धान्य आणि फळपिकांना फेब्रुवारीत उन्हाचा चटका आणि मार्चमध्ये पावसाचा तडाखा बसल्याने असो की आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे, चर्चा होते ती हवामानाचीच..

हवामानातील बदल हा काही आता आंग्लभाषक उच्चभ्रूंच्या दिवाणखानीय चर्चेपुरता मर्यादित विषय राहिलेला नाही. फेब्रुवारीच्या अंतापासून सुरू झालेल्या घामांच्या धारांमुळे हा विषय आता जनसामान्यांच्या अंगाखांद्यावरून ओघळताना दिसतो. गेल्या काही दशकांत जगातील तापमानात होत असलेले बदल यापुढील काळातील अनेक प्रश्नांचे काहूर उठवणारे आहेत. यात जसे शेती, पीकपाण्याचे विषय आहेत तसेच या वातावरणीय बदलात आरोग्याचे अनेक प्रश्नही दडलेले दिसतात. गेल्या चार वर्षांत आलेल्या अवकाळी पावसाने अन्न-असुरक्षेच्या वाढत्या चिंतेबरोबरच आरोग्याचे प्रश्न अधिक तीव्र होऊ लागले असून, पीकपाण्याची परिस्थिती हळूहळू चिंताजनक होऊ लागली आहे. कमाल आणि किमान तापमानातील फरक जसजसा वाढू लागतो, तसतसे हे बदल अधिक लक्षात येऊ लागतात. अचानक येणाऱ्या पावसामुळे होणारी पिकांची हानी शेतकऱ्यांच्या डोळय़ांत पाणी आणणारी ठरते. बदलत्या हवामानाचा सर्व अंगांनी विचार करून धोरणे आखणे ही यापुढील काळातील खरी गरज आहे. तसे ते झाले नाही, तर अशा घटनांचा सरकारी तिजोरीवर पडणारा भार काही काळाने पेलवणार नाही. ही परिस्थिती केवळ भारतातच आहे, असे नाही. सारे जग या घटनांनी भांबावलेले दिसते. युरोपातील अनेक देशांना मागील वर्षांच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या. उष्णतेच्या लाटा त्यात भर घालू लागल्या. युरोपीय देशांमधील नद्यांची पातळी घटली, अनेक नद्या कोरडय़ा पडल्या. त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि जलविद्युतनिर्मितीवरही झाला. त्यामुळे अन्नधान्यासह अनेक पिकांचे उत्पादन दहा ते पन्नास टक्क्यांनी कमी झाले. अमेरिकेतील परिस्थिती याहून फारशी वेगळी नव्हती. तेथील मोठय़ा धरणांनी तळ गाठला. १९३७ नंतर प्रथमच आलेली अशी भीषण स्थिती अमेरिकेने अनुभवली आहे. त्याच वेळी शेजारील पाकिस्तानला पुराचा इतका मोठा फटका बसला आहे की त्यामुळे गहू, भाताचे उत्पादन कमी झाले. जगाला गहू, तांदूळ पुरवठा करणाऱ्यांपैकी हा देश यामुळे हतबल झाला आहे.
भारतात गेल्या महिन्यातील तापमान सरासरीपेक्षा १० अंश सेल्सिअस जास्त राहिले. यंदाचा फेब्रुवारी महिना गेल्या सव्वाशे वर्षांतील सर्वात उष्ण ठरला. त्याचा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर होणार आहे. मागील वर्षी गव्हाच्या उत्पादनात झालेली सहा टक्क्यांची घट यंदा भरून काढण्याचे आव्हान असले, तरी ते स्वीकारण्यासाठी निसर्गाची साथ लागेल. यंदा केंद्रीय कृषी मंत्रालय ११२ दशलक्ष टन एवढय़ा विक्रमी गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त करीत असले, तरी ‘रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन’च्या म्हणण्यानुसार ते कमीच राहील. या बदलत्या हवामानाचा अन्नधान्य आणि विशेषत: फलोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे १३० कोटी नागरिकांच्या भुकेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याचा धोका दिसतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकांत अन्नधान्याऐवजी फलोत्पादनावर भर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतीचे अधिक क्षेत्र त्यासाठी उपयोगात येऊ लागले. पण फळपिकांचे या अवकाळी पावसाने झालेले नुकसान मोठे आहे. महाराष्ट्रापुरता सर्वात मोठा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होणार आहे. राज्यात यंदा १३८ लाख टन साखरनिर्मितीचा अंदाज होता. आता सुधारित अंदाज १२८ लाख टनांवर आला आहे. याचे कारण नव्याने लागवड केलेल्या उसाचे वजन देशभरात सरासरीच्या दहा टक्के कमी भरले. सलग चार महिने पाऊस सुरू राहिल्यामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे अपेक्षित वजन आणि गोडी भरली नाही. देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्राला अचानक येणाऱ्या पावसामुळे आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागेल. राज्यात कांदा, ज्वारी, बाजरी, कडधान्यांचे पीक अवकाळीमुळे मातीमोल झाले आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या ऐन काढणीच्या काळात पाऊस पडल्याने या पिकांचे नुकसान होते. द्राक्षे, डािळब, केळी, संत्रा, पपई, आंबा या फळपिकांवर या अचानक पावसाचा अधिक गंभीर परिणाम होताना दिसतो. फेब्रुवारी महिन्यात उष्णता वाढल्यामुळे स्ट्रॉबेरीचेही उत्पादन ३० टक्क्यांनी घटले. संततधार पावसामुळे सीताफळाचीही हीच अवस्था. त्याच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आणि दर्जाही खालावल्याने शेतकरी अडचणीत आले.

चौथ्या तिमाहीत विकासदर ६.२ टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा अंदाज; तिमाही तसेच आर्थिक वर्षासाठी आकडेवारी ३१ मेला अपेक्षित
Independent candidates campaign on redevelopment and unemployment issues for loksabha election
मुंबई : पुनर्विकास, बेरोजगारीच्या मुद्द्यावर अपक्षांचा प्रचार
article about farmers expect the next phase of green revolution
लेख : पाहिजे… हरित क्रांतीचा पुढचा टप्पा!
World Thalassemia Day 2024
थॅलसिमियावर नियंत्रण आणि त्याचा प्रतिबंधही शक्य आहे…
changes in indian patent rules two important changes in indian patent act
पेटंट कायद्यातील बदल कशासाठी? कुणासाठी?
women employees, India centers,
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील केंद्रांत ५ लाख स्त्री कर्मचारी, ‘एग्झिक्युटिव्ह’ उच्चपदस्थ मात्र केवळ ६.७ टक्के
homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
sharad pawar slams amit shah over knowledge about agriculture
‘अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित’, शरद पवार यांचा टोला

एकीकडे पीकपाणी अडचणीत येत असतानाच हवामानातील सततचे चढउतार मानवी आरोग्यावरही परिणाम करतात. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ापासूनच उन्हाच्या झळांनी चटके देण्यास सुरुवात केली. दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर जाऊन पोहोचले. रात्रीचे तापमान फेब्रुवारी संपेपर्यंत १० अंश सेल्सिअसच्या आत-बाहेर राहिले. त्याचा परिणाम म्हणून विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. विषम हवामान हे कोणत्याही विषाणूच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यामुळेच अशा हवेत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात होते. दिवसा वाढलेल्या उन्हाच्या तापामुळे उष्माघाताची लक्षणेही बळावतात. यंदा मार्च महिन्यात उष्णतेच्या झळा आणि पावसाच्या सरी असे दोन्ही प्रकार किमान महाराष्ट्रात दिसून येत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी एका बाजूला कमाल तापमानाने सातत्याने ३५ अंश सेल्सिअसची पातळी मार्चमध्येच ओलांडली आहे. तशातच मार्चच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ातही दोन टप्प्यांत राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या पावसाचाही परिणाम पिकांवर तसेच आरोग्यावर होताना दिसतो. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगरमध्ये विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामध्ये नुकताच आढळू लागलेला ‘एच-थ्री एन-टू’ आणि ‘एच-वन एन-वन’ (स्वाइन फ्लू)चा समावेश आहे. हवामान बदलामुळे विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसतातच हे सर्वसाधारण असले तरी सध्याच्या परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा अंगावर काढणे हे जोखमीचे ठरेल.
यास आणखी एक परिमाण आहे. ते म्हणजे आर्थिक. ते असे की वाढत्या तापमानामुळे घराघरांत वा कार्यालयांत वातानुकूलन यंत्रणेचा वापर अधिक होणार. एरवी एप्रिलपासून घरघर अनुभवणारी ही वातानुकूलन यंत्रे यंदा फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच फुरफुरू लागलेली दिसतात. ते साहजिक. पण याचा थेट परिणाम म्हणजे विजेच्या मागणीत होणारी वाढ. विजेची वाढती मागणी भागवण्यासाठी अधिक वीज निर्माण करावी लागणार. म्हणजे पुन्हा कोळसा जाळणे आले. याचे कारण अणुऊर्जा प्रकल्पांची क्षमता वा त्यांची संख्या काही महिनाभरात वाढवता येणार नाही. तसेच आगामी उन्हाळा लक्षात घेता धरणांतील किती पाणीसाठा विजेसाठी वापरायचा याचाही विचार करावा लागणार. राहता राहिला कोळसा. त्याची उपलब्धता अमाप असल्याने आगामी काही महिने अधिकाधिक औष्णिक वीजनिर्मितीचे असणार हे उघड आहे. यामुळे आपली कर्बउत्सर्जन नियंत्रण लक्ष्यपूर्ती लांबेल हा आणखी एक दुष्परिणाम. असो.

वातावरणीय बदलाचे वास्तव आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे, याचे हे सारे निदर्शक. ज्यांच्याकडे संभाषणासाठी काही चमकदार विषय नाहीत ते हवापाण्यावर बोलू लागतात असे एके काळी मानले जात असे. ऑस्कर वाइल्ड याच्यासारखा लेखक तर ‘कन्व्हर्सेशन अबाउट द वेदर इज द लास्ट रेफ्यूज ऑफ द अनइमॅजिनेटिव्ह,’ असे म्हणून गेला. पण आता हवामान हा सर्वत्र चर्चेचा मुख्य विषय बनलेला आहे. काळच कल्पनाशून्यांचा आला त्यास वाइल्ड तरी काय करणार?