एखादा पक्ष चिकाटीने प्रयत्न करून आपण पर्याय ठरू शकतो असे चित्र निर्माण करू शकला, तर समोर कितीही तगडा प्रतिस्पर्धी असला तरी सत्ताबदल होतो.

गुजरातमधील विजयात भाजप नेतृत्वाचा विजय अधिक तर हिमाचलातील विजयात काँग्रेस नेतृत्वाचा पराजय अधिक. या दोघांच्या पलीकडे ‘आप’चे अपयशही लक्ष वेधून घेणारे.. 

ubt shiv sena leader jyoti thackeray in yavatmal washim constituency tour
मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

पर्यायाचा अभाव ही अवस्था व्यक्ती असो वा समाज यांच्यासाठी नेहमीच अनारोग्यनिदर्शक असते. वरवर पाहता तात्त्विक वाटणारे हे सत्य राजकारणास लावल्यास गुजरात हे या अवस्थेचे सर्वोत्तम प्रतीक म्हणावे लागेल. तेव्हा आजच्या गुजरात विधानसभा निवडणुकांत गेली सुमारे तीन दशके सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षास दणदणीत बहुमत मिळणे ही काळय़ा दगडावरची रेघ होती. तशीच ती उमटली. या सर्व काळात त्या राज्यात काँग्रेसला नेतृत्व विकसित करता आले नाही आणि त्याच वेळी समोर भाजप सहज फैलावत गेला. माधवसिंह सोळंकी यांच्यानंतर गुजरातेत नाव घ्यावा असा नेता काँग्रेसने घडवलेला नाही. सोळंकी जसजसे लयास गेले तसतशी काँग्रेस त्या राज्यात नेस्तनाबूत होत गेली. या राजकीय सुसंधीचा उत्कृष्ट उपयोग करण्याचे श्रेय अर्थातच नरेंद्र मोदी यांस द्यावेच लागेल. आपल्या प्रतिपक्षाचे नेमके वैगुण्य हेरून त्याप्रमाणे आपली रणनीती आखणे हे कोणत्याही सेनापतीसाठी आवश्यक. गुजरातचे हे सेनापतीपद मोदी यांनी सर्वोत्तमपणे हाताळले यात तिळमात्रही संदेह नाही. त्या राज्याच्या समाजकारणात दडलेला सुप्त धर्मवाद मोदी यांनी अलगदपणे पोसला आणि त्यास गुजराती अस्मितेची जोड देऊन यशाचे एक अजेय समीकरण तयार केले. यास तोंड देण्याची बौद्धिक आणि राजकीय ताकद काँग्रेस दाखवू शकला नाही. तेव्हा या निवडणुकीत काँग्रेसची वाताहत होणार हे दृष्टिहीनाच्या नजरेसही जाणवेल इतके ढळढळीत सत्य होते. खरे तर या राज्यातील नेता पंतप्रधानपदी आहे हे लक्षात आल्यावर काँग्रेसने दिवसरात्र मेहनत घेणे गरजेचे होते. याचे कारण भारतीयांची भावनिकता. ‘आपल्या’ राज्याचा नेता देशाच्या सर्वोच्चपदी असणे हे सर्वसामान्यांस नेहमीच सुखावणारे असते. त्यामुळे गुजराती मतदाराने इतरांपेक्षा भाजपच्या पारडय़ात कांकणभर अधिकच मते टाकणे अपेक्षित. तसेच झाले. गुजरातमधे भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला. याबद्दल त्या पक्षाचे मन:पूर्वक अभिनंदन.  

त्यानंतर संबंधित राजकीय वास्तवाविषयी. त्यातील महत्त्वाचे सत्य म्हणजे या संपूर्ण निवडणुकीत पंतप्रधान मोदी हेच भाजपचा गुजराती चेहरा होते. हे असणे अपरिहार्यच हे सत्य कितीही मान्य केले तरी लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे २०१४ पासून आजतागायत त्या राज्यात मोदी यांच्यानंतरचे नेतृत्व भाजपस विकसित करता आलेले नाही. अभेद्य वाटणाऱ्या पक्षासाठी ही बाब खचितच अभिनंदनीय नाही. आताही भाजप उमेदवारास मतदान म्हणजे मला मतदान असाच मोदी यांचा प्रचार होता आणि त्यांच्यानंतरचे तुल्यबळ अमित शहा हेदेखील मोदींचे हात गुजरात विजयाने बळकट होतील, असेच म्हणत. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री हे फार फार तर तोंडी लावण्यापुरते होते, असे म्हणावे लागेल. निवडणूक आयोगाच्या सौजन्याने सोयीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आणि त्याआधीही केंद्र सरकारने गुजरातसाठी आपली ताकद पणास लावली होती. खुद्द मोदी यांच्या ३३-३४ प्रचारसभा/मेळे गुजरातेत झाले. अगदी मतदानापर्यंत हे सुरू होते. तेव्हा या निवडणुकीत भाजपचा विजय सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार होताच. आता १८२ सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे १५५ वा तत्सम आमदार असतील. याआधी इतका मोठा विजय काँग्रेसच्या नावावर होता. राष्ट्रीय स्तरावरील कसलीही प्रतिमा नसताना सोळंकी यांनी १९८५ साली १४९ आमदार निवडून आणले होते. मोदी यांचा विजय अर्थातच त्यापेक्षा मोठा. पण मोदी यांची प्रतिमाही सोळंकी यांच्यापेक्षा मोठी या सत्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

 ही प्रतिमा, मोदी यांची क्षमता, त्यांच्या नावाची जादू इत्यादी शब्दप्रयोगांचा सढळ वापर गुजरात विजयासंदर्भात माध्यमे आदींत सुरू आहे. वास्तविक तसे करणारे नकळतपणे मोदी यांचा अपमान करतात की काय, असा प्रश्न पडतो. याचे कारण असे की गुजरातच्या बरोबरीने हिमाचल प्रदेश या राज्याचीही निवडणूक झाली. त्या राज्यात मात्र सत्ताधारी भाजप पुन्हा सत्ता राखण्यात अपयशी ठरला. ‘मोदी मॅजिक’सारखे अतिरंजित शब्दप्रयोग करावयाचे असतील तर मग त्यांची ही जादू हिमाचलात चालली नाही, असे म्हणावे लागेल. वास्तविक हिमाचलातील विजयात काँग्रेस नेतृत्वाचा पराजय अधिक. त्या राज्यात सोनिया गांधी प्रचारास गेल्या नाहीत, राहुल गांधी गेले नाहीत, तेथे घर असल्यामुळे प्रियांका गांधी यांनी प्रचार केल्यासारखे केले म्हणायचे. तरीही त्या राज्यात काँग्रेसकडे पुन्हा सत्ता दिली जात असेल तर हिमाचली जनता फारच आशावादी म्हणायला हवी. या तुलनेत भाजपचा त्या राज्यातील प्रचारही दणदणीत होता. खुद्द मोदी यांनी ‘हे माझे दुसरे घर’ असे सांगण्यापासून ते अन्य भाजप नेत्यांनी त्या राज्यात अनेक प्रचारसभा घेतल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा हे खुद्द हिमाचली. इतकेच काय भाजपचे उद्याचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते अनुराग ठाकूर हेदेखील हिमाचलचेच. या अनुरागांचे तीर्थरूप प्रेमकुमार धुमल हे तर हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि त्या राज्यातील ज्येष्ठ नेते. असे असताना आणि काँग्रेसचे अस्तित्व नसतानाही त्या राज्यात भाजपस सत्ता राखता आलेली नाही. यावर ‘त्या राज्यात प्रत्येक निवडणुकीतच सत्ताबदल होतो’असा युक्तिवाद केला जाईल. तो तांत्रिकदृष्टय़ा खराच. कारण दर पाच वर्षांनी सत्ताधाऱ्यांस घरी पाठवण्याचा प्रौढपणा त्या हिमालयी राज्याने दाखवलेला आहे. त्या अर्थाने गेल्या पाच वर्षांच्या सत्तेनंतर भाजपचे हरणे नैसर्गिक म्हणावे लागेल. तथापि ते तसे मानायचे तर जादू, करिष्मा आदी शब्दप्रयोग करणे अनुचित ठरते. परत या निवडणुकीत हे जय-पराजयाचे चक्र बदलेल असा दावा भाजपच्या सर्व नेत्यांनी केला होता. म्हणजे आपण सत्ता राखू अशी भाजपस खात्री होती. ती अस्थानी ठरते.

तेव्हा दोन भिन्न राज्यांतील दोन निवडणुकांचे एकाच दिवशी लागलेले हे दोन भिन्न निकाल. पण या दोहोंत एक समान धागा ठसठशीतपणे दिसून येतो. पर्याय हा तो समान धागा. तो केवळ हिमाचल वा गुजरात या राज्यांपुरताच मर्यादित नाही. दिल्ली महापालिकेच्या याच काळात घेतल्या गेलेल्या निवडणुकांतूनही समोर येतो. हिमाचलात सत्ताधारी भाजपस तितकाच चांगला-वाईट पर्याय काँग्रेसच्या रूपात आहे. गुजरातेत तसा तो नाही. ‘आप’ने तो पर्याय ठरण्याचा प्रयत्न करून पाहिला. तो अतिआत्मविश्वासी होता. पण काँग्रेसने काही धडा घेतला नाही, तर आगामी निवडणुकीत ‘आप’ नक्कीच तशी झेप घेऊ शकतो. पंजाबात गेल्या निवडणुकीत ‘आप’ची अवस्था आजच्या गुजरातसारखीच होती. पण अवघ्या पाच वर्षांत ‘आप’ने ते राज्य काबीज केले आणि स्वत:च्या ताकदीवर सत्ता खेचून आणली. याचा अर्थ असा की राजकारण एक-कल्ली, एक-पक्षी असे होत असताना इतर पक्ष चिकाटीने प्रयत्न करून आपण पर्याय ठरू शकतो असे चित्र निर्माण करू शकले तर समोर कितीही तगडा प्रतिस्पर्धी असला तरी सत्ताबदल होतो. असा पर्याय ठरण्यासाठी कष्ट मात्र करावे लागतात. निवडणूक ते निवडणूक इतक्यापुरतेच राजकारण करणाऱ्यांचा काळ केव्हाच मागे सरला. दिवसाचे २४-२४ तास वर्षांचे ३६५ दिवस या खेळात राहून आपण पर्याय आहोत असे जोपर्यंत अन्य राजकीय पक्ष दाखवू शकत नाहीत, तोपर्यंत निकाल बदलणार नाही. पण एकदा का पर्याय समोर आला की मतदार त्यास संधी देतातच देतात. तेव्हा पर्यायास पर्याय नाही हा या निवडणुकांचा सांगावा!