दिल्लीत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराबद्दल जबाबदारीची जाणीव नसल्यासारखे वागणे हे आप या दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षाच्या नेत्यांना शोभादायक नाही. या प्रकरणी पंतप्रधानांनी लक्ष घालावे, अशी मागणी करत असतानाच, दिल्ली पोलिसांवरील आपला राग काढल्याशिवाय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राहवले नाही. पोलीस दल आपल्या ताब्यात द्या, असे म्हणत असताना, सत्तेवर येताच दिलेल्या वचनांचा विसर त्यांना पडला. दिल्ली निर्भय करण्याचे त्यांचे आश्वासन आणि या घटनेबद्दल केंद्रातील सरकारला दोषी ठरवण्याचा त्यांचा हट्ट त्यांची वृत्ती स्पष्ट करणारा आहे. त्याहून भयानक वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री के जे जॉर्ज यांनी केले आहे. ‘दोघांनी बलात्कार केला, तर तो सामूहिक कसा ठरतो?’ असला मूर्ख प्रश्न उपस्थित करून त्यांनी स्वत:चे हसू करून घेतले आहे.
त्याचवेळी त्याच राज्यातील भाजप नेते ईश्वराप्पा यांनी महिला पत्रकाराशी बोलताना, तुमच्यावर बलात्कार झाला, तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही काय करू शकतो? असा प्रतिप्रश्न विचारला आणि आपल्या अकलेचे दिवाळे जाहीर केले. बलात्कारासारख्या घटनांबद्दल राजकारणी कसा विचार करतात, हे यावरून दिसून येते. अडीच आणि पाच वर्षांच्या मुलींवर झालेल्या बलात्कारांबद्दल देशातील प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने समंजसपणे व्यक्त होण्याची गरज असताना, त्याचे राजकारण करणे निर्लज्जपणाचे असून अजिबातच समर्थनीय नाही. केजरीवाल यांचा दिल्ली पोलिसांवर आधीपासूनच राग आहे. तो व्यक्त करण्यासाठी त्यांना या घटनेचा उपयोग करून घ्यावासा वाटणे, हेच असमंजसपणाचे आहे. समाजाचे प्रतिनिधी असलेल्या सर्वांनी अशा प्रकरणांत अधिक व्यापक आणि स्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ई-एडिट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi leaders politics on rape cases
First published on: 18-10-2015 at 14:54 IST