्कृती मंडळाचे कार्य कितपत उपयुक्त आहे, यावर शंका येऊन अभ्यास केला; पण तो अहवाल पुढे कधीच आला नाही. या समितीने मंडळाच्या कार्याची भलावणच केली होती, असे माझ्या लक्षात आले.’’

या आठवणी सांगून तर्कतीर्थ एक इशाराही देतात- ‘‘खरे तर या मंडळाच्या कार्यकक्षा पहिल्या योजनेप्रमाणे विस्तारायला पाहिजे होत्या; पण विस्तारण्याऐवजी अलीकडे (१९८८) संकुचित होत गेलेल्या दिसतात. (सन १९८० ला मंडळाचे विभाजन झाले व साहित्य संस्कृती आणि मराठी विश्वकोश, अशी दोन स्वतंत्र मंडळे स्थापन झाली.) याचे कारण दर तीन वर्षांनी जे मंडळ नेमले जाते, त्या मंडळाचे सदस्य व अध्यक्ष यांना मूळचे कार्याचे विशिष्ट उद्देश पटलेले असावेत तसे पटलेले दिसत नाहीत.

महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या दृष्टीने ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात प्रभावी असा कार्यक्रम मूर्त रूपात आला नाही, तर माध्यमिक व उच्चशिक्षण या क्षेत्रात मराठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रगती होणे अशक्य होईल. कारण, इंग्लिश भाषेचे शिक्षण त्यांना चांगल्यारीतीने मिळू शकेल, असे वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात बहुजन असलेला समाज हा विचार करता शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला राहण्याचा धोका मोठा आहे.’’

drsklawate@gmail.com