एक आहारतज्ज्ञ इथे उपस्थित असताना तुम्ही खाद्यपदार्थावर चर्चा करीत आहात, असं कर्मेद्र प्रज्ञाकडे बघत म्हणाला तेव्हा योगेंद्र हसून म्हणाला..
योगेंद्र – वा कर्मू तुला खरंच चर्चेत गोडी वाटायला लागलेली दिसते.. नाहीतर खाद्यपदार्थाचा विषय निघाला की लगेच तुला खायला सुचत होतं..
कर्मेद्र – अरे पण जेवलोय ना आधीच? तेही प्रज्ञा यायच्या आत!
प्रज्ञा – मी काय जेवू देत नाही की काय मनासारखं?
कर्मेद्र – (हसत) तसं नाही.. पण तरीही कुणा आहारतज्ज्ञाच्या समोर जेवताना पोट नीट भरत नाहीच.. सारखी भीती.. बरं ते जाऊ दे.. प्रज्ञा अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.. तर आहारतज्ज्ञ म्हणून तू काय सांगशील?
प्रज्ञा – एकतर मी अभंग ऐकते किंवा वाचते ते आहारतज्ज्ञ म्हणून नाही बरं का! आणि तुमच्यासारखी मला तर काही चर्चा जमणार नाही.. बरं या अभंगात मी काय सांगणार? भाज्यांची वर्णनं आली म्हणून? उद्या ‘सेतु बांधा रे सागरी’चा अर्थ अभियंत्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करशील!
कर्मेद्र – आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काही बोलायचं नसलं ना की तुलाही ज्ञान्यासारखं टाळायला जमतं हल्ली! आणि हो, फुकटचं ज्ञान तू तरी का खर्च करशील? (ज्ञानेंद्र हसत एक गुद्दा घालतो) बरं निदान एवढं तरी सांग की एवढं अध्यात्माचं क्षेत्र कांदा आणि लसणीला वज्र्य ठरवतं, तर आहारतज्ज्ञ म्हणून तुझं काय मत आहे?
योगेंद्र – ए एखाद्या वृत्तवाहिनी पत्रकाराच्या अविर्भावात काय विचारतोस? या दोन्हींमुळे रजोगुण वाढतो आणि त्यासाठी त्यांना वज्र्य ठरवलं जातं.. आहाराचा आणि शरीराचा व त्यायोगे मनाचा फार जवळचा संबंध आहे. आपण काय खातो, त्यानुसारचे संस्कार आपल्या मनावर आपोआप घडत असतात.. त्यामुळे ज्यांना मनावर ताबा आणायचा आहे त्यांना आधी खाण्याच्या ओढीवर ताबा आणावा लागतो आणि असेही पदार्थ टाळावे लागतात ज्यामुळे विकारांना वाव मिळतो..
कर्मेद्र – म्हणजे बिचाऱ्या कांद्यामुळे तुमचा काम आणि क्रोध बळावत असेल तर तो कांदा तुमच्यापेक्षा बलवान झाला की! आणि या हृदूचं तर सगळंच विचित्र आहे. हा कांदा खात नाही आणि लसूण मात्र खातो.. का? तर ती हृदयासाठी खूप चांगली असते..
प्रज्ञा – हो हे मात्र खरं आहे..
कर्मेद्र – असं जुजबी सांगू नकोस ना.. म्हणूनच म्हणतो, कांदा, मुळा, भाजी सगळ्याबद्दल सांग..
ज्ञानेंद्र – अरे पण या अभंगाचा आणि आहारशास्त्राचा काय संबंध? उगाच बिचारीला त्रास..
कर्मेद्र – हेच.. स्त्रीलाही स्वतंत्र विचार असतात, हेच तुम्ही लोक नाकारता, तिची मतंही दडपता..
ज्ञानेंद्र – घ्या.. मांड बाई तुझी मतं तू..
प्रज्ञा – (हसत) ज्ञानचं खरं आहे, मी काय सांगणार?
कर्मेद्र – तुला माहीत नाही, प्रज्ञा.. एकेका शब्दांवरून या तिघांनी अशा भराऱ्या मारल्यात की मूळ शब्द बिचारा बापुडवाणा होऊन आपल्याच अर्थछटा पाहून अचंबित होत जातो.. मग इथे तर इतके स्पष्ट खाण्याचे शब्द आहेत तर दात-ओठ खात यांनी विरोध का करावा? बरं तू काही नुसती आहारतज्ज्ञ नाहीस.. तुझे बाबा आयुर्वेदात निष्णात होते.. ती परंपराही तुला माहीत आहे..
प्रज्ञा – पण असं अचानक कसं सांगू? मलाही थोडा विचार केला पाहिजे..
कर्मेद्र – सुरुवात तर कर.. सगळं आपोआप येईल..
प्रज्ञा – बघ.. सावता माळी हे शेतकरी होते आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे जे उन्हातान्हात कष्टाची कामं करतात त्यांच्या जेवणात कांदा, मिरची, लसूण यांचं प्रमाण चांगलंच असतं.. यामागे काही परंपरा असलीच पाहिजे.. कांद्याबाबत बोलायचं तर तो अ‍ॅलर्जी, सर्दी, आम्लपित्त, हृदयविकार, मधुमेह यांना आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त आहे, हाडं ठिसूळ होऊ नयेत म्हणूनही तो उपयुक्त आहे, पांढरा कांदा तर उन्हामुळे होणारी डोळ्यांची भगभग कमी करतो.. तेव्हा शेतात राबणाऱ्यांना कांदा असा लाभकारी असावा..
कर्मेद्र – छान.. आता उद्या कांदाभजी पक्की!
प्रज्ञा – (हसत) पण आमचे अण्णा मात्र म्हणत की आयुर्वेदानुसार कांदा अजीर्णाचं एक कारण आहे.. त्यामुळे उदरवात, पोटफुगीही होऊ शकते!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकांदाOnion
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diet expert onion
First published on: 06-07-2015 at 12:05 IST