तर्काच्या सूक्ष्मदर्शकातूनही अनेक गोष्टी सुस्पष्ट दिसतातच असे नाही. राणी एलिझाबेथ यांचे असणे आणि जाणे ही अशी यातील एक..

इतिहास बदलता येत नाही; त्यातील चांगल्या-वाईटासह तो स्वीकारायचा असतो, हे भान त्यांना होते..

Russia-Ukraine war tanks become obsolete in modern warfare
Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
चिप-चरित्र: व्हिएतनाम युद्धाचा असाही लाभ..
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?

ही घटना जेव्हा घडली तेव्हा पहिले महायुद्ध कागदोपत्री संपलेले होते; पण त्या युद्धाचे निखारे पूर्ण विझलेले नव्हते. व्हर्साय तहाच्या अटीत पिचलेल्या जर्मनीचे वायमर प्रजासत्ताक लवकरच त्याविरोधातली धुम्मस अनुभवणार होते. इटलीत मुसोलिनी बॉम्बफेकीतून बचावला होता आणि  त्या वर्षीच्या २६ जानेवारीस जॉन लोगी बेअर्ड याने तयार केलेल्या यंत्राची यशस्वी चाचणी नोंदली गेली होती. हे यंत्र म्हणजे दूरचित्रवाणी- टेलिव्हिजन. भारतात त्या वर्षी तेव्हाच्या टुमदार मुंबईच्या रस्त्यावर ‘बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट’ (बेस्ट) कंपनीची पहिली बस धावली होती. पलीकडच्या पश्चिम आशियाच्या वैराण वाळवंटात खनिज तेल सापडायचे होते, सौदी अरेबिया देश म्हणून जन्मायचा होता आणि तो जन्मास घालणाऱ्या अब्दुलअझीज इब्न सौद याने स्वत:स नुकतेच हेजाझ प्रांताचा राजा घोषित केले होते. अशा काळात एलिझाबेथ विंडसर हिचा जन्म झाला तेव्हा निम्म्यापेक्षा अधिक जग हे तिच्या वडिलांच्या आधिपत्याखालील ब्रिटानियाचा भाग होते. अफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया असा एक खंड नव्हता की जेथे ग्रेट ब्रिटनचा ‘युनियन जॅक’ फडकत नव्हता. तिच्या जन्मानंतर एकविसाव्या वर्षी ब्रिटानियाच्या साम्राज्यातील ‘कोहिनूर’ भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर लवकरच वडिलांच्या अकाली निधनाने सम्राज्ञीचा मुकुट तिच्या तरुण मस्तकावर आरूढ झाला. एलिझाबेथ राणी झाली त्यावेळी सोव्हिएत रशियात जोसेफ विसारोनोविच स्टालिन सत्तेवर होते आणि चीन देश माओ झेडाँग यांची सांस्कृतिक क्रांती पचवू पाहात होता. त्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी, परवाच्या ८ सप्टेंबरला हर हायनेस क्वीन एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या शिरावरील मुकुट उतरला. राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले. या विधानाच्या आधी इतका तपशील नोंदवला याचे कारण या निधनाने जगाने नक्की काय गमावले हे लक्षात यावे ! जुन्या, सरलेल्या विसाव्या शतकास नव्या, तंत्रपरायण एकविसाव्या शतकाशी सहज जोडणारा एक दुवा त्यांच्या निधनाने आपण गमावला. बदल म्हणजेच सातत्य, चलता म्हणजेच स्थिरता असे मानले जाणाऱ्या काळात या सत्यावर मात करून आपले सस्मित अस्तित्व जवळपास शतकभर अमीट, अविचल राखणारी एक व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली एवढाच मर्यादित या घटनेचा अर्थ नाही.

तो तितकाच असता तर जगातील वाटेल त्या घटनेवर व्यावसायिक भावनाशून्यतेत कोरडे भाष्य करण्यासाठी, वाटेल त्या घटनेची थंड डोक्याने आणि तशाच थंड भाषेत चिरफाड करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘बीबीसी’ वृत्तवाहिनेचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक ह्यू एडवर्डस यांच्या चेहऱ्यावरून राणीच्या निधनाचे वृत्त सांगताना चुकार अश्रू ओघळला नसता. जगातील प्रत्येक देशप्रमुखास आपल्या आयुष्यात एकदा तरी राणीच्या पाहुणचाराचा आनंद कसा मिळाला याच्या खऱ्याखोटय़ा कहाण्या सांगावेसे वाटले नसते. ब्रिटिश साम्राज्याचा कधीही भाग नसलेल्या, किंबहुना स्पर्धक असलेल्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ‘आयफेल टॉवर’वरील आणि चिरतरुण ‘शाँझ-एलीझे’ या फ्रेंच राजपथावरील दिवे मालवावेत असे फ्रेंचांस वाटले नसते आणि काहीही पैशांत मोजता येते असे मानणाऱ्या अमेरिकेत धसमुसळे क्रीडा सामने राणीस श्रद्धांजलीसाठी थांबवण्याची गरज क्रीडासम्राटांना वाटली नसती. तसेच; ‘लागले नेत्र रे पैलतीरी’ अशांपासून जगाचे कुतूहल शमवून घेऊ इच्छिणाऱ्या नवतरुणांपर्यंत प्रत्येकास आपलेच कोणी गेल्याचे दु:ख झाले नसते. एरवी कधीमधी मारूनमुटकून व्यक्त केलेल्या राजकारण-चतुर दु:खभावनेस मतलबीपणाचे आवरण असते. पण राणीच्या निधनाने प्रत्येकास झालेले दु:ख, काहीतरी हरवल्याची, गमावल्याची भावना कमालीची सच्ची आहे. तुलनाच करायची तर पंचवीस वर्षांपूर्वी, १९९७ साली लेडी डायनाच्या अपघाती मृत्यूशी तिची व्हावी. डायनाच्या मृत्यूने त्या वेळी अनेकांच्या हृदयांनी अनेक कारणांसाठी एक कळ अनुभवली. राणी एलिझाबेथ यांच्या निधनाने तसेच घडले. या विसंवादी जगाचा अर्थ लावण्यात थकलेल्या जुन्याजाणत्यांस आपल्या व्यथा मांडण्यासाठी राणीचे ‘असणे’ आवश्यक वाटे आणि हे जुनेजाणते आपल्या प्रगतीत कसे अडथळे आहेत असे वाटणाऱ्या तरुणांस आपले ऐकून घेणारी, प्रसंगी उत्तेजन देणारी राणी ही जवळची वैश्विक आजी वाटे. डायना आणि तिच्या सासूबाई एलिझाबेथ या दोघीही या अशा भावनेबाबत भलत्याच भाग्यवान म्हणायच्या. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या आयुष्यात अशी स्त्री असावी असे बहुसंख्य पुरुषांस वाटे आणि अनेकांस हवीहवीशी तशी स्त्री आपणच असायला हवे अशी अनेक स्त्रियांची भावना असे. तर्काच्या सूक्ष्मदर्शकातूनही अनेक गोष्टी सुस्पष्ट दिसतातच असे नाही. राणी एलिझाबेथ यांचे असणे आणि जाणे ही अशी यातील एक.

ग्रेट ब्रिटनच्या उपाधीतून ‘ग्रेट’चे विरघळणे जसे या राणीने पाहिले तसेच भयंकर मानवी संहारापासून ते सून-मुलगा यांच्या वेडय़ावर्तनापासून ते आप्तेष्टांची ताटातूट असे अनेक काही सहन केले. त्याचा कसलाही कटूपणा त्यांच्या वर्तनात कधीही कोणीही अनुभवला नाही. वितळणाऱ्या हिमशिखरांपासून ते प्रदूषणकारी नद्यानाल्यांपर्यंत वाटेल ते पोटात घेणारा सामुद्रिक शांतपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळे त्यांच्यात एक विलक्षण आणि हवीहवीशी विलोभनीयता होती. अन्य अनेकांकडेही ती कधी आढळते. पण काही काळापुरतीच. नंतर नंतर अशा व्यक्तीही कर्णकटू होतात. पण तब्बल ७० वर्षे ही अथांग शांतता टिकवू शकणाऱ्या राणी एलिझाबेथ इतरांपेक्षा म्हणून सर्वास हव्याहव्याशा ठरतात. ब्रिटनचे तब्बल १५ पंतप्रधान राणी एलिझाबेथ यांनी ‘नेमले’. आत्मप्रेमाच्या गगनभेदी हुंकारासाठी विख्यात विन्स्टन चर्चिल हे राणीने नेमलेले पहिले पंतप्रधान. दुसरे महायुद्ध जिंकून देणाऱ्या चर्चिल यांच्या विजयाच्या उन्मादावर अवघ्या विशीतल्या या राणीने सहज पाणी ओतले. स्वत:स सर्व काही कळते असे मानणाऱ्या चर्चिल यांच्यापासून काहीच जमण्याचा आत्मविश्वास नसलेले अ‍ॅटली यांनाही या राणीने सांभाळले. ‘ओन्ली मॅन इन द कॅबिनेट’ असे ज्यांच्या मंत्रिमंडळाबद्दल बोलले जायचे त्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर याही अशाच आत्मकेंद्री नेत्या. त्यांनाही राजकीय आयुष्यात कोणापुढे जर नमते घ्यायला लागले असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे राणी एलिझाबेथ. थॅचरबाई सर्वाधिक काळ- ११ वर्षे-  टिकलेल्या पंतप्रधान. ‘द लेडी इज नॉट फॉर टर्निग’- तुम्ही मला गुंडाळू शकत नाही- हे त्यांचे विख्यात उद्गार. मात्र राजकारणात सर्वाना गुंडाळून ठेवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या थॅचरबाई या राणीला मात्र कधी गुंडाळू शकल्या नाहीत. पण थॅचर यांना नमवणे राणीने कधीही मिरवले नाही. ब्रिटिश रिवाजानुसार पंतप्रधान प्रत्येक आठवडय़ात राणीस भेटायला जातात आणि काय सुरू आहे/नाही याची चर्चा करतात. म्हणजे राणीने जवळपास ३,६४० आठवडे पंतप्रधानांशी असा संवाद साधला. पण त्या संस्कृतीचे मोठेपण असे की एकदा म्हणजे एकदाही राणीकडून या भेटीत काय घडले याची वाच्यता झालेली नाही. हे असे मर्यादापालन हे पाश्चात्त्य संस्कृतीचे वैशिष्टय़. ते कसे पाळावे हे राणीने आपल्या वर्तनाने दाखवून दिले. आतापर्यंत एकाही पंतप्रधानानेदेखील या चर्चा चावडीवर मांडल्या नाहीत आणि तेथील माध्यमांनी ‘सूत्रां’च्या हवाल्याने कधी बिनडोक बातम्याही चालवल्या नाहीत, हेदेखील कौतुकास्पदच. ‘‘राणी तुम्हांस नक्की काय सांगते’’, या प्रश्नावर एकदाच काय ते पंतप्रधान जेम्स कॅलेघन म्हणाले : ‘‘शी ऑफर्स फ्रेंडलीनेस; बट नॉट द फ्रेंडशिप !’’. हे उद्गारही किती संयत! व्यवस्थेचा आदर करण्याच्या या गुणामुळेच आपले खास असे काही राणीस सांगावे असे प्रत्येकास वाटे. वास्तविक त्यांचे पती प्रिन्स फिलिप हे राणीच्या तुलनेत चांगलेच बोलघेवडे. मोकळे-ढाकळे असे. पण या उभयतांतील एकाचे उणे दुसऱ्याच्या दुण्याने सहज सांभाळले गेले.

हे सगळे कमालीचे कौतुक वाटावे असे. तसे असणाऱ्यांची संभावना ‘वसाहतवादी मानसिकतेचे’ अशी करण्याचा प्रघात अलीकडे पडताना दिसतो. पण हे कौतुक साम्राज्यवादी मानसिकतेचे नाही. वास्तविक त्या काळात एकटय़ा ब्रिटनचे साम्राज्य होते असे नाही. स्पेनच्या आधिपत्याखालीही अनेक देश होते, पोर्तुगीजांच्याही अनेक वसाहती होत्या आणि डचांनीही अनेक देशांवर राज्य केले. पण त्यांच्या एकेकाळच्या वसाहतीतील एकाही राज्यकर्त्यांस राणी एलिझाबेथ यांच्याइतके जाऊ दे; परंतु त्याच्या काही अंशीही प्रेम मिळाले नाही. स्पेन, पोर्तुगाल आदी राजवटींनी धर्मप्रसारादी उद्दिष्टांसाठी आपल्या वसाहतींत अनन्वित अत्याचार केले. त्या तुलनेत ब्रिटिशांची राजवट सभ्य म्हणावी अशी होती. म्हणून अन्य साम्राज्ये त्यांच्या अत्याचारांसाठी लक्षात राहतात तर ब्रिटिश मात्र रेल्वे उभारणी, दळणवळण सुविधा आणि नियमाधारित राज्यव्यवस्था यांसाठी आठवतात. अर्थात त्यांची राजवट निर्दोष होती असे नाही. पण तशी ती कोणाचीच नसते. तरीही आधिपत्याखाली नसलेल्या देशांतील नागरिकांकडूनही राणीस कमालीचे प्रेम मिळाले. या मुद्दय़ावर राणी एलिझाबेथ सर्वापेक्षा वेगळय़ा ठरतात. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया. आपल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाही ग्रेट ब्रिटनच्या साम्राज्याचा एक भाग आणि आजही राष्ट्रकुलाचा सदस्य. आपण प्रजासत्ताक झालो. ऑस्ट्रेलियाचे घटनादत्त प्रमुखपद अजूनही ब्रिटिश राजघराण्याकडे आहे. ही ‘मागास प्रथा’ मोडून ‘वसाहतवादाचे जोखड’ फेकून द्यावे अशी मागणी मधूनमधून त्या देशात होते. त्यावर एकदाचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून ऑस्ट्रेलियात १९९९ साली जनमताची चाचणी घेतली गेली. तीत जवळपास ५५ टक्क्यांनी यास विरोध केला आणि यात तरुणांचा मोठा सहभाग होता. कॅनडा, न्यूझीलंडचाही अनुभव असाच. न्यूझीलंड सैन्यदलाचे सर्वोच्च सेनापतीपदही राणीकडे होते. याचा अर्थ हे देश यापुढे ब्रिटिश राजघराण्याचे प्रभुत्व नाकारणारच नाहीत असे नाही. पण राणी हयात होत्या तोपर्यंत तरी ते झुगारता आले नाही; ही बाब महत्त्वाची.

पाश्चात्त्य संस्कृतींत वानप्रस्थाश्रम ही संकल्पना नाही. पण या हिंदू संकल्पनेचे सर्वोत्तम पालन त्यांच्याकडून होत असते. राणी एलिझाबेथ हे त्याचे प्रतीक. आपण आता विझत चाललो आहोत हे लक्षात आल्यापासून त्यांनी आपले सार्वजनिक कार्यक्रम कमी केले. तारुण्याच्या उंबरठय़ावर असल्यापासूनचा त्यांचा मित्र, प्रियकर, सहकारी आणि पती प्रिन्स फिलिप गेल्या वर्षी निवर्तले. ९९ व्या वर्षी. त्यांवरील मृत्युलेखात (‘पुराणपुरुष’, १२ एप्रिल २०२१) ‘लोकसत्ता’ने त्यांना यथोचित आदरांजली वाहिली होती. पतीच्या निधनानंतर राणी हळूहळू मिटू लागल्या. आताही आपल्या अत्यंत प्रिय स्कॉटलंडमधील बालमोरल कासल येथे निवासास जाताना ‘मी परत येणार नाही’, अशी निरोपाची भाषा त्यांनी केली. मृत्यूच्या आधी दोनच दिवस नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना त्या भेटल्या. ते त्यांचे शेवटचे दर्शन.

नंतर त्यांच्या निधनाचेच वृत्त आले. आत्यंतिक आधुनिक तरीही परंपरेच्या डोळस पाईक असे त्यांचे आयुष्य. इतिहासाचे कोणते जोखड फेकून द्यायचे हेदेखील कळावे लागते. इतिहास बदलता येत नाही; तो त्यातील चांगल्या-वाईटासह स्वीकारायचा असतो, हे भान त्यांना होते. तो तसा स्वीकारत, त्यास सामोरे जात, नामांतरादी उद्योगात वेळ न दवडता उदात्तपणे त्या जगल्या. तसाच त्यांचा अंत. ‘‘प्रेमाची किंमत आपणास शोकभावनेतून मोजावी लागते’’ (ग्रीफ इज द प्राइस वुइ पे फॉर लव्ह) असे त्या म्हणत. समस्त ब्रिटन, जगातील सुसंस्कृतप्रेमी या विधानाच्या प्रात्यक्षिकातून सध्या जात असतील. हा केवळ एखाद्या महनीय व्यक्तीचा अंत नाही. हे वर्तमानास भूतकालाशी जोडणाऱ्या संस्कृतीसातत्याच्या सेतूचे अंतर्धान पावणे आहे. म्हणून ते अधिक चटका लावणारे आणि अधिक शोचनीय. हर हायनेस द क्वीन एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या या मानवी देहाकारी सेतूस ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.