लोकसभेच्या निवडणुकीची लढाई  महाराष्ट्रातून  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करूनच लढणार, हे नक्की असले तरी  जागावाटपावरून या पक्षांत खणाखणी सुरू झाली आहे. जागावाटप पूर्वीप्रमाणेच की यंदा तरी राज्यातील काँग्रेसनेत्यांच्या इच्छेप्रमाणे काँग्रेसला जादा जागांवर संधी मिळणार, हे नक्की नाही. दोन्ही पक्षांनी  प्रतिष्ठेची केलेल्या या लढाईत काँग्रेस की राष्ट्रवादी एक पाऊल मागे घेणार, या प्रश्नाइतकेच शरद पवार यांची राजकीय खेळी नेमकी काय साधणार, हेही महत्त्वाचे आहे..
शरद पवार कोणती राजकीय खेळी खेळतात याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. ते समजेपर्यंत बराच विलंब झालेला असतो. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवरूनही तसेच झाले. मे महिन्याच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीचा आढावा घेताना गेल्या वेळी लढलेल्या २२ जागांवरच राष्ट्रवादीचा दावा राहील, असे पवार यांनी जाहीर केले तेव्हाच काँग्रेसच्या नेत्यांना धोक्याचा अंदाज आला होता. २००४ मध्ये सोनिया गांधी या आघाडीसाठी पवार यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. २००९ च्या निवडणुकीपूर्वी आघाडीचा शेवटपर्यंत घोळ घालणाऱ्या राष्ट्रवादीने २०१४ च्या निवडणुकांसाठी आघाडी कायम ठेवण्याची घोषणा तीही निवडणुकीची धामधूम सुरू होण्यापूर्वी केली आणि जागावाटपाचे सूत्रही जाहीर केले तेव्हाच पवार यांच्या भविष्यातील खेळीचा अंदाज आला होता. गेल्या वेळी लढल्या तेवढय़ा २२ जागाच लढणार, पण काही जागांची अदलाबदल होऊ शकते, असेही पवार यांनी सूचित केले होते. काँग्रेसचे राज्यातील नेते खडबडून जागे होईपर्यंत राष्ट्रवादीने २२ जागा लढणार अशी हाळी गावकोसात सर्वत्रच दिली होती. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस २९ जागा लढेल, तर राष्ट्रवादीला १९ जागा सोडल्या जातील, असे सांगण्यास सुरुवात केली. पण राष्ट्रवादीचे नेते आमचे दिल्लीत ठरले आहे, आम्ही म्हणतो तेच खरे हे चित्र उभे करू लागले. कोणी किती जागा लढायच्या याचा घोळ सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात झालेल्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी २२ जागा लढणार, असे जाहीर केले. त्यावर हे संख्याबळ आम्हाला मान्य नाही असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष ठाकरे यांनी दिल्याने जागावाटपाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपावरून एकमत होत नसले तरी दुसरीकडे, भाजप-शिवसेना आणि रिपब्लिकन आठवले गटाचे नेते निदान जागावाटपाच्या चर्चेसाठी एकत्र बसणार आहेत.
विविध घोटाळे, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप, कोळसा खाणीवाटपावरून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात बसविण्याचा झालेला प्रयत्न यामुळे देशभरच काँग्रेसच्या विरोधात वातावरण आहे. सिंचन, राज्य सहकारी बँक अशा विविध प्रकरणांवरून राज्यात राष्ट्रवादी चांगलीच बदनाम झाली आहे. विविध जनमत चाचण्यांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही काँग्रेसचे हात दगडाखाली आहेत, अशा परिस्थितीत उभयतांना परस्परांची गरज आहे. दोन्ही काँग्रेसने वेगळी चूल मांडल्यास त्याचा विरोधकांनाच फायदा होऊ शकतो. राज्यात स्वबळावर लढण्याची ताकद पक्षाला अद्याप उभी करता आलेली नाही याची कबुली मध्यंतरी शरद पवार यांनीच दिली होती. पवार आणि काँग्रेस या दोघांनाही महाराष्ट्रात एकमेकांची गरज आहे. तरीही दोघेही एकमेकांच्या अंगावर गुरगुरत असतात.  
जागावाटपाची नवी दिल्लीत चर्चा झाली असून, सूत्रही ठरले आहे. काही जागांची अदलाबदल करण्याची चर्चा तेवढी बाकी आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे गेले तीन महिने सातत्याने करीत आहेत. काँग्रेस नेत्यांशी चर्चा करूनच हे ठरल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसमध्ये सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे गेल्याने चित्र बदलले आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शरद पवार यांचा योग्य मानसन्मान राखला. महागाई किंवा अन्य विषयांवरून काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी पवार यांच्या नावाने बोटे मोडली, पण पवार यांनी आपली ‘पॉवर’ दिल्लीश्वरांना नेहमीच दाखवून दिली. त्यातच सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि प्रफुल्ल पटेल यांची घनिष्ठ मैत्री. परिणामी दोन्ही पक्षांच्या आघाडीत काही बिनसले की दोन पटेलांमध्ये चर्चा होऊन बहुसंख्य वेळी राष्ट्रवादीला अनुकूल असाच निर्णय काँग्रेसकडून घेतला जायचा. सोनियांच्या तुलनेत राहुल गांधी यांना पवार यांच्याबद्दल फारशी आस्था नाही. नेमकी हीच बाब काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपावरून ताणाताणी निर्माण होण्यास कारणीभूत ठरली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्याच्या राजकारणात नेहमीच पवारविरोधी म्हणून ओळखले जातात. पवार यांच्या मनाप्रमाणे जागावाटप करण्यास पृथ्वीराजबाबांनी खोडा घातला आणि दिल्लीतून सूत्रे हलू लागली. काँग्रेस काही पूर्वीप्रमाणे दाद देत नाही याचा अंदाज आल्यानेच बहुधा पवार आणि पटेल यांनी काँग्रेसवर रोख धरला. राज्य सरकारच्या कारभाराला लकवा लागला की काय अशी शंका येते, असे विधान करीत शरद पवार यांनी पृथ्वीराजबाबांना डिवचले. लकव्याचा उल्लेख करताना निवडणुकीत बरोबर जायचे याची पुष्टीही पवार यांनी तेव्हा जोडली होती. पवार नेहमीच काँग्रेसच्या खोडय़ा काढीत असतात. सोनियांच्या जवळचे मानले जाणारे प्रफुल्ल पटेल फारसे कधीच काँग्रेसच्या विरोधात विधाने करीत नाहीत. पण गेल्याच आठवडय़ात राष्ट्रवादीच्या समाजमाध्यम-प्रवेशाच्या सोहळय़ाप्रसंगी राष्ट्रवादीच्या विरोधात आरोप करणाऱ्यांमध्ये विरोधकांबरोबरच मित्र पक्षांचाही हात दिसतो, असे सांगत पटेल यांनी काँग्रेसवर बिल फाडण्याचा प्रयत्न केला. प्रफुल्ल पटेलही विरोधात बोलू लागले म्हणजे काही तरी बिनसले, असा अर्थ काँग्रेसचे नेतेदेखील काढू लागले आहेत. त्यातच, कोळसा खाणींच्या वाटपावरून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असताना पंतप्रधानांच्या समर्थनार्थ सर्वात आधी शरद पवार हे सरसावले. पंतप्रधानांवर आरोप होत असताना गप्प बसणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पवार यांनी कुरघोडी केली. यूपीए-३ पुन्हा सत्तेत आल्यास डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावालाच राष्ट्रवादीची पसंती आहे. राहुल गांधी पंतप्रधान होणे राष्ट्रवादीला त्रासदायक ठरणारे आहे. राहुल गांधी यांच्याबरोबर काम करणार नाही हे पवार यांनी आधीच जाहीर केले आहे.
गेली १४ वर्षे रडतखडत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असले तरी सरकारचा कारभार, खातेवाटप वा निर्णयप्रक्रिया या साऱ्यांमध्ये आपलाच वरचष्मा राहील याची पुरेपूर खबरदारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली. केवळ महाराष्ट्राची सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी पवार यांच्यापुढे गुडघे टेकल्याचे चित्र बघायला मिळाले. ‘सीसॉ’च्या खेळात आतापर्यंत राष्ट्रवादीची बाजू वरचढ होती. आता दुसरी म्हणजे काँग्रेसची बाजू वरचढ झालेली दिसते. विविध आरोप, राज्य सहकारी बँकेचा भोंगळ कारभार वा सिंचन घोटाळा यातून राष्ट्रवादीला कधी नव्हे एवढी बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे. आताआतापर्यंत राष्ट्रवादी म्हणेल ती पूर्व दिशा असायची. आता मात्र तसे दिसत नाही. राष्ट्रवादीने २६-२२ जागांचे सूत्र निश्चित केले असले तरी काँग्रेसने मात्र सुरुवातच २७-२१ ने होईल, असा पवित्रा घेतला. कारण कोल्हापूरमधून अपक्ष म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादीचे बंडखोर सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसशी घरोबा केला. राष्ट्रवादीला २० पेक्षा जास्त जागा सोडण्यास काँग्रेसमध्ये विरोध आहे. दुसरीकडे आगामी निवडणुकीनंतर काँग्रेस वा भाजप या दोन्ही मुख्य पक्षांपैकी एकाला २७२ चा जादुई आकडा गाठणे शक्य न झाल्यास १९९६ ची पुनरावृत्ती होऊन छोटय़ा पक्षांना महत्त्व प्राप्त होईल. म्हणूनच यंदा जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर राष्ट्रवादीचा भर आहे. जास्त खासदार निवडून आले तरच पवार यांचे महत्त्व सत्तास्थापनेत वाढू शकते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता राष्ट्रवादी कमी जागा स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. उलट महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा कशा कमी होतील याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. विदर्भात काँग्रेसला अपशकुन करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीने पाच जिल्हा परिषदांमध्ये भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडून केला जातो.
जागावाटपाचा विषय काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही बाजूने प्रतिष्ठेचा केला गेला आहे. काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ या सूत्रानुसारच जागावाटप होईल, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. पवार यांच्या म्हणण्यानुसार जागावाटपाचे सूत्र अमान्य असल्याचे काँग्रेसनेही जाहीर केले आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत माघार कोणी घ्यायची, हा कळीचा मुद्दा आहे. कारण उद्या एक जागा जरी कमी झाली तरी राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे शरणागती स्वीकारली ही टीका राष्ट्रवादीला सहन करावी लागेल. राष्ट्रवादीचे सूत्र मान्य केल्यास राष्ट्रवादीच्या दादागिरीपुढे काँग्रेस नमली हा संदेश जाईल. काँग्रेसमध्ये निर्णय सोनिया गांधी घेतात, असे विधान अलीकडेच पवार यांनी केले. याचाच अर्थ पवार आपले वजन वापरून सोनियांकडून २६-२२ चे सूत्र मान्यही करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल गांधी भाषणांमध्ये शर्टाच्या बाह्या सारख्या सरसावत असतात. मात्र राज्यातील काँग्रेस नेत्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. निवडणुकीच्या लढाईआधी जागावाटपाची लढाई कोण जिंकते याला महत्त्व आले आहे. आघाडी टिकविण्याकरिता दोघांपैकी एकाला एक पाऊल मागे घ्यावे लागेल. उभय बाजूंनी दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मनाचा मोठेपणा दाखवून कोण एक पाऊल मागे घेते हे महत्त्वाचे ठरेल. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता मोठा भाऊ म्हणून काँग्रेसने नमते घेतले. त्याचीच पुनरावृत्ती बहुधा बघायला मिळेल.