‘पब्लिक है, सब जानती है’पासून ‘व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठा’पर्यंत आणि रेटून खोटे बोलणाऱ्या जल्पकांपर्यंतचा प्रवास आपल्या प्रजासत्ताकाला मारक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकांच्या अनुभवातले, संदर्भाच्या परिप्रेक्ष्यात त्यांना आठवणारे, काळजाला भिडणारे सत्य आज पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संघटित प्रयत्न हवेच.. 

योगेन्द्र यादव

जल्पकांच्या टोळय़ा आज आपल्या प्रजासत्ताकाचा आत्माच पोखरून काढत आहेत. या जल्पकांनी याआधीच सामाजिक पातळीवरील चर्चामध्ये विष कालवले आहे आणि जल्पकांच्या टोळय़ांकडून लबाडीचे, कपटाचे वातावरण फैलावले जात असल्याने राष्ट्रभावनाच संकटात आहे. हा केवळ संविधानाधिष्ठित प्रजासत्ताकाला नव्हे, तर नागरी संस्कृतीलाच धोका आहे.

जल्पकांच्या टोळय़ा जे काही करतात त्याबद्दल नुसत्या तक्रारी करत बसणे थांबवण्याची आता वेळ आली आहे. त्यांच्या या सगळय़ा थापेबाजीला उत्तर दिले पाहिजे, विरोध केला पाहिजे, पण तो वेगळय़ा मार्गाने. त्यासाठी आता वेळ आली आहे सत्याग्रहींची फौज उभी करण्याची.

‘जल्पकांच्या टोळय़ांच्या विरोधात सत्याग्रहींची फौज उभी करायला हवी’ ही काही केवळ इच्छा नाही. हा एक ठोस प्रस्ताव आहे. आपल्यामध्ये अनेक जण असे आहेत की ज्यांचे एकमेकांशी राजकीय मतभेद आहेत. फक्त मतभेदच कशाला, अगदी राजकीय शत्रुत्वदेखील आहे, पण आपणा सगळय़ांना सांधणारी एक गोष्ट म्हणजे, आपण स्वत:ला या प्रजासत्ताकाचे रक्षणकर्ते मानतो आणि तसे आपण आहोतही. असेनात का आपले राजकीय मतभेद, असेना का राजकीय शत्रुत्व.. पण तरीही एकत्र येऊ या ते एका उद्देशासाठी. तो म्हणजे सध्याची राजकीय व्यवस्था, तिचे भाट, तिचे भालदार-चोपदार या सगळय़ांनी आणि या सगळय़ांनाच वेढलेल्या यंत्रणेने आज उभारलेले असत्याचे सापळे झुगारून देणे. यासाठी आधी आपला एकमेकांशी संवाद व्हायला हवा. त्यासाठी एक सामाईक व्यवस्था उभी करायला हवी. आपण सगळय़ांनी मिळून एक थिंक टँक किंवा एक समूह उभा करायला हवा. हा थिंक टँक किंवा समूह लोकांशी स्मार्ट पद्धतीने संवाद साधण्यासाठीची धोरणे निश्चित करेल. या धोरणांचे प्रभावी संदेशांमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण देशातील अशा काही मंडळींना एकत्र आणू, ज्यांच्याकडे सर्वोत्तम सर्जनशीलता असेल. अशी एक व्यवस्था, यंत्रणा उभी करता येईल जिच्या साहाय्याने हे संदेश वेगवेगळय़ा माध्यमांपर्यंत, व्यासपीठांपर्यंत पोहोचवले जातील. सरतेशेवटी आपण लाखो स्वयंसेवकांचे एक असे जाळे उभे करू या की ज्यांच्यामार्फत आपण समाजामधल्या अगदी सर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकू. या सगळय़ामधून सत्य अगदी सामान्य माणसांपर्यंत त्यांच्या भाषेमध्ये जाऊन पोहोचेल.

सत्य हे त्यातील तपशिलांच्या तपासणीच्या कसोटीवर खरेच उतरले पाहिजे. आपल्याला आज बऱ्याच खोटय़ा गोष्टी खऱ्या म्हणून दडपून सांगितल्या जात असल्या तरी त्यातील तपशील तसेच माहिती खरी असेल याची काळजी घेतलेली असते. असे असले तरी बहुतांश जल्पक टोळय़ांना मात्र खरे तपशील तसेच खऱ्या माहितीचे वावडे असते. अशा परिस्थितीत आपण मात्र ‘लोकांच्या अनुभवातले सत्य’ जगासमोर आणण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत. सामान्य लोकांच्या आवाक्यापासून दूर, दुर्गम ठिकाणी असलेल्या गोष्टीबद्दल खोटे बोलणे सोपे असते. पण ज्या गोष्टींचा लोकांनी स्वत: अनुभव घेतलेला असतो अशा गोष्टींबद्दल खोटे बोलणे सोपे नसते. लडाखच्या नेमक्या किती भागात घुसखोरी झाली याविषयीचा सरकारी खोटारडेपणा उघडकीला आणणे एक वेळ अवघड असू शकते, पण रोजगारनिर्मितीसंदर्भातील सरकारी दाव्यांतील खोटेपणा उघडकीस आणणे किंवा कोविडच्या हाताळणीतील गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या मृत्यूंचे लपवले गेलेले आकडे उघडकीस आणणे हे लोकांनी वैयक्तिक पातळीवर अनुभवलेले सत्य सर्वासमोर आणणेच आहे.

अनुभवजन्य सत्यातला अनुभव हा केवळ वर्तमानकाळातला नसतो, भूतकाळातल्या अनुभवांशी तो ताडून पाहाता येतो. मग सत्य हे केवळ ‘खऱ्याखोटय़ाची पडताळणी’ (फॅक्टचेकिंग) एवढेच न उरता, ताजे तपशील आणि चपखल संदर्भाची ती बेरीज ठरते. उदाहरणार्थ, पंतप्रधानांच्या जिवाला धोका असल्याच्या फिरोजपूरमधील तथाकथित अतिशयोक्तीचे पितळ दुसऱ्या दिवशी प्रसारित झालेल्या व्हिडीओंनी उघडे पाडलेच, हा झाला तपशील. पण या सगळय़ामध्ये एक पॅटर्न आहे, पद्धत आहे. तो पॅटर्न किंवा पद्धत लक्षात घेण्यासाठी काही घटना मोठय़ा परिप्रेक्ष्यात बघावा लागतात. उदाहरणार्थ २००२ च्या गुजरात निवडणुकांपूर्वी अक्षरधाम मंदिरावर झालेला  हल्ला.

आपण केवळ अनुभवजन्य सत्याशीच नव्हे तर भावनिक सत्याशीही जोडून घ्यायला शिकले पाहिजे. नुकतेच उघडकीला आलेले बुली-बाई किंवा सुली-डील हे फक्त गुन्हेगारी कृत्य नाही तर ते त्याहीपलीकडे जाणारे आहे. हे कृत्य ही फक्त पीडितांसाठीच नाही तर त्यांच्याबरोबर संबंधित गुन्हेगारांसाठीदेखील एक भावनिक शोकांतिका आहे. या सगळय़ामागे असलेले सत्य सांगणे म्हणजे या त्या कृत्यामागे असलेला मानवी चेहरा उघड करणे. आपल्या मुलीला या पद्धतीने लक्ष्य केले असते तर किंवा ‘या कृत्यामध्ये आपला मुलगा अडकला असता तर?’  असे प्रत्येकाला वाटणे हे या संदर्भातील ‘सत्य’ उघडकीला आणण्यामागे अभिप्रेत आहे.

 स्पष्टीकरणात्मक सत्य, भावनिक सत्य असे सत्याचे प्रकार अनुभवजन्य सत्याला पूरक असणे आवश्यक आहे.

सत्यनिष्ठा आणि लोकनिष्ठा

इतर कोणत्याही सैन्याला असते तशीच सत्याग्रहींच्या फौजेलादेखील एका धोरणात्मक सिद्धांताची गरज असेल.  या सत्याग्रही सैन्याने, अर्थातच, एक तत्त्व म्हणून आणि सर्वात प्रभावी रणनीती म्हणून सत्याशी वचनबद्ध राहिले पाहिजे. गैरसोयीचे असतानाही, एवढेच नाही तर परिस्थिती विरोधात असतानाही खरे बोलण्याचे धाडस त्यांच्याकडे असले पाहिजे! सार्वजनिक लोकपालांद्वारे पुनरीक्षणासाठी,  सत्य दाव्यांच्या स्वतंत्र सार्वजनिक छाननीसाठी हे सैन्य नेहमीच तयार असले पाहिजे. आमचा प्रतिसाद काहीही असला तरी जल्पकांच्या टोळय़ा हिंदूू-मुस्लीम मुद्दय़ांवरील चर्चासाठी आम्हाला अगदी रोजच्या रोज आमंत्रित करत असतात,  जेणेकरून हा(च) मुद्दा सतत चर्चेत राहावा. जल्पकांच्या टोळय़ांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल अशा मुद्दय़ांवर त्यांना लढायला भाग पाडणे हे या सगळय़ामधले धोरणात्मक आव्हान आहे. त्यासाठी त्यांच्या उणिवा समजून घेतल्या पाहिजेत. त्याबरोबरच सत्याग्रहींच्या फौजेने दृश्य माध्यमाची ताकद जाणून घेऊन त्या भाषेत बोलणेही शिकले पाहिजे. भारतीय भाषांमध्ये तर बोललेच पाहिजे, पण तेवढेच पुरेसे नसून सामान्यजनांच्या म्हणी, वाक्प्रचारही त्यांनी वापरले पाहिजेत. खोटेपणाचे जाळे उखडून टाकण्यासाठी विनोद, उपहास या प्रभावी शस्त्रांचाही त्यांनी वापर करणे आवश्यक आहे.

भक्तांनी वेढलेल्या या कथित सत्योत्तर जगात सत्याच्या राजकारणाला खरोखर अवकाश आहे का असा एखाद्याला प्रश्न पडू शकतो. पण सत्यासाठी असा अवकाश आहे यावर माझा विश्वास आहे. सत्याची किंमत, सत्याचे महत्त्व  कळण्यासाठी आपल्याला जल्पकांच्या प्रोपगंडाकडे (प्रचार मोहिमेकडे) नीट लक्ष द्यावे लागेल. लखीमपूर खेरीबद्दल प्रसारमाध्यमांनी पसरवलेले असत्यकथन जरा आठवून बघा. तरीही सत्याचे तपशील पुढे आलेच आणि शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या वाहनाच्या व्हिडीओमुळे तर जल्पकांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. त्या घटनेतील तपशिलांची फिरवाफिरव करण्याचा आणि माहिती दडपण्याचा सरकारने किती आटोकाट प्रयत्न केला याकडे नीट लक्ष द्या. तरीसुद्धा, रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या ‘भावनिक सत्या’ने वर्षभरात सरकारला एक पाऊल मागे घेणे भाग पाडले.

आपल्याला अपेक्षित असलेली सत्याग्रहींची फौज कुठे भरती होणार? आपल्याकडे सत्याचा शोध घेणारे आहेत का? आपण खरोखरच सत्याचे साधक आहोत का? तर खरोखरच आहोत. रवीश कुमार यांच्या समाजमाध्यमांवर असलेल्या अनुयायांची संख्या तपासा. बडय़ा माध्यमगृहांच्या सध्याच्या परिस्थितीतील शरणागतीमुळे राज्याराज्यांमध्ये, जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये लहान लहान यूटय़ूब चॅनल्स तयार झाली आहेत. त्यांना प्रचंड प्रमाणात अनुयायी आहेत. आपल्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबाबतचे सत्य लोकांना अजूनही हवे आहे. सत्याच्या मुद्दय़ावर भरती होण्यासाठी तयार असलेल्या स्वयंसेवकांची फौज त्यासाठी वाट पाहात उभी आहे. नुकतीच झालेली शेतकरी चळवळ हा त्यासाठीचा पुरावा आहे.

पण मुळात सत्याचा आग्रह धरणाऱ्यांना, त्यासाठी लढू पाहणाऱ्यांना ‘फौज’ किंवा ‘सैन्य’ का म्हणायचे? काही शांतताप्रेमी मित्रांना फौज किंवा सैन्य हा शब्द आवडत नाही. पण जातीय हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी महात्माजींनी स्वत: ‘शांती सेना’ स्थापन केली हे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेच जण सध्या एका लढाईत जुंपले गेलो आहोत. ही लढाई आहे आपला देश वाचवण्यासाठीची, आपली नागरी संस्कृती वाचवण्यासाठीची. आपल्या स्वातंत्र्याच्या या ७५ व्या वर्षांत नियतीशी असलेला आपला करार अबाधित ठेवण्यासाठी हे पवित्र युद्ध लढायला हवे, त्यासाठी सत्याग्रहींच्या सैन्याची नितांत गरज आहे.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत. yyopinion@gmail.com

((((‘शववाहिनी गंगा’सारखी कविता हा भावगम्य सत्य सांगण्याचाच एक प्रयत्न ठरला.. 

मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public sab jaanti hai from whatsapp university protest an army of satyagrahis gangs of jalpaks akp
First published on: 21-01-2022 at 00:08 IST